‘संक्रांत’ ः निसर्गाला दिलेली धन्यवादाची पावती

0
271
  • अंजली आमोणकर

सण नसते तर नुसता व्यवहार झाला असता. गरिबांना जाणीवपूर्वक खायला मिळावे म्हणून एकमेकांना वाटून हा सण साजरा होतो. अशी ही बहुतेक वर्षी १४ जानेवारीला येणारी ‘संक्रांत’ सर्व देशाला आनंदाची जावो. चांगल्या शुभगोष्टी संक्रमित होवो!!

संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून, दुसर्‍या राशीतल्या सूर्यापर्यंत जाणे. एका वर्षात बारा संक्रांती येतात. आपण मकर संक्रांत म्हणून जो सण साजरा करतो, त्यात सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो.
भारतीय उपखंडात अनेक भागात, तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून, त्या त्या भागात विशिष्ट सण साजरे केले जातात. मकर संक्रांत हा सण पर्यावरणावर अवलंबून नाही, तर पर्यावरण ज्या सूर्यावर अवलंबून आहे अशा सूर्याशी जोडलेला आहे.

एखादी वाईट घटना घडली की ‘संक्रांत आली’ असे म्हटले जाते ते योग्य नाही. देवीने शंकासुर राक्षसाला मारणे, सूर्याने मकर राशीत प्रवेश करणे हे वाईट कसे असू शकेल? मकर संक्रांत ही वाईट किंवा अशुभ नाही असे मत पंचांगकर्ते व ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात.
काळ्या रंगाची वस्त्रे नेहमी उष्णता शोषतात व शरीर उबदार ठेवतात. म्हणून थंडीमध्ये येणार्‍या या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात. वर्षभरात कुणाशी मतभेद – भांडणं झाली असतील, कुणाशी अबोला धरला गेला असेल तर त्यांनाही तिळगूळ देऊन संबंध सुधारावेत, असे आवाहन सोमण यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या शेजारच्या ‘कर्नाटक’ राज्यातसुद्धा जवळजवळ हा सण महाराष्ट्रासारखाच साजरा होतो. उसाची सुगी झालेली असते. ‘एल्लु’ म्हणजे सफेद तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबर्‍याचे काप आणि ‘बेल’ म्हणजे गुळाचे खडे यांचे वाण सुपातून नेताना त्यात कधी ‘सक्कर अच्चू’ म्हणजे बत्तासे, उसाचे गरे असेही पदार्थ ठेवतात. ते एकमेकांना देताना- घेताना ‘तिळगूळ घ्या चांगलेच बोला’ असे म्हणतात.
गुजरात किंवा राजस्थानमध्ये हा सण ‘उतराण’ किंवा ‘उत्तरायण’ म्हणून साजरा होतो. तिळगुळाची चिक्की करतात. या मोसमांत आलेल्या जवळजवळ सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या कंदमुळे घालून मिश्र भाजी किंवा उंधीयु करतात. ही भाजी अत्यंत लोकप्रिय आहे. पतंग उडवण्याचा मोठाच जल्लोष या दिवशी या राज्यांमध्ये दिसून येतो. पतंगांच्या काटाकाटीलाही या दिवशी फार महत्त्व असते. काचेची पूड पाण्यात घोळवून त्यात मांजा भिजवून धारदार करण्यात येतो. म्हणजे इतरांचे पतंग सहजी कापता येतात. परंतु याच धारदार मांज्यामुळे अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात तर स्कूटरस्वार जखमी होतात.

आंध्र प्रदेशात हा सण चार दिवसांचा असतो. १) भोगी, २) पेट्टा पांडुगा, ३) कणुमा व ४) मुक्क-नुमा
हरयाणा- हिमाचल प्रदेश – पंजाब याला माघी म्हणतात. आदल्या दिवशी (भोगीच्या दिवशी) ‘लोहडी/लोहरी’ मनवतात. बांबूच्या तीकाट्यावर मातीचा रंगीत चेहरा बसवतात. तिथेच पणती ठेवायला जागा असते. याला ‘टेसू’ म्हणतात. गल्लीतली सर्व पोरं घरोघरी हा टेसू घेऊन गाणी म्हणत फिरतात. नंतर ‘लोहरी’ दो जी…. म्हणत वर्गणी वसूल होते. काश्मीरमध्ये संक्रांतीला ‘सिशुर संक्रांत’ म्हणतात. आसाममध्ये ‘माघी बिहू’ किंवा ‘भोगाली बिहू’ म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये या सणाची ओळख खिचडी म्हणून आहे. तामिळनाडूत ‘पोंगल’, केरळमध्ये ‘मकर विलु’म्हटलं जातं. भारताबाहेरही काही देशांमध्ये हा सण धामधुमीनं साजरा होतो. त्यांत नेपाळ-‘तरुलोक माघी’, थायलंडमध्ये ‘सोंगक्रॉन’, लाओसमध्ये ‘पि-मा-लाओ’, ‘म्यानमारमध्ये ‘थिंग्यान’ तर कंबोडियात ‘मोहा संक्रांत’ म्हणून साजरा होतो.
अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगडांची पूजा केली जाते. या सुगडांमध्ये नऊ धान्य टाकली जातात. बरोबरीने हळकुंड, बदाम, पैसा, सुपारी, विड्याची पानं वगैरे टाकलं जातं. मग गृहिणी एकमेकींना वाण व छोटी भेटवस्तू देतात. रथसप्तमीपर्यंत केव्हाही सोयीने ‘हळदीकुंकू’ समारंभ साजरा केला जातो.
पौराणिक महत्त्व – मकर संक्रांतीच्या दिवशी गंगानदीचे पृथ्वीवर आगमन झाले होते असे मानतात. महाभारतामध्ये शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छेने त्याग केला होता. दक्षिणायन चालू असता, देहत्याग केल्यास मुक्ती मिळणार नाही अशी त्यांची दृढ समजूत होती. उत्तरायणाचे सहा महिने शुभ असतात, असे भगवद्गीतेमध्ये वचन आहे-

