संजय पाटील ः प्रयोगशील, यशस्वी शेतकरी

0
3
  • डॉ. श्रीरंग व्यंकटेश जांभळे

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 2024 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यांत कृषिक्षेत्रातील योगदानासाठी गोव्यातील सावईवेरे येथील शेतकरी संजय पाटील यांना यावर्षीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. श्री. पाटील यांनी डोंगर पोखरून पाणी उपलब्ध करून दहा एकर नापीक जमिनीवर कुळागरे तयार केली. त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल…

शेतकरी, शेती याबद्दल समाजात खूप सहानुभूती पाहायला मिळते. शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांच्या उत्पादित शेतमालाला मिळणारा कमी भाव, याने व्यथित होणारे अनेक संदेश समाजमाध्यमांत फिरताना आढळतात. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून राजकीय फायदा मिळवण्याचेही अनेक प्रकार लक्षात येतात. काहीच करत नाहीत किंवा चुकीचे करतात अशा आरोपांच्या फैरीही झडतात. त्याचबरोबर ‘आम्ही यांव करू, त्यांव करू’ अशी घोषणाबाजीही राजकीय व्यासपीठावरून ऐकायला मिळते. शेतकऱ्याने असे करावे, तसे करावे असे काही प्रॅक्टिकल व बरेचसे अनाहूत सल्लेही दिले जातात. यावरून शेतकरी हा कमजोर, माहिती-ज्ञान-तंत्रज्ञान यांपासून खूप दूर अशी प्रतिमा उभी राहते, उभी केली जाते.

याच्या उलट, ‘कोरोना’च्या काळात व त्यानंतर हुशार शेतकरी, तरुण रक्ताचे- नव्या दमाचे स्मार्ट शेती-उद्योजक यांच्या यशोगाथाही बऱ्याच ठिकाणी ऐकायला, पाहायला, वाचायला मिळतात. काही लाख रुपये कमावणारा शेतकरी किंवा शेतीपूरक उद्योग करणारा उद्योजक यांच्याबद्दलचे लिखाण समोर आले की नजर स्थिरावते. वाचल्यावर आनंद होतो. असेच एखाद्या शेतकऱ्याचे नामांकन ‘पद्मश्री’सारख्या महत्त्वाच्या पुरस्कारासाठी होते आणि त्याला पुरस्कार जाहीर होतो तेव्हा तर अत्यानंदच होतो!
गोव्यातील सावईवेरे या लहानशा खेड्यातील श्री. संजय पाटील यांना नुकताच भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. शेतकरीवर्ग आणि शेती-शेतकऱ्याविषयी आस्था, प्रेम असणाऱ्या सर्वांनाच आनंद झाला. आपली संपूर्ण हयात कुळागरात घालवल्याबद्दल सार्थ अभिमान बाळगणाऱ्या संजयभाईंनी हा पुरस्कार म्हणजे गोव्यातील शेतकऱ्यांचा गौरव असल्याचे म्हटले. यामुळे गोव्यातील शेतकऱ्यांना आपलाही गौरव झाल्याची अनुभूती नक्कीच आली असेल. या काही वर्षांत सर्वसामान्यांमध्ये राहून असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या, चकाचक ग्लॅमरस जगाच्या जवळही न फिरकणाऱ्या अनेक ग्रामीण व शहरी भागातील दीपस्तंभांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्याच्या घटनांमुळे पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेविषयी जनतेत प्रामाणिक भावना जागत असल्याचे दिसून येते. अशीच भावना याही घटनेने जनमानसात उत्पन्न झाली असेलच.

