सत्‌‍युगाची पावन पायरी

0
15

योगसाधना ः 624, अंतरंगयोग- 21…

  • डॉ. सीताकांत घाणेकर

विश्वात फक्त सदिच्छा असून चालत नाही. प्रत्येकाने आपल्या जीवनातील ध्येय ठरवायला हवे. त्यासाठी विविध शास्त्रांचा अभ्यास करायला हवा. जीवनात आपल्याला काय हवे आहे, काय व्हायचे आहे, कोणते क्षेत्र निवडायचे आहे, काय मिळवायचे आहे, त्याप्रमाणे अभ्यास, ज्ञान व प्रयत्न हवेत.

सर्व विश्वात अनेक घटना क्षणाक्षणाला घडतच असतात- काही सकारात्मक तर काही नकारात्मक, काही साधारण तर काही भयंकर. प्रत्येकाला याची जाणीव आहे, त्यामुळे उजळणी अथवा यादी नको. प्रत्येक क्षेत्रात ही उलथापालथ होतच असते. ही काही नवी गोष्ट नाही. अनादिकालापासून प्रत्येक युगात हे असे घडतच आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे जीवनाची चार युगे सांगितली जातात- सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग. शास्त्रकारांच्या मते प्रत्येक युगात चांगले-वाईट, सुखदायी-दुःखदायी गोष्टी घडणारच; पण कलियुगात मात्र वाईट घटना अत्युच्च टोकाला जातील. असत्याचा विजय होईल, दुर्जन श्रीमंत होतील, त्यांनी केलेली प्रत्येक कृती (वाईटदेखील) फळाला येईल. त्याद्वारे सत्य दबले जाईल. सज्जनांना कष्ट करूनदेखील यश मिळणार नाही. चांगल्या कृतीलादेखील योग्य फळ मिळेलच असे होणार नाही. अशा तऱ्हेची विविध मते-भाकिते वाचायला-ऐकायला मिळतात.

सामान्य मानव या घटना बघून व हे ज्ञात झाल्यानंतर भांबावून जातो. निराश होतो. अनेकवेळा तत्त्ववेत्ते त्यांचे सांत्वन करण्यासाठी म्हणतात की, या गोष्टी, घटना विधिलिखित आहेत. भगवंताची ती लीला आहे, माया आहे. थकलेली व्यक्ती समाधान मानून गप्प राहते, कारण त्याच्याकडे दुसरा उपायच नसतो. त्यामुळे त्याला चिंता होते व विविध रोगांनी तो पछाडला जातो. मनोदैहिक व सदोष जीवनशैलीमुळे होणारे, सर्वांना सविस्तरपणे माहीत असलेले रोग कुणालाही सांगण्याची गरज नाही. हे काही नवीन रोग नाहीत. अपवाद नक्कीच आहेत. मात्र दुःखाची गोष्ट म्हणजे, पूर्वी वृद्धांना होणारे हे रोग आता तरुणांनाही जडताहेत. शहरांत राहणाऱ्या व्यक्तींना होणाऱ्या या व्याधी खेड्यातदेखील वाढत आहेत. श्रीमंतांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारे हे रोग गरिबांनासुद्धा होत आहेत.
समस्या प्रत्येक युगात असतात- कदाचित सत्ययुग सोडून- तिथे तर पवित्र देवी-देवता वास करतात. त्यांचे जीवन पवित्र असते. सर्वकाही सात्त्विक असते- विचार, आचार, आहार. सगळेकडे स्वर्गमय वातावरण असते- प्रेम, शांती, सुख, आनंद. या युगाबद्दलदेखील वर्णने आढळतात. प्रत्येक व्यक्तीला वाटेल की आपण सत्‌‍युगात जन्म घ्यावा. यात वावगे काही नाही.
विश्वात फक्त सदिच्छा असून चालत नाही. प्रत्येकाने आपल्या जीवनातील ध्येय ठरवायला हवे. त्यासाठी विविध शास्त्रांचा अभ्यास आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्राला हा नियम लागू पडतो. जीवनात आपल्याला काय हवे आहे, काय व्हायचे आहे- शिक्षित, उच्चशिक्षित, काय करायचे आहे, कोणते क्षेत्र निवडायचे आहे, काय मिळवायचे आहे- विद्या, धन, नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा… असे विविध पैलू आहेत. त्याप्रमाणे अभ्यास, ज्ञान व प्रयत्न हवेत.

भारतीय तत्त्ववेत्त्यांनी अशा विविध विषयांवर सखोल अभ्यास केलेला आहे, चर्चा केली आहे, चिंतन केले आहे. म्हणूनच आपल्याकडे एकापेक्षा एक अशी सरस शास्त्रे आहेत- वेद, उपनिषदे, आयुर्वेद, भौतिकशास्त्र, योगशास्त्र… त्यांना जोडून विषय सोपा व्हावा, उच्च तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे म्हणून रामायण, महाभारत, भागवत यांसारखी महाकाव्ये आहेत. अत्युच्च ज्ञानाचा उत्तम ग्रंथ म्हणजे श्रीमद्‌‍ भगवद्गीता… स्वतः पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी ते तत्त्वज्ञान आमचा प्रतिनिधी धनुर्धर अर्जुनाला निमित्त बनवून सांगितले आहे.

