संत सोहिरोबानाथ आंबिये त्रिशताब्दी जयंती महोत्सवात भक्तीची लयलूट…

0
751

– नितीन कोरगावकर

‘‘हरी भजनावीण काळ घालवू नको रे…|
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे..॥
असा दिव्य संदेश देणारे गोमंतकीय संत कवी सोहिरोबानाथ आंबिये यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा गोवा शासनाच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे मनवला जात आहे, ही गोष्टच मुळी आजच्या काळात स्पृहणीय आहे.
संत सोहिरोबानाथांचे कार्य हे महाराष्ट्रातील संत परंपरेला पूरक आणि या परंपरेत महत्त्वपूर्ण भर घालणारे किंबहुना संत ज्ञानेश्‍वरांच्या तोडीचे कार्य त्यांनी संत वाङ्‌मयाच्या क्षेत्रात करून ठेवले आहे. अशा या संत महात्म्याची त्रिशताब्दी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायलाच हवी होती आणि शासकीय पातळीवर ती साजरी होत आहे हे विशेष!शासनातर्फे पेडणे येथे संत सोहिरोबानाथ त्रिशताब्दी जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मात्र २१ ते २५ जानेवारी या काळात कला अकादमीच्या दर्या संगमावर कला आणि संस्कृती संचालनालय, कला अकादमी आणि पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला संत सोहिरोबानाथ आंबिये भक्तिसंगीत समारोह व याच कालावधीत भरविलेले संत सोहिरोबानाथ आंबिये ग्रंथ प्रदर्शन तसेच टपाल खात्याने संत सोहिरोबानाथांवर काढलेला पोस्टाच्या लखोट्याचे प्रकाशन हे कार्यक्रम सोहिरोबानाथांचे माहात्म्य अधोरेखित करणारे होते.
सोहिरोबानाथांच्या स्मृती जागविण्यासाठी आयोजित केलेला भक्तिसंगीत समारोह आणि ग्रंथप्रदर्शन हे उपक्रम स्तुत्य असेच होते परंतु त्याला मिळालेला लोकांचा प्रतिसाद मात्र उत्साहवर्धक नव्हता. ग्रंथोत्सवातील पन्नास-साठ पुस्तकांच्या दालनात विविध विषयांवरील विपुल प्रमाणात पुस्तके वाचकांची वाट पहात होती. परंतु पाच दिवसात पहिले दोन-तीन दिवस पुस्तक विक्रेते अक्षरशः पुस्तक विकत घ्यायला दालनांकडे वाचकच न फिरकल्याने हवालदिल झाले होते. तिसर्‍या दिवशी अल्प प्रमाणात पुस्तक खरेदी झाली तर शेवटचे दोन दिवस सुट्टीचे असल्याने त्यातल्या त्यात झालेल्या पुस्तक खरेदीमुळे पुस्तक विक्रेत्यांनी सुस्कारा सोडला. या ग्रंथोत्सवात पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणांहून जे पुस्तक विक्रेते आले होते त्यात नामवंत वितरण संस्था होत्या आणि त्यांच्या दालनात पुस्तकेही दर्जेदार होती. परंतु अपेक्षित प्रमाणात त्यांच्या पुस्तकांची खरेदी न झाल्याने त्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला. कारण त्यांना या ग्रंथोत्सवात आपली पुस्तकांची दालने मांडण्यासाठी तसा खर्चही बराच होता.
स्थानिक पुस्तक-विक्रेत्यांची स्थिती तर त्याहून वाईट होती कारण बाहेरच्या विक्रेत्यांच्या तुलनेत त्यांची झालेली पुस्तक-विक्री नगण्यच होती. हाच प्रकार भक्तिसंगीत समारोहाच्या बाबतीत घडला. या समारोहात ‘संतवाणी’, ‘सोहिरा म्हणे…’, ‘कबीर निर्गुणी भजन’, ‘चर्च संगीत (क्वायर)’, ‘एकनाथी भारूड’, ‘गुरू माउली’ असे भक्तिसंगीताचे चांगले कार्यक्रम होते परंतु रसिकांची उपस्थिती मात्र खूपच कमी होती.
कला अकादमीच्या दर्यासंगमावर लोकोत्सवाला अलोट गर्दी लोटली होती. अर्थात त्यात सर्व प्रकारचे सर्व थरातील लहान-थोर, बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व प्रकारचे, गोव्याच्या वेगवेगळ्या भागातील लोक रोज हजेरी लावायचे. हस्तकलांचे शेकडो स्टॉल असल्याने तिथेही गर्दी असायची. खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची रीघ लागलेली असायची. तशी गर्दी इथे अपेक्षित नव्हतीच मुळी परंतु किमान चारशे-पाचशे रसिकांची या भक्तिसंगीत संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थिती अपेक्षित होती.