सावई-वेरे-वळवई हा अंत्रुज महालातील परिसर गोवा मुक्तिसंग्रामातील एक महत्त्वाचे क्षेत्र. येथे अनेक स्वातंत्र्यसैनिक आसरा घ्यायचे. येथील रहिवाशांमध्ये मोहन रानडेंसारख्या सन्माननीय राष्ट्रप्रेमींनी परकीय सत्तेच्या जुलमी राजवटीविरुद्ध जागृती घडवून आणली. यामुळे याही परिसरात सैनिक तयार झाले. येथील बऱ्याचशा घटना कुळागरातच घडल्या. योजना आकाराला आल्या. अशा या ऐतिहासिक वारशाच्या कुळागरातच संजय अनंत पाटील यांचे जीवन घडले. त्यांचे वडील या परंपरागत चालून आलेल्या कुळागरातच राहिले. आई-वडील, तीन बहिणी व संजयभाई असे हे कुटुंब. सुपारी, नारळ, केळी, काजू, अननस या पिकांभोवतीच यांचा संसार.
संजयभाईंचे शिक्षण लौकिक अर्थाने कॉलेजच्या पायरीपर्यंतच. त्यानंतर गोवा बागायतदार सहकारी संस्थेत अल्पकाळ नोकरी केली. वडील आजारी असल्याने त्यांना घरी बागायतीत लक्ष घालावे लागले. 1986 पासून बागायतीत पूर्णपणे लक्ष घालायला त्यांनी सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनेक अडचणी लक्षात आल्या. त्यामुळे नावीन्याचा शोध घेणे चालू होते. दरम्यानच्या काळात सरकारी योजना, भोवतालचे वातावरण याने प्रेरित होऊन संकरित गाई घेऊन दुधाच्या व्यवसायाची जोड दिली. काहीकाळ गोवा डेअरीसाठी कृत्रिम रेतन सेवाही सावईवेरे परिसरात दिली. सोबतच्या समविचारी मित्रमंडळीचा आपल्या व सामूहिक जडणघडणीत फार मोठा वाटा असतो. आज या क्षणी प्रकर्षाने आठवण होते ती संजयभाईंचे समवयस्क शेजारी व मित्र कै. उल्हास चाफाडकर यांची. कोणत्याही विषयाचे पूर्ण विश्लेषण करण्यात ही सर्व मित्रमंडळी अग्रेसर. अशाच विश्लेषणात्मक अभ्यासातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकतेसोबत निव्वळ नफाही वाढवणे यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. यातून गवसले ‘नैसर्गिक/गोआधारित शेतीचे’ तंत्र. बागेतच उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करत, पीक-माती-हवामान-निविष्टा यांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध व क्रिया-प्रक्रिया यांचा सखोल चिंतनातून या मंडळीनी अभ्यास केला. त्यातून शेतीतील काही प्रयोग केले. देशी गायीचे महत्त्व, कृत्रिम रासायनिक खते-औषधे यांचे दुष्परिणाम यांच्या अभ्यासातून शेतीपद्धतीची दिशा निश्चित केली.

1998-99 दरम्यान भारतीय किसान संघाच्या पुढाकाराने सेंद्रिय शेतीपद्धतीचे तज्ज्ञ भास्कर सावे गुरुजी यांचा कार्यक्रम, पुढे सुभाष पाळेकर गुरुजींचा कार्यक्रम, सावे गुरुजींच्या उंबरगाव (गुजरात) येथील शेतीला भेट यातून संजयभाईंनी मार्गदर्शन प्राप्त केले. वाचन-भेटी-चिंतन व प्रत्यक्ष प्रयोग यातून शेतीतल्या शाश्वत विकासासाठी संजयभाईंची बागायत एक प्रयोगशाळाच बनली. सन 2000 च्या दरम्यान या परिसरात ग्रामविकास केंद्राच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पातही संजयभाई व मित्रमंडळीचा सक्रिय सहभाग होता. पाणी व मातीचे संवर्धन करण्यासाठी काही पारंपरिक व काही नवीन पद्धतींचा अवलंब त्यांनी आपल्या क्षेत्रात केला. कर्नाटक, केरळमध्ये डोंगरउतारावर भुयार मारून पाणी मिळवण्याचे तंत्रज्ञान काहीजणांना अवगत आहे. अशाच एका तंत्रज्ञाच्या सहाय्याने संजयभाईंनी बागेसाठी पाण्याचा स्रोत मिळवला. याआधी एप्रिल-मे महिन्यात त्यांना पाण्याची टंचाई अनुभवावी लागत होती. विहिरीतील आडव्या बोअरमुळेही उपलब्ध पाण्यात वृद्धी झाली.

‘जीवामृत’ हा संजयभाईंचा हुकमी एक्का. देशी गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसन पीठ व झाडाच्या मुळाकडची माती यांपासून सहजपणे ‘जीवामृत’ बनवता येते. एका संयंत्राच्या सहाय्याने फिल्टर करून ‘जीवामृत’ ठिबक सिंचनाद्वारे नियमितपणे ते पिकाला देतात. घरातील संडास, बाथरूम येथील सांडपाणीही या यंत्राद्वारे बागेला पोचवले जाते. यामुळे मातीतील जिवाणूंची संख्या वाढते व जमिनीची सुपीकताही वाढते. बागेतील पालापाचोळा ते जाळतही नाहीत किंवा बाहेर फेकतही नाहीत. बागेत आच्छादन (मल्‌‍चिंग) म्हणून त्याचा वापर केला जातो. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. या सर्व गोष्टींमुळे उत्पादनात वृद्धी झाली व उत्पादन खर्चात कमालीची घट झाल्याचे ते आकडेवारीसहित सांगतात. त्यांच्यातला अभियंताही या सर्व उपक्रमांत त्यांना साथ देतो. आपल्या गरजेला अनुरूप तंत्रज्ञानाची ते जुळवाजुळव करतात. तसेच काही तंत्रे ते स्वतः विकसित करतात.