महाराष्ट्रातदेखील हा सण तीन दिवसात वाटलेला आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’, मग ‘संक्रांत’ व तिसरा दिवस ‘किंक्रांत’. या दिवसांमध्ये शेतातील पीक तयार होत आलेले असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्या, कंदमुळं वगैरेची मिक्स भाजी ‘भोगीची भाजी’ म्हणून खास करतात. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ ही म्हण आपण ऐकत आलो आहोत. भोगीच्या खास भाजीबरोबर तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, लोणी, पापड, भरीत व चटणी असा बेत केला जातो. इंद्रदेवाची आठवण करत या दिवशी तीळमिश्रित गरम पाण्याने स्नान केले जाते. त्यामुळे पुढे येणारा उन्हाळा बाधत नाही अशी एक सार्वत्रिक समजूत आहे. भोगीच्या स्पेशल भाजीत- हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्यांचा समावेश असतो. तिळाचा कूटही घातला जातो. सृष्टीची उत्पत्ती, ऋतूंची अखंड साखळी, नवनिर्मितीचं चक्र या सगळ्यांत धरणी- पाऊस आणि सूर्य यांचा सहभाग मानवाला जसा जसा जाणवू लागला, तसा तसा सुफलनाची ताकद वाढवणार्‍या उत्सव, सण, व्रतवैकल्यांच्या विधींचा जन्म झाला. हे सर्व सण कृषी जीवनाशी संलग्न आहेत. ही एकाप्रकारे कृषी जीवन – कृषक- धरणी- पाऊस- सूर्य यांना ‘धन्यवादाची’ दिलेली पावतीच ठरते.

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे ‘बोरन्हाण’ करतात. मुलाला हलव्याचे दागिने घालून, संध्याकाळी जवळपासच्या सर्व छोट्या मुलांना बोलावून आपल्या बाळाच्या डोक्यावर मुरमुरे, फुटाणे, लाह्या, लहान बोरं, लहान गोळ्या- चॉकलेट, साखरफुटाणे यांचा वर्षाव करतात. हा शारीरिक झीज भरून निघणारा कालावधी म्हणून मानला जातो. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता अशी पुराणात एक कथा आहे. या सणाला तिळाचे खूप महत्त्व आहे. तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते व वात तयार होत असतो म्हणून तीळ खाण्याने, तिळाच्या तेलाने मालीश करण्याने फायदा होतो. नवीन लग्न झालेल्या मुलीलादेखील ह्या दिवशी हलव्याचे दागिने घालून काळी चंद्रकळा नेसवून लाड करण्याची प्रथा आहे. शिवाय जावयाला चांदीच्या वाटीतून तिळगूळ देण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसते.
सण नसते तर नुसता व्यवहार झाला असता. गरिबांना जाणीवपूर्वक खायला मिळावे म्हणून एकमेकांना वाटून हा सण साजरा होतो.
असेही मानले जाते की या दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र ‘शनी’ला भेटायला त्याच्या घरी जातात आणि शनी, मकर राशीचा देवता आहे म्हणून या सणास ‘मकर संक्रांत’ म्हणतात. याच दिवशी यशोदेने संतानप्राप्तीसाठी व्रत सुरू केले होते. म्हणूनही या दिवसाला मानतात.
फार वर्षांपूर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले व संकरासुराला ठार मारले अशीही एक कथा सर्वत्र मानली जाते. या काळाला परा-अपरा विद्या प्राप्त करण्याचा सुवर्णकाल मानला जातो.
अशी ही बहुतेक वर्षी १४ जानेवारीला येणारी संक्रांत सर्व देशाला आनंदाची जावो. चांगल्या शुभगोष्टी संक्रमित होवो!!