माझी शाळा

0
2026

– संदीप मणेरीकर
किलबिल पक्ष्यांची रोजच चाले
वारा नेहमीच गुणगुणे गाणी
अशा निसर्गाच्या छान कोपर्‍यात
शाळा माझी गजबजे मुलांनी
खरंच वर सांगितल्याप्रमाणे माझी शाळा होती. मुळात कोकण म्हटलं की, निसर्गाने चवर्‍या ढाळणं हे आलंच. त्यामुळे निसर्गाच्या रम्य परिसरात अशी ही शाळा होती. आजूबाजूला उंच झाडं, त्यावर पक्ष्यांचा किलबिलाट, वार्‍यामुळे होणारी पानांची सळसळ, पावसात अंगणातून वहात जाणारं पाणी, सुसाट वार्‍यामुळे डोलणारी झाडं, मध्येच कुत्र्याचं भुंकणं, गाईंचं हंबरण आणि कोंबड्याची बांग.. किती मस्त वातावरण. आणि अशा या रम्य वातावरणात मी इयत्ता चौथीपर्यंत शिकलो. त्यानंतर घोटगेवाडी येथे जरा मोठी शाळा मिळाली. तीही इयत्ता सातवीपर्यंत. आम्ही ज्या शाळेत जात होतो, ती शाळा खरं तर आता पडलेलीच आहे. आमच्या एका वाडीपुरती, म्हणजे आवाठापुरती असलेली ही शाळा केवळ एका खोलीची होती. पण त्या एका खोलीत चार वर्ग भरत होते. इयत्ता चौथीपर्यंत असलेली ही शाळा एक शिक्षकी होती. अर्थात शाळेत मुलंही थोडीच होती. वर्ग चार पण एक खोली. कौलांची आणि शब्दशः चार भिंतींची ती शाळा होती. आमच्या या आवाठातून जेमतेम १५ मुलं शिकण्यासाठी या शाळेत येत होती, त्यांच्यासाठी ही शाळा चाललेली होती. त्यामुळे ती शाळा लहानच असणार. पण लहान असली तरी संस्कार मात्र आमच्यावर चांगले होत होते. मुळात मुलं कमी असल्यामुळे गुरुजींचं आम्हा प्रत्येकावर बारीक लक्ष असायचं. त्यामुळे प्रत्येकाची प्रगती कळत असायची. अक्षरापासून अभ्यासापर्यंत आणि खेळापासून जेवणापर्यंत सारी चौकशी व्हायची. त्यामुळे आम्ही सर्वच बाबतीत तसे तरबेज होतो.
शाळेत त्यावेळी गोकुळाष्टमी आणि सरस्वती पूजन हे दोन सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जायचे. शारदोत्सवाला तर फुगड्या, भजन, खेळ होत असत. आवाठातील सारीजणं यावेळी येत असत. एक वेगळी मजा यावेळी यायची.
शाळा आमच्या घरापासून अगदी पाच सात मिनिटांच्या अंतरावर होती. त्यामुळे आम्ही चालत जात होतो. वाट वळणावळणाची, शेतातून, झाडांखालून जाणारी होती. सकाळी १० ते ५ या वेळेत शाळा भरायची. पण अशा या वळणावळणाच्या वाटेमुळे उन्ह लागत नव्हतं किंवा जाणवत नव्हतं. दुपारी आम्ही जेवायला घरी येत होतो व लगेच जेवून परत जात होतो. पण त्यावेळीही उन्हाचा आम्हांला कधी त्रास झाला नाही.