हे सर्व साहित्य एवढे विस्तृत आहे, सखोल, गूढ आहे की सामान्य व्यक्तीला एका जन्मात शिकणे शक्य नाही. आत्मसात करणे तर सोडूनच द्या. आख्यायिकांप्रमाणे अनेक सत्‌‍पुरुषांना हे ज्ञान भगवद्‌‍ कृपेने, सद्गुरू कृपेने लाभलेले आहे. आपण मात्र काही अंशांचाच विचार करू शकतो.
आपले क्षेत्र आहे योगशास्त्राचे म्हणून आपण थोडा विचार, अभ्यास, चिंतन करू शकतो. गेली काही वर्षे योगसाधकांकडे हितगुज चालू आहे. विविध विषयांवर वेळोवेळी याबद्दल विस्ताराने विचार झालेलाच आहे. आपला विषय आहे- सत्‌‍युगाचा, त्यात जन्म घेण्याचा. त्यासाठी योगशास्त्राच्या विविध मार्गात उच्च मार्गदर्शन आहे.
कर्मयोगामध्ये येतो तो कर्मसिद्धांत- जसे कर्म तसे फळ. तीन प्रकारचे कर्म शास्त्रकार नमूद करतात.

  • क्रियमाण ः दर जन्मात व्यक्ती करते ते कर्म.
  • संचित ः हे कर्म संचित खात्यात क्षणोक्षणी जमा होते.
  • प्रारब्ध ः दर जन्मात मिळते ते कर्म.
    ही गोष्ट समजण्यासाठी आपण साधे-सोपे व्यावहारिक उदाहरण बघूया. प्रत्येकजण आपल्या कष्टाप्रमाणे धन कमावतो. हे म्हणजे क्रियमाण कर्म. त्यातील काही धन व्यक्तीच्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी खर्च होते. राहिलेले धन आपण बँकेत बचत खात्यात टाकतो. त्यातील काही धन मुदतठेवीत ठेवतो. त्यावर धारकाला खर्चासाठी व्याज मिळते. यातील मुदतठेव म्हणजे संचित व व्याज म्हणजे प्रारब्ध कर्म.
    या विषयावर विस्ताराने विचार केला तर लक्षात येईल की, आपल्याला निवृत्त झाल्यानंतर व्याज जास्त मिळायला हवे तर मुदतठेवीतील रक्कम वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी काम करताना धन कमावतो. ते जास्त प्रमाणात संचितात ठेवायला हवे. रोजच्या व्यवहारात हे प्रत्येकाला माहीत आहे. म्हणून कर्मफळाच्या संदर्भात विषय समजायला सोपे होईल. संपूर्णपणे समजण्यासाठी थोडा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे. ‘कर्मयोग’ या योगमार्गात याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आहे.

तसेच अष्टांगयोगातील पहिली दोन अंगे अति महत्त्वाची आहेत.

  1. यम ः व्यक्ती व समाजाच्या सद्वर्तनासाठी आदेश- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. 2. नियम ः आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश- शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान. त्यानंतर पाचवे अंग- प्रत्याहार ः उपभोगाच्या ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांवर नियंत्रण. तद्नंतर सातवे अंग ध्यान व आठवे अंग समाधी ही दोन्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने केली तर सुंदर अनुभव येईल.
    भक्तियोग ः हा म्हणजे आत्मसमर्पणाचा मार्ग. येथे प्रेमभाव प्रमुख आहे; ज्यामुळे भावनिक संवर्धन होईल व मनाला स्थिरता लाभेल.
    ज्ञानयोग ः आत्मविश्लेषणाचा मार्ग. इथे बुद्धी प्रमुख आहे. विश्वाची वास्तविकता व सुख-दुःखाचे ज्ञान येथे पुरेपूर मिळते.
    या विविध विषयांवर आपण वेळोवेळी सविस्तर अभ्यास व चिंतन केले आहे.
    वैश्विक योग दिवसाचे -21 जूनचे- राष्ट्रसंघाचे एक घोषणावाक्य आहे ः ‘सहकार्य व शांतीसाठी योग.’
    योगशास्त्रातील तत्त्वज्ञान समजले व त्याप्रमाणे योगाभ्यास केला तर विश्वशांती सहज लाभेल. तेच तर सत्‌‍युग असेल. त्या सत्‌‍युगात जन्म घ्यायचा असेल तर प्रत्येक योगसाधकाने विचार व चिंतन करायला हवे. हे सर्व ज्ञान वेळोवेळी आचरणात आल्यानंतर प्रत्येकाला हे ध्येय प्राप्त होईल. तसे फळ नक्की मिळेल.

फक्त कर्मकांडात्मक योगाभ्यास नको. स्वामी विवेकानंद म्हणतात ः
‘तत्त्वज्ञानाशिवाय योगसाधनेला मजबूत पाया नाही. योगसाधनेला तत्त्वज्ञानाशिवाय फळ नाही.’ प्रत्येक योगसाधकाने स्वामिजींच्या या विधानावर चिंतन करून स्वतःची योगसाधना कशी आहे हे बघणे आवश्यक आहे.