गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना धमकी देणारे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे एका पदाधिकारी गजानन तिळवे तसेच भाजपचे एक ज्येष्ठ नेते सतीश धोंड यांच्या विरुध्द उत्तर गोवा कॉंग्रेस जिल्हा समितीने म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. भाजप सरकार जर कायद्याचे पालन करणारे सरकार असेल तर सरकारने वरील दोन्ही पदाधिकार्यांना अटक करण्याचा आदेश पोलिसांना द्यावा, अशी मागणी काल कॉंग्रेस पक्षाचे एक प्रवक्ते विठू मोरजकर व जनार्दन भंडारी यानी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केली.
तिळवे यांनी चोडणकर यांना धमकी दिलेली असून आम्ही ज्या प्रकारे शांताराम नाईक यांच्यावर हल्ला केला होता तसाच हल्ला तुमच्यावर करू असा इशारा त्यांना दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फेसबूकवरील एका पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली असल्याचे तक्रारीतून नमूद करण्यात आले आहे. भाजपचे माजी सरचिटणीस सतीश धोंड यांनीही आता बोलण्यापेक्षा कृती करण्याची गरज आहे, असे तिळवे यांच्या पोस्टचा हवाला देऊन फेसबूकवर म्हटलेले असल्याने त्यांच्या विरुध्दही तक्रार करण्यात आली असल्याचे वरील द्वयींनी सांगितले. अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकी देणे ही भाजपची संस्कृती आहे काय, असा सवाल यावेळी विठू मोरजकर व जनार्दन भंडारी यांनी पत्रकार परिषदेतून केला. भाजपवाल्यांच्या अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसून हिम्मत असेल तर बहुजन समाजाचा नेता असलेल्या गिरीश चोडणकर यांना हात लावून दाखवावा, असे आव्हानही वरील नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिले.