मूळव्याध

0
9
  • डॉ. मनाली महेश पवार

आजची बदललेली जीवनशैली, बिघडलेली दिनचर्या, ऋतुचर्येचे पालन न करणे, तसेच आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे अवघड जागेवरची दुखणी निर्माण होतात. यात फिशर, भगंदर, मलावष्टंभ, मूळव्याधसारख्या आजारांचा समावेश होतो. पण सर्रास आढळणारा व सतत त्रास देणारा आजार म्हणजे मूळव्याध. जाणून घेऊया या मूळव्याधाविषयी…

आजची बदललेली जीवनशैली, बिघडलेली दिनचर्या, ऋतुचर्येचे पालन न करणे, तसेच आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे अवघड जागेवरची दुखणी निर्माण होतात. यात फिशर, भगंदर, मलावष्टंभ, मूळव्याधसारख्या आजारांचा समावेश होतो. पण सर्रास आढळणारा व सतत त्रास देणारा आजार म्हणजे ‘अर्श’ (मूळव्याध). आजकाल धावपळीच्या जीवनात व कॉर्पोरेट जीवनात चहा, कॉफी, मद्यपान, धूम्रपान यांचे स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली अतिसेवन होत आहे. सकाळचा नाश्ता घाईगडबडीत होत असतो. फास्ट फूड व जंक फूडचे अतिसेवन, चटपटीत व मसालेदार खाणे, तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन, बैठे काम, ‘एसी’मध्ये कामकाज व रात्री जागरण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनियमित खाणे-पिणे. या सर्व कारणांनी 80-90 टक्के लोकांना मूळव्याधाचा त्रास होतो.

मूळव्याध म्हणजे काय?
शौचास साफ न होणे तसेच मलविसर्जनासाठी कुंथावे लागणे. यामुळे गुदभागात लहान द्राक्षाच्या आकाराचे रक्तमांसयुक्त अंकुर निर्माण होतात. मलविसर्जनाच्या वेळी जोर देण्याच्या सवयीमुळे हे अंकुर वाढत जाऊन गुदनलिकेत अडथळा निर्माण करतात. शौचाचा खडा झाल्यानंतर याठिकाणी जखमा होतात व त्यातून रक्तस्त्राव होऊन वेदनाही होऊ शकतात.

आतड्याच्या शेवटच्या भागातील आणि गुदद्वाराजवळच्या नीला फुगून होणाऱ्या फुगवट्याला ‘मूळव्याध’ म्हणतात. बऱ्याच वेळा मूळव्याध गुदद्वाराच्या आत असतात. त्याला अंतर्गत मूळव्याध म्हणतात. कधीकधी या मूळव्याधाचे फुगवटे गुदद्वाराच्या बाहेर येतात. त्यांना बाह्य मूळव्याध असे म्हटले जाते. हे बाहेर आलेले कोंब रुग्णाच्या हाताला लागतात व डॉक्टरांनाही सहज तपासता येतात.

