सरकारी कर्मचार्‍यांनी लोकांना जलद सेवा द्यावी

0
48

>> कर्मचारी संघटनेची सूचना

काही सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेचे बंधन पाळत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे कर्मचार्‍यांनी वेळेचे बंधन पाळून जनतेला जलद सेवा द्यावी, अन्यथा असे प्रकार सहन करणे शक्य होणार नाही, असा इशारा अखिल गोवा कर्मचारी संघटनेने कर्मचार्‍यांना दिला आहे.
संबंधित खातेप्रमुख असलेल्या अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळेच जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, महसूलमंत्री रोहन खंवटे यांना खात्यातील कर्मचार्‍यांचा हजेरी पट तपासून पहाण्याची पाळी आली असून ही दुर्दैवी बाब आहे. मंत्र्यांवर राज्याची वेगळी जबाबदारी असते. त्यांचा वेळ अशा गोष्टींवर खर्च होऊ नये, असे संघटनेचे मत आहे. सरकारला सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास संघटना तयार असल्याने अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी सांगितले. काही खात्यांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्याचा कामावर परिणाम होतो, सरकारने त्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
कोणताही कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर राहतो की नाही हे तपासण्यासाठी सरकारने बायोमॅट्रीक मशीनच्या अहवालाचा वापर करावा, त्याचप्रमाणे प्रत्येक खात्यात वरील कामासाठी अंतर्गत समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.