संजीव वेरेकर यांना विश्‍व कोकणी केंद्राचा पुरस्कार

0
122

कोकणी कवी संजीव वेरेकर यांना विश्‍व कोकणी केंद्राच्या कोकणी भाषा व संस्कृृती केंद्रातर्फे दिला जाणारा विमला पै शणै कविता पुरस्कार जाहीर झाला आहे. वेरेकर यांच्या ‘अस्वस्थ सूर्य’ या कवितासंग्रहाला हा पुरस्कार लाभला आहे. एक लाख रु., स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कवी वेरेकर यांचे भावझुंबर, मुंबर, गावांतली सांज, अस्वस्थ सूर्य, पडवेवेली सवणी असे कवितासंग्रह, माड ओसाड जातना, तिपय असे एकांकीका संग्रह असे साहित्य प्रकाशित झाले आहे. हल्लीच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘हाडामासाची देवळां’ या व्यक्तीचित्रणात्मक पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
कोकणीसाठी आतापर्यंत निरपेक्ष भावनेने काम केले. उदय म्हांबरे, संदेश सामंत, मुकेश थळी अशा मित्रांच्या सहवासामुळेच साहित्यसेवा करण्यास प्रोत्साहन लाभले, असे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. दरम्यान, विश्‍व कोकणी केंद्राचा कथेसाठीचा पुरस्कार मंगळूर येथील ऍडवीन डिक्रुझ यांना मिळाला आहे. दि. ६ नोव्हेंबर रोजी मंगळूर येथील कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे.