सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना सोमवारपर्यंत रक्कम : मुख्यमंत्री

0
12

>> ३ लाख ४० हजार कुटुंबांना १४२ कोटी रुपयांचे वितरण होणार

राज्य सरकारकडून सरकारच्या गृहआधार, डीएसएसवाय यासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सोमवार २९ ऑगस्टपर्यंत मानधन, अनुदानाची रक्कम जमा करून त्यांना गणेशचतुर्थीची भेट दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून सुमारे ३ लाख ४० हजार कुटुंबाना १४२ कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

राज्यात गणेशचतुर्थी हा एक प्रमुख सण आहे. चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर वित्त खाते आणि इतर खात्यांच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित मानधन, अनुदान तातडीने संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएसवाय) योजनेच्या १ लाख ३० हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांचे मानधन जमा केले जाणार आहे. महिला व बाल कल्याण खात्याच्या गृह आधार योजनेच्या १ लाख ३५ हजार लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रलंबित मानधन दिले जाणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात तीन महिन्यांचे ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पशुसर्ंवधन खात्याच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिल्या जाणारे अनुदान प्रलंबित आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सोमवारपर्यंत अनुदान जमा केले जाणार आहे. आदिवासी कल्याण खात्याच्या योजनांचे लाभार्थी, अटल आसरा योजना, कृषी, मच्छिमारी, वाहतूक व इतर खात्याच्या योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान देखील बँक खात्यात जमा केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.