पणजीचेही ‘श्रीनगर’ होणे शक्य : महापौर

0
103

श्रीनगरप्रमाणेच पणजी शहरालाही पुराचा धोका आहे, असा इशारा पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यानी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिला. शहरातील लोकांनी कचर्‍याची व विशेष करून प्लॅस्टिक कचर्‍याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावली नाही तर पणजी शहरात हाहाकार माजू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पणजी शहरातील नागरिक बेजबाबदारपणे वागत असून मिळेल तेथे कचरा टाकून देत असल्याचे ते म्हणाले. लोकांनी रस्त्यावर, गटारात वगैर कचरा टाकून देणे थांबवण्याची गरज आहे. लोकांच्या या बेजबाबदारपणामुळे गटारे तुंबतात व शहरात पाणी साचून राहते, असे ते म्हणाले.
काश्मीरात पडला तसा मुसळधार पाऊस पडला तर तुंबलेल्या गटारांमुळे पणजी पाण्याखाली जाऊ शकते. पणजी शहरात पाणी वाहून जाण्यासाठीची १० ते १२ मार्ग आहेत. कला अकादमी जवळचा परिसर, १८ जून रोड, पोलीस स्थानक रोड, नवहिंद भवन जवळचा रोड यांचा त्यात समावेश आहे. पाणी वाहून जाण्यासाठीचे हे मार्ग कचर्‍यामुळे बंद झाल्यास हाहाकार माजू शकतो असा इशारा त्यानी दिला. महापालिका दर वर्षी पावसाळ्यापूर्वी तुंबलेली गटारे उसपण्याचे काम हाती घेत असते पण हे काम लोकांना वाटते तेवढे सोपे नसल्याचे सांगून लोकांनी कचरा जबाबदारपणे हाताळावा अशी सूचना त्यांनी केली. पणजी शहराची टेकडी असलेल्या अल्तिनोवरून पावसाळ्यात पाण्याबरोबर प्रचंड कचरा वाहून येत असतो. त्यात प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असतो. शिवाय गाड्यांचे टायर, चपला, बॅगा, थरमोकल अशा कितीतरी टाकावू वस्तूंचा त्यात समावेश असतो. महापालिका गटारे स्वच्छ करण्याचे काम हाती घेते तेव्हा हा कचरा सापडतो, असे फुर्तादो म्हणाले. गटारात साचून राहिलेला हा कचरा बाहेर काढणे हे लोकांना वाटते तेवढे सोपे काम नसल्याचे ते म्हणाले.
काश्मीरात अडकलेले पालिका आयुक्त गोव्यात परतले
श्रीनगर येथे आलेल्या पुरामुळे गेले कित्येक दिवस तेथे अडकून पडलेले पणजी महापालिकेचे आयुक्त संजीत रॉड्रिग्ज हे शनिवारी उशिरा रात्रौ गोव्यात परतले. दोन दिवसांपूर्वीच आपण श्रीनगर येथून लेह येथे आलो होतो. नंतर लेह येथून चंदिगड गाठले व काल चंदिगढहून मुंबई व नंतर मुंबईहून गोवा असा प्रवास केला. शनिवारी रात्री ११ वाजता आपण गोव्यात पोचल्याचे ते म्हणाले. आपण श्रीनगरला नव्हे तर लडाखला गेलो होतो. श्रीनगरहून आपणाला लडाखला जायचे होते. पण ज्या दिवशी श्रीनगरला पोचलो त्याच दिवशी तेथे मोठा पूर आल्याने आपण तेथे अडकून पडल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. आपण दरवर्षी लडाख येथील डोंगराळ भागात ट्रेकिंगसाठी जात असतो. यापूर्वी किमान चार वेळा गेलो असल्याचे ते म्हणाले.