  • मूळव्याध जास्त प्रमाणात कोणाला होतो?
  • गर्भवती स्त्रीमध्ये वाढलेल्या गर्भाशयाचा नीलांवर दाब पडतो. बाळंतपणात स्त्रीला गर्भाला बाहेर पडण्यास मदत म्हणून कुंथावे लागते तेव्हा गुदद्वाराच्या आतड्यावर (नीलांवर) दाब पडतो व मूळव्याध होतो.
  • मलावरोधाचा सतत त्रास असणाऱ्यांना संडासला घट्ट होते व त्यामुळे कुंथावे लागते. अशा परिस्थितीत गुदद्वाराच्या नीलांवर सतत दाब पडून शिरा फुगतात व मूळव्याध होतो.
  • पौरुषग्रंथीच्या वाढीमुळे मूत्रप्रवृत्तीस सतत जोर करण्याच्या सवयीमुळे मूळव्याध निर्माण होऊ शकतो.
  • कधीकधी मूळव्याधामागे गंभीर आजारही असू शकतो. उदा. मोठ्या आतड्यांचा कॅन्सर किंवा यकृताचा सिरोसिस हे आजार मूळव्याचे कारण असू शकते.
  • मूळव्याधीतील काही लक्षणे
  • मूळव्याधीतील रक्त गोठले तर वेदना होते, अन्यथा केवळ मूळव्याधीमुळे क्वचितच वेदना होते.
  • रक्तस्राव हाच मूळव्याधीचा मोठा त्रास असतो.
  • गुदद्वाराच्या आतील रक्तवाहिन्या फुगतात, त्यामुळे सूज व वेदना रुग्णाला जास्त प्रमाणात जाणवतात.
  • प्राथमिक लक्षणांमध्ये शौचास साफ न होणे, हे एकच मुख्य लक्षण दिसते.
  • शौचाच्या वेळी वेदना, दाह, रक्तस्राव होणे, कोंब बाहेर येणे, चिकट स्त्राव येणे, सतत खाज येणे ही काही लक्षणे कमी-जास्त प्रमाणात असतात किंवा नसतात.
  • बऱ्याच वेळा तिसऱ्या अवस्थेमध्ये हे फुगवटे बाहेर येतात. रुग्णास बसताना जास्त वेदना व दाह होतो.
    मूळव्याधीचा हा आजार योग्य वेळी उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे मूळव्याधीकडे दुर्लक्ष करता कामा नये. दुर्लक्ष केल्यास रक्ताल्पता व जंतुसंसर्गाचा धोका बळावतो.
  • मूळव्याध टाळण्यासाठी काय कराल?
  • भरपूर पाणी प्यावे.
  • दररोज व्यायाम करावा.
  • शौचास जोर लाऊ नये.
  • एका जागी जास्त वेळ बसू नये.
  • वजनदार गोष्टी उचलणे टाळावे.
  • आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक ठेवावे.
  • जेवणाच्या वेळा नियमित सांभाळाव्यात.
  • अतिरिक्त वजन कमी करावे.
  • मसालेदार पदार्थ, मांसाहार, मद्यपान किंवा धूम्रपान यांचा अतियोग टाळावा.
  • रात्रीची जागरण करू नका.
  • मल नरम राहील अशी योजना करावी.
  • मूळव्याधीवर उपचार
  • गुदद्वाराच्या ठिकाणी दाह, वेदना, रक्तस्राव, खाज असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून ‘प्रोक्टोस्कोपी’ तपासणी करून मूळव्याध आहे की फिशर याचे प्रथम निदान करून घ्यावे. अचूक निदान झाल्यावरच योग्य उपचारपद्धती करून सगळी पथ्ये पाळल्यास मूळव्याध ही व्याधी मुळापासून बरी होऊ शकते.
  • काही उपचारपद्धती
  • इंजेक्शन चिकित्सा ः मूळव्याधीच्या प्रथम अवस्थेमध्ये योग्य औषधी चिकित्सेचा वापर केल्यास लक्षणे कमी होतात. मूळव्याधीच्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून इंजेक्शन ट्रिटमेंट घेतल्यास मूळव्याधीतील रक्तस्राव एक-दोन दिवसांत बंद होतो. ही पूर्णतः वेदनाविरहित उपचारपद्धती आहे. रुग्णास ॲडमिट राहावे लागत नाही.
  • रबरबँड लायगेशन ः पिल्स गनद्वारे मूळव्याधीच्या मुळाशी रबरबँड बसविला जातो. मूळव्याधीच्या कोंबाचा रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडतो.
  • क्षारसूत्र चिकित्सा ः मूळव्याधीच्या मुळांशी क्षारसूत्र बांधले जाते. या चिकित्सेमध्येही रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडतो. भगंदर या व्याधीमध्ये क्षारसूत्र चिकित्सेचा विशेष फायदा होतो.
  • फ्रायोसर्जरी ः या उपचारपद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तस्राव बंद करण्यासाठी मूळव्याधीच्या कोंबांना न्यूट्रस ऑक्साइड वायूचा वापर करून गोठविले जाते.
  • लेझर चिकित्सा ः मूळव्याधीच्या कोंबावर लेझर किरणांचा मारा करून रक्तवाहिन्या गोठवल्या जातात. यामुळे मूळव्याधीमधील रक्तस्राव बंद होतो.
  • डॉपलर गाइडेड हिमोराईड आर्टरी लायगेशन ः डॉपलर गाइडेड हिमोराईड (मूळव्याध) आर्टरी (रक्तवाहिनी) लायगेशन (बांधणे) या उपचारपद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तपुरवठा मुळापासून बंद केला जातो.
  • स्टेपलट सर्जरी ः मूळव्याधीचे कोंब स्टेपलर गनमध्ये घेऊन गन शूट केली जाते. या सर्जरीमध्ये मूळव्याध कट होण्याचे व स्टेपल होण्याचे कार्य एकाच वेळी होते.
  • शस्त्रकर्म ः मूळव्याधीच्या मुळाशी छेद घेऊन काढून टाकले जाते, याला ‘हिमोरायडेक्टोमी’ म्हणतात.