राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी जिल्हा पंचायत भवन उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हा पंचायतीच्या नूतन सदस्यांच्या शपथग्रहण सोहळ्यात बोलताना पर्वरी येथे काल दिली.
जिल्हा पंचायतींना अतिरिक्त जबाबदारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्हा पंचायत सदस्यांनी ग्रामीण गोवा सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे. जिल्हा पंचायत सदस्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा पंचायतींना 16 व्या वित्त आयोगाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा पंचायतींनी मागील निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव डॉ. कांडावेलू, पंचायत संचालक महादेव आरोंदेकर व इतरांची उपस्थिती होती.