राज्यात यंदा पावसाने जोरदार सलामी दिली आहे. सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण २२ टक्के जास्त नोंद झाले आहे. आत्तापर्यंत ३२.६५ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे सर्वाधिक ३७.८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात सुरुवातीला काणकोण तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त होते. पेडणे तालुक्याने पावसाच्या प्रमाणामध्ये काणकोण तालुक्याला मागे टाकले आहे. आता हळूहळू उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. ओल्ड गोवा येथे ३७ इंच, म्हापसा येथे ३५.३ इंच, पणजी येथे ३५.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथे ३१.२ इंच, साखळीत २९.५ इंच, वाळपई येथे ३२,६ इंच पावसाची नोंद झाली आहे.
दक्षिण गोव्यातील काणकोण येथे ३५.१ इंच, दाबोळी येथे ३०.७ इंच, मुरगाव येथे ३४.१ इंच, सांगे येथे ३०.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. मडगाव आणि केपे येथील पावसाची माहिती उपलब्ध झालेली नाही.
मागील चोवीस तासांत म्हापसा, पणजी, साखळी, मुरगाव, काणकोण, ओल्ड गोवा, दाबोळी, सांगे, फोंडा, वाळपई, पेडणे येथे जोरदार पाऊस कोसळला. आगामी चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी जोरदार तसेच हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पणजी हवामान विभागाने वर्तविली आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.