कोलवाळ कोमुनीदादीत मोठा घोटाळा ः हळर्णकर

0
76

>> योग्य कारवाईचे महसूलमंत्री खंवटे यांचे आश्‍वासन

कोलवाळ कोमुनिदादीत मोठा घोटाळा झाला असून सेरूला कोमुनिदादमधील घोटाळ्यापेक्षाही तो मोठा असल्याने त्याची दक्षता खात्यामार्फत तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी काल विधानसभेत कॉंग्रसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी केली. महसूलमंत्री खवटे यांनी त्यावर उत्तर देताना या प्रकरणात कोणी राजकारणी असला तरी त्याची पर्वा न करता योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले की कोलवाळ कोमुनिदादीच्या महामार्गालगत असलेल्या मौल्यवान जमिनीवर अत्यल्प किंमतीत भूखंडांची विक्री करण्यात आली आहे. येथील जमिनीचा भाव सुमारे दहा हजार रुपये प्रती चौरस मीटर असताना ५० रुपये दराने विक्री करण्यात आली असून बेकायदा तेथे ११३ भूखंड विकसित करून सध्या १०-१२ बंगले बांधूनही झाल्याची माहिती त्यांनी दिली. पुराव्यादाखल कागदपत्रे व तेथील छायाचित्रेही त्यांनी सादर केली.
आमदार दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आदींनीही यावेळी संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
एखाद्या गरिबाने लहान घर बांधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होते. नगर नियोजन खातेही पुढे येते. परंतु वरील जागेत १० बंगले उभे झालेले असतानाही कोमनिदाद प्रशासकांना जाग कशी आली नाही, असा प्रश्‍न आमदार दिगंबर कामत यांनी विचारला. कोमुनिदादीतील हा मोठा घोटाळा असून प्रकरण दक्षता खात्याकडे देण्याची मागणी हळर्णकर यांनी केली. हे प्रकरण आपण आव्हान म्हणून घेणार, असे खंवटे यांनी सांगितले.