तिसऱ्या टप्प्यात आज 93 जागांसाठी मतदान

0
4

>> 1352 उमेदवार; गोवा व गुजरातमधील सर्व जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (मंगळवार, दि. 7) 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान होणार आहे.

या टप्प्यात दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, आरोग्य राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, सुप्रिया सुळे यांच्यासह शिवराज सिंह चौहान, दिग्विजय सिंह, बसवराज बोम्मई हे रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यात एकूण 1352 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 1229 पुरुष आणि 123 महिला आहेत.

तिसऱ्या टप्प्यात भाजपचे 82 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेसकडून 68 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात आधी 10 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 95 जागा होत्या, मात्र 21 एप्रिल रोजी सुरतमधून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर आणि 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले होते. त्याचवेळी, जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे अनंतनाग-राजौरी मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता येथे सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपा उमेदवाराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या टप्प्यात (26 एप्रिल) होणारे मतदान 7 मे रोजी होणार आहे.

कुठल्या राज्यात किती जागांवर मतदान?
तिसऱ्या टप्प्यात छत्तीसगडमधील 7, दादरा नगर हवेली व दमण-दीव 2, गोवा 2, गुजरात 25, आसाम 4, बिहार 4, कर्नाटक 14, मध्यप्रदेश 9, महाराष्ट्र 11, उत्तरप्रदेश 10 आणि पश्चिम बंगालमधील 4 जागांवर मतदान होणार आहे.