संजीवनी कारखाना बंद करणार नाही ः मुख्यमंत्री

0
288

संजीवनी सहकारी साखर कारखाना कायमचा बंद केल जाणार नसल्याचा पुनरुच्चार काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. काल ऊस उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी आश्वासन देताना त्यांनी संजीवनी साखर कारखाना सरकार बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले. संजीवनी कारखाना सध्या बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत याची आपणाला जाणीव आहे, शेतकर्‍यांचे हे पैसे लवकरच त्यांना देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

या शेतकर्‍यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमचे समाधान झालेले असून त्यामुळे आम्ही आता या प्रश्‍नावरून आंदोलन करणार नसल्याचे सांगितले.

पीपीपी प्रकल्पांचा आढावा
दरम्यान, सार्वजनिक व खासगी तत्वावर चालणार्‍या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी गेल्या जुलै महिन्यात स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीची पहिली बैठक काल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतली. सुकाणू समितीने या बैठकीत विविध पीपीपी प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यात वाशी, मुंबई येथे बांधकाम चालू असलेले गोवा भवन, पणजी बसस्थानक, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे चालू असलेले प्रकल्प – हणजुणे येथील मालमत्तेचा विकास व सुशोभीकरण, बिठ्ठोण येथील रेसिडन्सीचा विकास, पणजी ते रेईश मागुश या दरम्यानच्या रोप-वेचे काम तसेच कनव्हेन्शन सेंटर आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या कामांचा आढावा घेऊन प्रकल्पांना गती देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.