या त्यांच्या प्रवासात त्यांचे कौशल्य व दिलेले योगदान यासाठी संजयभाईंना काही महत्त्वाचे पुरस्कारही प्राप्त झाले. गोवा बागायतदार सहकारी संस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट बागायतदार पुरस्कार’, गोवा शासनाचा 2013 साली ‘कृषिरत्न पुरस्कार’, भारतीय कृषी अनुसंधान संस्था- दिल्लीचा 2023 साली ‘नवोन्मेष पुरस्कार’ व गोवा राज्य जैवविविधता मंडळाचा 2023 सालचा ‘जैवविविधता पुरस्कार’- या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. आता 2024 सालचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने शिरपेचात हा मानाचा तुरा ठरला आहे.
अनेक सामाजिक संस्था, उपक्रम यांच्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. भारतीय किसान संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन व त्याद्वारे त्यांच्या अडचणी सोडवताना गोवा प्रांताचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. पाणलोट संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. ‘आत्मा’ या सरकारी योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रमातून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. रायकर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कार्यानुभवासाठी (इंटर्नशीप) त्यांची दारे खुलीच असतात. गोवा बागायतदार संस्थेच्या ‘बागायतदार वार्ता’ या मासिकासाठी त्यांनी अनेकवेळा सेंद्रिय शेतीचे तत्त्वज्ञान, आपले प्रयोग यासंबंधी लिखाण करून शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संपर्कात राहून त्यांनी स्वतःच्या शेतीतही सुधारणा केली व संशोधनासाठी शास्त्रज्ञांना माहितीही उपलब्ध करून दिली.

कृषी ही आपली संस्कृती आहे. त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. शेती करणे ही कमीपणाची गोष्ट नव्हे. हुशार माणसाचे ते काम आहे. व्यक्तीला आपल्या हुशारीचा योग्य उपयोग करण्यासाठी शेती हे एकदम योग्य क्षेत्र आहे. नवीन पिढी शेतीक्षेत्रात येण्यासाठी सरकारने व समाजानेही प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगतात. शाळेत, महाविद्यालयात शेतीसंबंधीचे शिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे देण्याची मागणी ते करतात. श्रमप्रतिष्ठा रुजवण्याची गरज आहे. कौशल्याधारीत कृषी शिक्षण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून सरकारने द्यावे, असा त्यांचा आग्रह आहे. आळसामुळे परावलंबित्व येते व परावलंबित्व गरिबी आणते, म्हणून आळस झटकून युवकांनी, शेतकऱ्यांनी कामाला लागले पाहिजे म्हणजे आपण नक्कीच आत्मनिर्भर होऊ असा त्यांना विश्वास वाटतो. आर्थिक चणचणीच्या परिस्थितीतून शेतीमुळेच आपण चांगले व सुखी जीवन जगण्याकडे वाटचाल केली. यातून मिळालेल्या संपत्तीतूनच मुलांचे शिक्षण पूर्ण केले व सुखी-समाधानी कौटुंबिक जीवन जगत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. या त्यांच्या वाटचालीत त्यांची पत्नी सौ. संगीता व मुले सुमय व सुजला यांची खंबीर साथ आहे.

गोव्यातील एका खेड्यातील कष्टकरी शेतकऱ्याला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने शेतीबाबत आस्था बाळगणारे व शेतकरी यांना नक्कीच आनंद झाला आहे. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे जात अनेक शेतकरी आज शेतात राबत आहेत. युवाशक्तीही काही प्रमाणात याकडे आकृष्ट होत आहे. या सर्वांना भक्कम आधार देण्याचे कार्य सरकार, समाजधुरिण व एकूणच जनता यांनी केले पाहिजे. आजच्या आनंदामुळे उत्साहवृद्धी व उत्साहाचे रूपांतर आत्मनिर्भर शेती व स्वावलंबी शेतकरी यात होण्यासाठी प्रयत्न व पूरक उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. हे सर्व साध्य करण्याची शक्ती, बुद्धी, प्रेरणा कृषिदेवता भगवान बलराम श्री. संजयभाई व आपणा सर्वांना देवो, ही प्रार्थना!