शाळा जरी पहिलीपासून असली तरी मी साधारण पाचव्या वर्षी मोठ्या भावाबरोबर शाळेत जात होतो. माझ्याप्रमाणेच इतरही कोणी तरी लहान मुलंही आपल्या मोठ्या भावासोबत वा ताईसोबत शाळेत येत असत. त्यानंतर पहिली ते चौथीपर्यंत आम्ही त्या शाळेत शिकलो. पाटी-पेन्सिल घेऊन अभ्यास, त्यानंतर कित्ता असायचा. बांबूचे बोरू असायचे. त्या बोरूने कित्ते गिरवायचे. शाईची दौत, शाईचं पेन क्वचित वापरायचं. बहुतेक कित्ते गिरवणे हाच अभ्यास असायचा. पाटीवर अभ्यास असायचा. कधी कधी तो अभ्यास दप्तरामुळे किंवा पुस्तकामुळे पुसून जायचा आणि अभ्यास केलेला असूनही गुरुजींना दाखवता न आल्यामुळे अभ्यासच केला नाही असं गुरूजी म्हणायचे आणि त्यांचा मारही खाल्लेला आहे. अंकलिपी आणि कित्ता हीच त्यावेळची पुस्तकं. ‘अंकलिपीला मालवणी भाषेतील मुलं ‘अंकपेटी’ असं म्हणत. सुरूवातीला आम्हांला हसू येई पण मग त्याची सवय झाली. त्यानंतर मग पुस्तकं सुरू व्हायची. तीही पुस्तकं आम्ही पुढच्या इयत्तेत गेलेल्या मोठ्या भावाची वापरायची किंवा आवाठात आणखी कोणी असेल ज्याला पाठीमागे भाऊ-बहीण नाही तर त्याची वापरायची. साधारण दुसरीपासून मराठी पुस्तकात गोष्टी सुरू होत. पहिलीच्या पुस्तकात मात्र ‘कमल नमन कर’ असे धडे किंवा ‘आज शाळेचा पहिला दिवस, आज कमल भेटेल, नयन भेटेल अभयही भेटेल’, असे धडे असायचे. आणि आम्हांला असलेले ते गुरुजी, त्यांचं नाव ‘डवरी’, कोल्हापूर-भुदरगड इथले ते गुरुजी आम्हांला ते शिकवायचे.
शाळेत एकच खोली असल्यामुळे इतर मुलांना अभ्यास द्यायचा आणि ज्यांना शिकवायचं त्यांना ते गुरूजी आपल्या टेबलभोवती बोलवत. चार ते पाच मुलं असल्यामुळे आम्ही टेबलभोवती उभे रहात असू. गुरुजी खुर्चीवर बसून शिकवत. त्यावेळी इयता-इयत्तांमधील कोणीही मुलं गडबड वा गोंधळ करत नव्हती. जास्त गडबड झाल्यास गुरूजींनी केवळ ‘ए’ एवढं म्हटलं तरी मुलं लगेच शांत व्हायची.
पावसाळ्यात काही मुलं पाटी पुसण्यासाठी ‘तेरडा’ ही जी केवळ पावसात उगवणारी वनस्पती आहे तिच्या मुळ्या काढून त्यांची छोटीशी मोळी बांधून शाळेत घेऊन येत. त्या तेरड्याच्या खोडात पाणी असे. त्यामुळे पाण्यासाठी मुद्दाम बाहेर पडवीत कौलावरून पडणार्‍या पाण्यासाठी जावं लागत नसे. जाग्यावरून न उठताच काम होत असे. मात्र काही मुलं मुद्दाम परत परत बाहेर जायला मिळतं, पावळ्यातून (पागोळ्यातून) येणार्‍या पाण्यात खेळायला मिळतं म्हणून परत परत पाटी पुसण्याचं निमित्त करत असत. पण मुली मात्र त्या तेरड्याने पाट्या पुसत. कधी कधी त्यांची उसनवारी चाले. ‘आज मी तुका चार तुकडे दिलंय, माका उद्या दिवक व्हये हां’ आणि आठवणींनं तशी देवाणघेवाण व्हायची. ही मुलगी ते तुकडे आठवणीनं मागायची किंवा ती आठवणीनं द्यायची तरी.
शाळेत असतानाच अशी उसनवारीची सवय सुरू होत असावी. त्याकाळी आम्ही शाईची पेनं वापरत असू. अचानक लिहिता लिहिता पेनातली शाई संपायची. मग कोणाकडून तरी चार थेंब शाई मागितली जायची आणि दुसर्‍या दिवशी ते चार थेंब परत दिले जायचे. तसाच प्रकार पाटीवरच्या पेन्सिलचा व्हायचा. पेन्सिलचा तुकडा जेवढा दिलेला असेल तेवढाच तुकडा दुसर्‍या दिवशी मागून घेतला जायचा. बिनव्याजी ही उधारी चालायची.
डवरी गुरुजी तेव्हा एका कुठल्या तरी पौर्णिमेला ‘चांदणी भोजन’ हा एक सुंदर कार्यक्रम आयोजित करत होते. चांदण्या रात्री सगळ्या मुलांना शाळेत बोलावून शाळेच्या अंगणात सगळ्यांना जेवण दिलं जात असे. त्यावेळी गुरुजी आम्हांला चंद्र, चांदण्या, तारे, ग्रह यांची माहिती देत. शाळेच्या अंगणात दोन लहान लहान मैदानं होती व त्यांच्याभोवती मस्तपैकी बाग करण्यात आली होती. काही सुंदर फुलझाडं लावण्यात आली होती. त्या बागेला दर शनिवारी पाणी घालणं हा एक आमचा छंद होता. तसंच शाळेची जमीन शनिवारी शेणानं सारवली जात असे. त्यासाठी पाणी आणण्याचं काम आम्ही करत असू. मुलांनी पाणी आणण्याचं काम तर शेण काढण्याचं काम मुलींनी करायचं, अशी विभागणी केलेली होती. शाळेची जमीन सारवून झाली की अंगणात उतरायचो आम्ही आणि अंगणंही सारवली जायची.