गोव्यात आज विशेषतः पणजीत एवढे कार्यक्रम होत असतात की रसिकांना प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य होत नाही. मग त्याचा कार्यक्रमाच्या उपस्थितीवर परिणाम होतो. दर्यासंगमावर भक्तिसंगीताचे कार्यक्रम चालू असताना अकादमीच्या खुल्या नाट्यगृहात चिन्मय मिशन पणजीचा भगवद्गीतेवर ‘ज्ञानयज्ञ’ सुरू होता व त्यात स्वामिनी विमलानंदा यांची रसाळ प्रवचने चालू होती. तिथे बौद्धिक कार्यक्रम असूनही श्रोत्यांची चांगली उपस्थिती होती. भक्तिसंगीत संमेलनादरम्यान बाजूला कांपाल मैदानावर ‘वाईन महोत्सव’ झाला तिथे हजारोंच्या संख्येने लोक मौज-मजा करायला आले होते. त्यात प्रतिष्ठित लोकांचाही भरणा होता. सांगायचे तात्पर्य, अभिजात कला विषयक उपक्रमांना रसिकांची उपस्थिती लागली पाहिजे. संत सोहिरोबानाथ भक्तिसंगीत समारोह सोहिरोबानाथांच्या गावी पालये येथे झाला असता किंवा काही कार्यक्रम पालये येथे व काही अन्यत्र झाले असते तर निश्‍चितच उपस्थिती चांगलीही लाभली असती व या कार्यक्रमांचे सार्थकही झाले असते. भक्तिसंगीत संमेलनात ‘संतवाणी’ या कार्यक्रमात भुवनेश कोमकली व शाश्‍वती मंडळ या नामवंत गायकांनी सुरदास, कबीर, तुलसीदास, मीराबाई यांच्या रचना छान म्हटल्या. समिरा गुजर जोशी यांचे निवेदनही चांगले होते. परंतु या पहिल्याच कार्यक्रमाला उपस्थिती खूपच कमी होती. दुसर्‍या दिवशी संत सोहिरोबानाथांच्या निवडक अभंगांना चाली देऊन युवा प्रतिभेचे संगीतकार मयूरेश वस्त यांनी डॉक्टर शशांक मक्तेदार, प्रचला आमोणकर, रूपेश गावस, सचिन तेली, वीणा मोपकर, विक्रांत नाईक या गायक मंडळींना घेऊन केलेला ‘म्हणे सोहिरा’ हा कार्यक्रमही चांगलाच झाला. परंतु या कार्यक्रमाला त्या मानाने रसिकांची थोडीफार उपस्थिती लाभली होती.
तिसर्‍या दिवशी संगीत नाटक अकादमी व पद्मश्री पुरस्कार प्राप्त कलाकार प्रल्हादसिंग टिपानिया व साथी कलाकारांचा मालवा लोकसंगीत शैलीतील कबीर निर्गुणी भजनांचा कार्यक्रम झाला. पारंपरिक मालवा शैलीतील कबीरांची निर्गुणी भजने ऐकणे हा वेगळा आनंदानुभव होता. तसेच चौथ्या दिवशी भानुदास बैरागी व साथी (कोपरगाव-अहमदनगर) यांचा ‘एकनाथी भारूड’ कार्यक्रम खरोखरच उत्कृष्ट झाला. त्याच दिवशी फादर ग्लेन डिसिल्वा व साथी वाडे-सांगे यांच्या चर्चसंगीतावर पारंपरिक क्वायर झाला परंतु रसिकांची उणीव भासली.
पाचव्या आणि समारोपाच्या दिवशी ‘शब्दश्री’ ठाणे निर्मित ‘गुरुमाऊली’ हा गुरुमहिमेवरील अभंगरचनांचा असाच एक भावपूर्ण कार्यक्रम झाला. त्यात धनंजय म्हसकर, प्रशांत काळुंद्रेकर व मधुरा कुंभार या तरुण गायकांनी सुरेख अभंगरचना पेश केल्या. धनश्री लेले यांचे निरूपण सुश्राव्य होते मात्र या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी रसिकांची उपस्थिती नव्हती तरी हे कलाकार समरसून गायिले.

क्षणचित्रे…
संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्यावर आधारित टपाल तिकिटयुक्त लखोट्याचे प्रकाशन.
देशभरातून ६० पेक्षा अधिक ग्रंथविक्रेते आणि प्रकाशकांचा सहभाग असलेले संत सोहिरोबानाथांचे ग्रंथप्रदर्शन.
भक्तिसंगीत समारोहात ‘संतवाणी’, ‘सोहिरा म्हणे..’, ‘कबीर भजन’, एकनाथी भारूड असा बाहेरील व स्थानिक कलाकारांनी सादर केलेला कार्यक्रम.
भक्तिसंगीत समारोप सोहळ्यात ‘गुरुमाउली’ हा ठाणेनिर्मित भक्तिरसपूर्ण कार्यक्रम.
संत सोहिरोबानाथ आंबिये त्रिशताब्दी जयंतीचे उर्वरित कार्यक्रम पणजीबाहेर इतरत्र झाले तर गोव्याच्या इतर भागातील रसिकांना त्याचा लाभ घेता येईल व उपस्थितीही चांगली लाभू शकेल असे वाटते.