सरपंच, उपसरपंचपदी कोण? आज फैसला

0
26

>> बहुतांश पंचायतींत दोन्ही पदांसाठी निवडणूक होणार; काही ठिकाणी बिनविरोध निवड शक्य; ६२ पंचायतींत महिलाराज येणार

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड आज (सोमवारी) होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आणि आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतील ग्रामपंचायतींवर आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी कंबर कसली आहे. बहुतांश पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निश्‍चित आहे. त्याचबरोबर आमदार आणि राजकीय नेत्यांच्या शिष्टाईमुळे काही पंचायतींत दोन्ही पदांवर बिनविरोध निवड अपेक्षित आहे. दरम्यान, बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचे समर्थकांची सरपंच व उपसरपंचपदी वर्णी लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल केला.

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींसाठी १० ऑगस्टला मतदान झाले आणि निवडणुकीचा निकाल १२ ऑगस्टला जाहीर झाला. त्यानंतर पंचायत संचालकांनी सरपंच आणि उपसरपंच निवडणूक घेण्याबाबत १३ ऑगस्टला आदेश जारी करत ही निवडणूक २२ ऑगस्टला होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सोमवारी ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची निवड होणार आहे.
राज्यातील ६२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आणि ६४ ग्रामपंचायतींचे उपसरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महिला सरपंचांसाठी सत्तरीतील ४, डिचोलीतील ६, बार्देशमधील ११, पेडण्यातील ६, तिसवाडीतील ६, सांगेतील ३, धारबांदोड्यातील १, केपेतील ३, काणकोणातील ३, सासष्टीतील ९, मुरगावातील ४ आणि फोंड्यातील ६ ग्रामपंचायती राखीव आहेत. महिला उपसरपंचांसाठी सत्तरीतील ४, डिचोलीतील ६, बार्देशातील ११, पेडण्यातील ८, तिसवाडीतील ६, सांगेतील ३, धारबांदोड्यातील १, केपेतील ४, काणकोणातील २, सासष्टीतील ११, मुरगावातील २ आणि फोंड्यातील ६ ग्रामपंचायती राखीव आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्यात आली नव्हती; मात्र ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर प्रमुख राजकीय पक्ष, आमदारांकडून आपलेच उमेदवार निवडून आले, असा दावा केला. सदर आमदार आपल्या मतदारसंघातील पंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर कोण वर्चस्व राखण्यात यशस्वी होतो, हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतींतील सरपंच, उपसरपंच पदासाठी दरवर्षी सुरू असणारा ‘संगीत खुर्चीचा खेळ’ यंदापासून भाजप चालू देणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी साखळी मतदारसंघातील नवनिर्वाचित पंच सदस्यांना दिला होता.

आम्हाला स्थिर प्रशासन द्यायचे आहे. संगीत खुर्चीमुळे विकासात अडथळे येतात आणि विकासकामांना खीळ बसते, असेही मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते.

डिचोलीत मागील पाच वर्षांत
५८ सरपंच अन् ४८ उपसरपंच

डिचोली तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायतींमध्ये मागील पाच वर्षांत तब्बल ५८ सरपंच आणि ४८ उपसरपंच पद भूषवले. अनेकांनी २०-२० महिन्यांसाठी दोन्ही पदे वाटून घेतल्याने संगीत खुर्चीचा खेळ चांगलाच रंगला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरपंच आणि उपसरपंच बदलले गेल्याने त्याचा निश्‍चितच विकासावर परिणाम झाला. आता यापुढील पाच वर्षांत तरी संगीत खुर्चीला आळा बसेल आणि विकास साधला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे.

काणकोणातील ५ पंचायतींचे सरपंच, उपसरपंच बिनविरोध

काणकोण मतदारसंघातील ६ पैकी ५ पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची निवड बिनविरोध होणार आहे. काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोलये, पैंगीण, खोतीगाव, श्रीस्थळ आणि आगोंदा पंचायतींवर सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध होणार आहे.