सरत्या 2025 या वर्षाला निरोप देत, आज नवीन वर्ष 2026 चे जल्लोषात स्वागत झाले. सरते 2025 वर्ष गोव्यात घडलेल्या विविध घटना-दुर्घटनांमुळे गाजले. 3 मे रोजी शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर ऑक्टोबर महिन्यात दक्षिण गोव्यातील रासई लोटली येथील एका जहाज बांधणी कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा बळी गेला होता. वर्षअखेर होता होता 6 डिसेंबरला हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांच्या बळी गेला. याशिवाय वास्को, दोनापावल आणि म्हापसा येथील दरोड्याच्या घटनाही मागील वर्षात गाजल्या.
शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवात 3 मे रोजी पहाटे साधारण तीन ते सव्वा तीनच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या चेंगराचेंगरीमध्ये 78 भाविक जखमी झाले होते.
सरत्या वर्षात उत्तर गोव्यातील किनारी हडफडे गावातील बर्च या नाईटक्लबमधील अग्नितांडवाचे प्रकरण देशभरात गाजत आहे. या प्रकरणात संशयित आरोपी नाईटक्लबचे मालक सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंना थायलंड येथे इंटरपोलच्या माध्यमातून ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात यश प्राप्त झाले. आगीच्या घटनेनंतर काही तासांत लुथरा बंधूंनी थायलंडला पलायन केले होते. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पाच सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या आग प्रकरणाचा तपास हणजूण पोलिसांकडून केला जात असून, या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यात गुंडगिरी, दरोडे, चोऱ्या, महिला व मुलींवरील अत्याचार, अमलीपदार्थ आदी प्रकरणामध्ये वाढ झाल्याचे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या सरत्या वर्षात राज्य सरकारने माझे घर योजना तयार करून घराच्या मालकी हक्क्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केला. तसेच, सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तिसरा जिल्ह्याच्या निर्मितीचा मोठा निर्णय घेतला.
सप्टेंबर महिन्यात सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण बरेच गाजले. गैरप्रकाराविरोधात आवाज उठवत असल्याने रामा काणकोणकर यांच्यावर करंजाळे पणजी येथे भरदिवसा प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली. त्यात सराईत गुंड जेनिटो कार्दोज याचा समावेश होता.
सरत्या वर्षात भाजप सरकारच्या दोघा समर्थकांनी सरकारमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आणला. माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी कामाच्या फाईल मंजूर करून 15 लाखांचा लाच द्यावी लागल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपचे कार्यकारिणीचे सदस्य सावियो रॉड्रिगीस यांनी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला आपल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या फाईलच्या मंजुरीसाठी एका आमदाराला 10 लाख रुपये द्यावे लागल्याचा आरोप केला.
2025 मध्ये दरोड्याची तीन प्रकरणे नोंद झाली. त्यातील वास्को येथील दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. दोनापावल आणि म्हापसा येथील दोन दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात अजूनपर्यंत यश आलेले नाही.
सरत्या वर्षात राज्यभरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने विदेशातून गोव्यात होणारे अमलीपदार्थ तस्करीचे एक प्रकरण उजेडात आणले. राज्यातील अमलीपदार्थ प्रकरणात देश-विदेशातील अनेक जण सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. स्थानिक युवकांना सोबत घेऊन अमलीपदार्थांच्या विक्रीचा व्यवहार केला जात आहे.
सरत्या वर्षात टुरिस्ट टॅक्सी सेवेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आले नाही. राज्य सरकारने टॅक्सी प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. टॅक्सी प्रश्न प्रलंबित असल्याने टॅक्सीचालकांमध्ये खटके उडत आहेत. बऱ्याच वेळी पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, ऑनलाइन पद्धतीने बेकायदा टॅक्सी वाहतूक व्यवसाय फोफावत आहे. खासगी टॅक्सी बेकायदा पद्धतीने भाडेपट्टीवर देण्याचे प्रकारही घडत आहेत.
सरत्या वर्षात भाजपचे नेते, माजी मंत्री गोविंद गावडे यांना मुख्यमंत्र्यांच्याविरोधात केलेले वक्तव्य भोवले. त्यामुळे गावडे यांना मंत्रिपदावरून डच्चू देण्यात आला. तसेच, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली. सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर यांची गोवा विधानसभेच्या सभापतिपदी वर्णी लावण्यात आली.
रवी नाईक यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. दिवंगत रवी नाईक यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषविली होती.