संस्कारधन

0
24

योगसाधना- 608, अंतरंगयोग- 193

  • डॉ. सीताकांत घाणेकर

विविधता प्रत्येक क्षेत्रात, हा प्रकृतीचा स्थायी स्वभाव आहे. थोडे चिंतन केले तर कळेल की, त्यामुळेच तर जीवन रंगीन बनते; नाहीतर जीवनातला आनंद, रस कमी झाला असता.
या अशा विविधतेची कारणे अनेक असतील, पण एक सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या आत्म्यावर होणारे वेगवेगळे संस्कार!

विश्वात विविध तऱ्हेच्या व्यक्ती आहेत. प्रत्येकाचा स्वभाव, व्यवहार वेगळा. केव्हा केव्हा थोडे साम्य दिसते, पण ते अगदी नगण्य. म्हणूनच तर म्हणतात- ‘व्यक्ती तितक्या प्रकृती!’ विविधता प्रत्येक क्षेत्रात, हा प्रकृतीचा स्थायी स्वभाव आहे. थोडे चिंतन केले तर कळेल की, त्यामुळेच तर जीवन रंगीन बनते; नाहीतर जीवनातला आनंद, रस कमी झाला असता.

या अशा विविधतेची कारणे अनेक असतील, पण एक सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या आत्म्यावर होणारे वेगवेगळे संस्कार. हे संस्कारदेखील विविध आहेत. दर जन्मात होणारे- वर्तमान जन्मात होणारे- गर्भावस्थेत होणारे- जन्मानंतर होणारे- कौटुंबिक, समाजिक… तसेच आत्म्याचे नीजसंस्कार. खरे म्हणजे प्रत्येक आत्म्याचे नीज संस्कार एकच असतात. कारण आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. माता-पित्यासारखेच ईश्वरी संस्कार असतात. आत्मा पवित्र असतो. तो ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुख-आनंद स्वरूप व शक्तीस्वरूप असतो. दर जन्मात त्या संस्कारात थोडे-थोडे परिवर्तन होते- सकारात्मक व नकारात्मक. त्याप्रमाणे माणसाचा स्वभाव बदलतो. व्यवहार, बोल, कर्म… बदलतात.

यासंदर्भात एक छान कथा आहे-
ब्रिटिशांच्या काळात एक ठाणेदार म्हणे घोड्यावर बसून एका महान संताला भेटायला गेला. तिथे जंगलात एक वृद्ध व्यक्ती शांतपणे ध्यानस्थ बसली होती. त्या ठाणेदाराने जरा रागाने व उद्धटपणेच त्याला विचारले, “ये म्हाताऱ्या, मला या गावातील संताला भेटायचे आहे, तो कुठे भेटेल?”
ती व्यक्ती ध्यानस्थ असल्यामुळे त्याला उत्तर मिळाले नाही. ब्रिटिशांच्या काळातील ठाणेदार तो- गर्विष्ठ व अहंकारी. त्या व्यक्तीला शिव्या हासडतच तो पुढे गेला. थोडे दूर गेल्यावर एका व्यक्तीला त्याने तोच प्रश्न विचारला. त्याने सांगितले की आपण आल्या रस्त्यानेच परत जा. तिथे एका आंब्याच्या झाडाखाली एक व्यक्ती बसली आहे. बाजूला एक वडाचे झाडदेखील आहे. व्यक्ती वयस्क आहे. कपडे फाटके असतील.
ठाणेदार परत फिरला. त्याला आश्चर्य वाटले की, ज्या व्यक्तीला शिव्या देऊन आपण पुढे गेलो, ती व्यक्ती म्हणजेच ते संत होते. त्याला थोडा पश्चात्ताप झाला व थोडी भीतीदेखील वाटली. पण त्यांना भेटणे अगत्याचे होते, कारण ते संत जीवनातील समस्यांवर मार्गदर्शन करीत.
तो घोड्यावरून खाली उतरला. त्यावेळी संतानी आपले डोळे उघडले. ठाणेदार त्यांना नमस्कार करून म्हणाला, “बाबा, मी आपल्याला ओळखले नाही म्हणून मघाशी मी आपल्याशी उद्धटपणाने वागलो. मला क्षमा करा. मला आपला शिष्य बनायचे आहे!”

संत म्हणाले, “काही हरकत नाही. तुम्ही ठाणेदार असल्यामुळे थोडे कडक असणे हा आपला स्वभाव आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही कुठलीही वस्तू घेतो तेव्हा त्या वस्तूची सर्व तऱ्हेने तपासणी करतो व आपल्या परीक्षेला ती वस्तू ठीक उतरली तरच ती घेतो. आणि इथे तर तुम्ही गुरूच्या शोधात आहात म्हणून कदाचित तुम्ही माझी परीक्षा बघितली असेल. तुम्ही बोलला त्यावर माझी प्रतिक्रिया काय असेल तर झाले गेले विसरून चला. भूतकाळाचा विचार सोडा. वर्तमानात या. आपल्या कृतीची लाज वाटली असेल तर तसे परत करू नका. सत्कर्म करा. तुम्हाला फार मोठी संधी आहे गरिबांची, गरजूंची सेवा करण्याची. कारण तुम्ही एका मोठ्या सरकारी हुद्यावर आहात. आता आपण तुमच्या कामाचे बोलूया.”
ठाणेदार हे ऐकून स्वस्थ झाला. तसेच आपण योग्य गुरू शोधला व तसा मिळाला याचादेखील त्याला आनंद झाला. संताच्या सान्निध्यात राहून त्याचे जीवन बदलले, कारण त्या आत्म्यावर आता छान नवीन संस्कार झाले होते.