पावसात ही कामं नसल्यामुळे शनिवारी कविता म्हणणे हाच अभ्यास असायचा. एकत्रच वर्ग असल्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्याला चौथीच्याही कविता पाठ असायच्या. सुंदर सुंदर चाली लावल्या जायच्या आणि चालीत कविता म्हटल्या जायच्या. कविता, पाढे, अगदी तोंडपाठ असायचे. यावेळी ‘मला आवडते वाट वळणाची’, ‘इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे’, ‘या बालांनो या रे या’, ‘या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया’ किंवा ‘या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया’ अशा छान छान कितीतरी कविता शिकलो.
डवरी गुरुजी कधी कधी रजा घेत त्यावेळी घोटगेवाडी येथील शाळेतून कोणीतरी गुरुजी आम्हाला शिकवायला येत. मग तर आमची आणखीच मजा. कारण ते काही जास्त शिकवण्याच्या भानगडीत पडत नसत. संध्याकाळी शाळाही लवकर सोडली जात असे. घरी आल्यावर आजी किंवा दादा विचारीत, ‘कोण गुरुजी आज शिकवायला आले होते, काय शिकवलं, वगैरे वगैरे..!
यथावकाश मी चौथीत पोहोचलो आणि त्यावेळी आमचे ‘डवरी’ या गुरुजींची बदली झाली. मात्र त्यावेळी बदली झाल्यानंतर तेथून निघताना डवरी गुरुजी रडले, हे मी पाहिलं. त्यानंतर घोटगेवाडी येथीलच ‘शेटकर’ हे गुरुजी आम्हांला शिकवायला आले. या शेटकर गुरुजींच्या हाताखाली मी एक वर्ष होतो. आणखी एक या शाळेचं विशेष म्हणजे, पाचवीत शिकण्यासाठी सर्व मुलं घोटगेवाडी येथील शाळेत जात. त्यावेळी त्या शाळेत जाणार्‍या कोणीही जर शाळा चुकवली तर दुपारनंतर तो मुलगा या आपल्या जुन्या शाळेत येत असे. आमच्यासोबत गप्पा मारत असे. आपण मोठ्या शाळेत जातो त्यामुळे त्या शाळेतलं मोठेपण सांगत असे आणि अशा या विद्यार्थ्याला या शाळेत पूर्ण मुभा होती. या शाळेत एक पद्धत होती. एखादा विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत आला नाही तर तो का आला नाही हे पाहण्यासाठी, त्याला बोलावण्यासाठी गुरुजी दोन मुलांना त्या मुलाच्या घरी पाठवत. अर्थात तसं काही कारण असल्याशिवाय कोणी शाळाही चुकवत नव्हतं.
खरंच, शाळेत जात असतानाचे ते दिवस आठवले की बालपण किती रम्य असतं याची जाणीव होते. खेळ, गाणी, कविता यातच सारं जीवन! कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही, ताण नाही, तणाव नाही. काहीच नाही. मस्तपैकी जगत रहायचं. पण हे दिवस कापरासारखे असतात. भर्रर्रकन कधी संपून जातात तेच कळत नाही. आता वाटतं की, ते शाळेतले दिवस संपायलाच नको होते.
आज ही माझी शाळा पडण्याच्या अवस्थेत आहे. काही वर्षांपूर्वी दुसरी चिरेबंदी शाळा बांधण्यात आली. पण आज आवाठात या शाळेत शिकण्यासाठी मुलं नाहीत. दोन तीन मुलं असल्यामुळे ती सारी घोटगेवाडी येथे जातात. त्यामुळे चिरेबंदी शाळा बंद आहे तर आमची जी शाळा पहिली शाळा ‘नूतन विद्यामंदिर’ ही आता पडण्याच्या अवस्थेत आहे. त्या शाळेकडे दुर्लक्ष केलं जात आहे किंवा दुरुस्ती कोणी करायची?… असा प्रश्‍न आहे. त्यामुळे एकेकाळी मोठ्या दिमाखात उभी असणारी ही शाळा आज विपन्नावस्थेत आहे.