मंत्री राजनाथ सिंह यांचे गोव्यात आगमन
गोव्याच्या दोन दिवसांच्या भेटीवर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी आयएनएस हंसा, वास्को येथे स्वागत केले. या भेटीदरम्यान, राजनाथ सिंह आज सोमवारी दक्षिण गोव्यात भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचे लोकार्पण करणार आहेत.
दाबोळी विमानतळ नागरी कामकाज सुरू ठेवेल आणि संपूर्ण विमानतळ नौदलाकडे सोपवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. दाबोळी विमानतळ नागरी कामकाजासाठी खुले राहील असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह गोवा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला हे आश्वासन देण्यात आले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल हवाई तळ आयएनएस हंसा अंतर्गत नागरी एन्क्लेव्ह म्हणून कार्यरत असलेले विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद केले जाणार नाही याची खात्री दिली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज वास्को येथे आयसीजी ‘समुद्र प्रताप’ जहाजाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. तटरक्षक दलासाठी बांधलेल्या दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी ‘समुद्र प्रताप’ हे पहिले जहाज आहे. गोवा शिपयार्डमध्ये या जहाजाचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहतील. गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले हे जहाज 60 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बनलेले आहे. वास्को येथे गोवा शिपयार्डच्या जेटीवर सकाळी 9.15 वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन नौका आणलेल्या असून त्यापैकी पहिल्या नौकेचे आज लोकार्पण केले जाणार आहे.
भारतीय हद्दीतील समुद्रात होणारी तेलाची गळती शोधून काढून त्यावर उपाययोजना करण्याचे काम ह्या नौका करणार आहेत. तेल गळतीमुळे दूषित झालेले पाणी शुद्ध करण्याचे काम या नौका करणार आहेत. गोवा शिपयार्ड लिमिटेडने या नौकांची बांधणी केलेली असून त्यासाठी लागणारे साहित्य व तंत्रज्ञान हे सुमारे 60 टक्के देशी आहे. 114.5 मीटर एवढ्या लांबीची ही जहाजे असून ती 4200 टनांची आहेत. या जहाजांच्या सर्वोच्च वेग हा 22 नॉट्स एवढा आहे. प्रदूषण नियंत्रणाबरोबर, अग्नीशामन व समुद्री सुरक्षासाठीची ही जहाजे आहेत.