थोड्या लोकांना त्यांच्या मनाविरुद्ध काही घडले तर लगेच राग येतो. यासंदर्भात भृगू ऋषींची कथा आठवते. त्यांना म्हणे काही गहन प्रश्नांची उत्तरे हवी होती म्हणून ते ज्ञानदेवता ब्रह्मदेवाकडे गेले. सरस्वतीदेवीदेखील तिथे भेटेल म्हणून ते फार मोठ्या अपेक्षेने गेले.
ब्रह्मलोकांत गेले तर ब्रह्मदेव ध्यानस्थ बसले होते. बहुतेक समाधीवस्थेत होते म्हणून ऋषींनी साद घातला तरी डोळे उघडले नाहीत. भुगू ऋषींना राग आला. तसे ते रागीटच होते. तिथून ते थेट कैलासावर शंकर महादेवांना भेटायला गेले. तेदेखील सवयीप्रमाणे ध्यानावस्थेत होते. त्यांनीदेखील डोळे उघडले नाहीत. ऋषींचा राग आणखीन वाढला. ताडताड ते समुद्राच्या तळाला विष्णुलोकांत गेले. त्यावेळी श्रीविष्णू डोळे मिटून पडले होते. कदाचित शवासनात ध्यान करीत होते. लक्ष्मीमातेने त्यांचे स्वागत केले, पण श्रीविष्णू काही डोळे उघडीनात.
आता मात्र हे सर्व जास्तच झाले. एवढ्या मोठ्या ऋषींना काहीदेखील महत्त्व नाही म्हणजे काय? त्यांचा अहंकार व राग उच्च टोकाला पोचला. त्यांनी म्हणे विष्णूच्या छातीवर लाथ मारली. देव खाडकन उठले तर समोर रागाने तांबडे झालेले भृगू ऋषी मोठमोठ्याने ओरडत होते. त्यांनी मग घडलेली सगळी घटना श्रीविष्णूना ऐकवली.
श्रीविष्णूनी त्यांची माफी मागितली. ते उठून बसले. लाथ मारलेला पाय आपल्या हातात घेतला व शांतपणे म्हणाले, “ऋषीवर, जे घडले ते योग्य नाही. पण आपण एवढ्या जोराने लाथ मारली की आपला पाय दुखत असेल. मी जरा चेपून देतो.”

भृगू ऋषींना आश्चर्य वाटले. तेदेखील शांत झाले. बालपणात वयस्क लोक अशा तऱ्हेच्या पुराणांतील, रामायण-महाभारतातील अनेक सुंदर कथा सांगायचे. त्यावेळी वाटायचे की हे एवढे तपस्वी ऋषी असूनदेखील असे कसे वागतात?
आता कळते की त्यातील सत्य-असत्यता न बघता प्रत्येकाने त्यातून बोध घ्यायचा असतो. सारांश एकच- प्रत्येकाचे संस्कार, स्वभाव, व्यवहार वेगवेगळा असतो. तसेच आपल्या स्वभावामुळे इतरांना कष्ट व दुःख होत असेल तर आपण बदलायला हवे. आपले विचार सद्विचार हवेत. बोल मधुर हवेत. कर्म सत्कर्म, शुद्ध हवे. कारण कर्मसिद्धांताप्रमाणे- कर्म तसे फळ. म्हणजे आपले क्रियमाण तसे संचित व तसे प्रारब्ध.
आजच्या विश्वाकडे चौफेर नजर फिरवली तर लक्षात येते की प्रत्येककडे, प्रत्येक ठिकाणी- परिवार, समाज, कार्यक्षेत्र- नकारात्मक विचार वाढताहेत. त्यामुळे व्यवहारामध्ये पुष्कळ नकारात्मकता दिसते.
विश्वात शांती, सुख, आनंद, समृद्धी असावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यामुळेच तर शिक्षणसंस्था आहेत. जिथे फक्त जीविकेचे शिक्षण न देता, जीवनाचे शिक्षणदेखील देणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व पैलूंत जीवनविकास होईल- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धक व सर्वात मुख्य म्हणजे आध्यात्मिक. सद्गुण वाढतील, नम्रता वाढेल.

शास्त्रकार म्हणूनच म्हणतात- ‘विद्या विनयेन शोभते।’

  • विनयशील असतो तो खरा विद्वान, सुशिक्षित, सुसंस्कृत.
    थोडा विचार करून मी मागे वळून पाहतो तेव्हा वाटते की आमची आई- आजी निरक्षर असली तरी सुशिक्षित व सुसंस्कृत होती. कारण त्यांचे संस्कार तसे होते. एकत्र कौटुंबिक संस्थेत सर्वांवर चांगले सकारात्मक संस्कार आपोआप होत होते.

आपल्या ‘योगसाधना’ या सदराचा हेतू हाच आहे. विश्वातील विविध व्यक्तींचे स्वभाव व व्यवहार परिवर्तीत होऊन एक सुसंस्कृत समाज तयार होऊ दे! ‘21 जून’ या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे ध्येय तर हेच होते- सहयोग व शांतीसाठी योग. या वर्षीचे आहे ‘वसुधैव कुटुंबकम्‌‍!’ आपण सर्व योगसाधक त्या दिशेने सतत प्रयत्न करूया व आपल्या भारतीय ऋषींचे हे गोड स्वप्न पुरे करण्यासाठी झटूया.