सोनाली यांचा खूनच; दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

0
12

>> शवविच्छेदनात शरीरावर बोथट जखमा असल्याचे स्पष्ट; दोन सहकारी अटकेत; मृतदेह ताब्यात घेत कुटुंबीय हरयाणाला रवाना

भाजपच्या हरयाणातील नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृतदेहाचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दोन डॉक्टरांच्या पथकाने काल शवविच्छेदन केले, त्यात तिच्या शरीरावर अनेक बोथट जखमा असल्याचे स्पष्ट झाले. व्हिसेरा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तूर्त शवविच्छेदनाच्या निष्कर्षामुळे सोनाली यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे; कारण सुरुवातीला त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. आता या प्रकरणी हणजूण पोलिसांनी त्यांच्या दोन सहकार्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी संशयित सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोनाली फोगट यांचा मंगळवारी सकाळी हणजूण येथील एका हॉटेलमध्ये गूढ मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठविला होता. तसेच डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन करण्याची विनंती केली होती. सोनाली फोगट यांया कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास मान्यता दिल्यानंतर गुरुवारी सकाळी दोन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. शवविच्छेदनापूर्वी सोनाली यांच्या भावाने त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. हा संशय शवविच्छेदनानंतर खरा ठरला. शवविच्छेदन अहवालात सोनाली यांच्या शरीरावर अनेक बोथट जखमा असल्याचे समोर आले. व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा करत डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही; मात्र त्यांच्या शरीरावर अनेक बोथट जखमा आहेत, असे अहवालात म्हटले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पोलिसांनी तपासातून मृत्यूचे नेमके कारण शोधायचे आहे, असे शवचिकित्सा अहवालात नमूद केले आहे. व्हिसेराही तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
यानंतर हणजूण पोलिसांनी सोनाली यांच्या दोन सहकार्‍यांविरुद्ध कलम ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका याने बुधवारी हणजूण पोलिस स्थानकात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यात आता कलम ३०२ नोंदवण्यात आले आहे.

गुन्हा अन्वेषणमार्फत तपास करा : लोबो

अभिनेत्री सोनाली फोगट मृत्यू प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून, या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडून उपअधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्‍याच्या देखरेखीखाली तपास करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी काल केली.

शरीरावर धारदार शस्त्राच्या जखमा नाहीत : पोलीस महानिरीक्षक

एकीकडे शवविच्छेदनात सोनाली यांच्या शरीरावर अनेक बोथट जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे, तर पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्णोई यांनी सोनाली यांच्या शरीरावर धारदार शस्त्राच्या कोणत्याही जखमा नसल्याचे काल स्पष्ट केले.

माझ्या बहिणीला न्याय मिळावा : रिंकू ढाका

शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांनी सोनाली यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून, ते मृतदेहासह त्यांच्या मूळ हिस्सार-हरयाणा येथे रवाना झाले आहेत. हणजूण पोलीस ठाण्यात आमच्या लेखी तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनालीच्या शरीरावर ४ ते ५ मोठ्या जखमा आहेत. माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे, असे भाऊ रिंकू ढाका याने सांगितले. शवविच्छेदन अहवालावर समाधानी असून, पुन्हा शवविच्छेदन करणार नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मालमत्ता बळकावणे हे सोनालीच्या पूर्वनियोजित हत्येचे संभाव्य कारण असल्याचा आरोप यावेळी कुटुंबीयांनी केला.

मृत्यूच्या काही वेळापूर्वी सोनाली फोगट यांनी आई, बहीण आणि मेहुण्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या अस्वस्थ होत्या आणि त्यांनी दोघा सहकार्‍यांविरुद्ध तक्रार केली होती, असा दावा रिंकू ढाका याने केला. हरयाणातील सोनाली यांच्या फार्म हाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या मृत्यूनंतर गायब झाल्याचा दावाही त्याने केला.

घाईगडबडीतील वक्तव्यामुळे
मुख्यमंत्री अडचणीत : सरदेसाई

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी वक्तव्य करण्यास घाई केली, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल सांगितले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वक्तव्य केल्याने ते आता कोंडीत सापडले आहेत. शवविच्छेदन अहवालात सोनाली यांच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत, असे सरदेसाई म्हणाले.