सर्वसामान्य जागेवरच म्हापशातील रवींद्र भवनाची उभारणी : मुख्यमंत्री

0
68

म्हापसा येथील रवींद्र भवनसाठीच्या जागेच्या प्रश्‍नावर सातही आमदारांची बैठक घेऊन सर्वांना मान्य असलेल्या जागेचा विचार करून रवींद्र भवन रूप देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिले.
हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना विचारलेल्या मूळ प्रश्‍नावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंयांनी वरील आश्‍वासन दिले. वरील प्रकल्पासाठी जमीन शोधण्याची जबाबदारी कृती दल समितीवर सोपविली आहे. जमीन उपलब्ध होताच रवींद्र भवन उभारण्याचे काम हाती घेण्याचे आश्‍वासन कला आणि संस्कृती मंंत्र्यांनी दिले.
रवींद्र भवन उभारण्यासाठी किमान दहा ते बारा हजार चौ.मी. जमीन आवश्यक आहे, असे गावडे यांनी सांगितले. थिवीचे कॉंग्रेस आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी रवींद्र भवन हे म्हापशासाठीच असा समज करून घेऊ नका ते संपूर्ण बार्देश तालुक्यासाठी आहे. त्यामुळे कोलवाळ येथेही गृह मंडळाचा भूखंड आहे. तेथे प्रकल्प उभारण्यास वाहतुकीच्या दृष्टिने सोईस्कर होईल अशी सूचना हळर्णकर यांनी केली. पर्रीकर यांनी या सूचनेची दखल घेऊन सातही आ’दारांची बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले.
रवींद्र भवन उभारताना वाहतूक व्यवस्था, वाहन पार्किंग या सर्व बाबींचा विचार केला जाईल, असे सांगितले. शेत जमीन असल्यास अधिक सोपस्कार पूर्ण करावे लागतात, असे मंत्री गावडे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनीही बार्देश तालुक्यात रवींद्र भवन उभारण्याची गजर व्यक्त केली. वास्को येथील रवींद्र भवनाची योग्य प्रकारे काळजी घेण्याचा सल्ला देऊन वरील भवनाच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असल्याचे पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.