घुसमट

0
257
  • ज. अ. उर्फ शरदचंद्र रेडकर
    (सांताक्रूझ)

अक्षयने दोन वर्षे जोरदार प्रयत्न केले. शिष्यवृत्ती मिळवली आणि लंडनच्या विद्यापीठात प्रवेश घेतला. पत्नीसह तो निघूनदेखील गेला. ना आपल्या पित्याची परवानगी घेतली ना त्यांच्याशी विचारविनिमय केला. सत्तरी गाठलेला आपला बाप एकटा कसा राहील याचा विचारदेखील त्याच्या मनाला शिवला नाही.

आयुष्यातील चढउतार पाहिलेले रामलाल आता पार थकले होते. शरीराने आणि मनाने देखील. आयुष्यभर ते तत्वनिष्ठ राहिले, चाकोरीबद्ध सरकारी नोकरी केली. पदाचा दुरुपयोग करून कुणाचे काम अडवले नाही किंवा केलेल्या कामाबद्दल कुणाकडून बक्षिसी घेतली नाही. हाताखालच्या आणि बरोबरीच्या सहकार्‍यांना कधी दुखावले नाही. चारित्र्यावर कोणताही डाग पडू न देता खात्याचा उपसंचालक म्हणून ते सन्मानाने निवृत्त झाले. निवृतीच्या दिवशी त्यांना कार्यालयातर्फे निरोप देताना त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचे किती कौतुक केले! त्यांचे सहकारी त्यांच्याविषयीच्या आदराने भरभरून बोलले. खातेप्रमुखांनी स्मृतिचिन्ह म्हणून त्यांना श्री गणेशाची सुबक अशी संगमरवरी मूर्ती प्रदान केली. त्यांच्या खांद्यावर रेशमी शाल पांघरली. हाती गुलाबपुष्पांचा भला थोरला गुच्छ दिला. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. सगळ्या कर्मचार्‍यांसह खातेप्रमुख इमारतीच्या खाली गोळा झाले. रस्त्यावर पांढरीशुभ्र मारुती कार रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली होती. खातेप्रमुख पुढे सरसावले. त्यांनी नक्षीदार पेटी रामलाल यांच्या समोर धरली. रामलाल गोंधळले, म्हणाले, हे काय आणखी? काही नाही, केवळ आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला ही प्रेमाची भेट. ही तुमच्या गाडीची चावी! तुम्ही इतकी वर्षे सरकारी गाडीतून फिरलात. आता यापुढे काय बस आणि रिक्षाने फिरणार? म्हणून तुमच्या पदाची व तुमच्या प्रतिष्ठेची शान कायम राहावी म्हणून ही कार तुम्हाला द्यायची हे आम्ही आधीच ठरवले होते. कृपया स्वीकार करा, खातेप्रमुख उद्गारले! रामलाल यांचे डोळे भरून आले नसते तरच नवल! किती दिवस त्यांच्या मनात होते की आपली एक मोटरकार असावी. त्यातून आपल्या कुटुंबाबरोबर पर्यटनस्थळे पहावीत, आप्तेष्टांकडे जावे. परंतु घरसंसार आणि मुलाचे शिक्षण यातच त्यांचा पगार संपून जायचा! कर्ज काढून गाडी घेणे त्यांना पटत नव्हते. कारण ते एक विकतचे दुखणे होते असे त्यांना वाटायचे..

आज दहा वर्षे उलटली पण तो जिव्हाळ्याचा प्रसंग अजूनही रामलाल यांच्या डोळ्यासमोरून हटत नाही. दारी असलेली ती कार आणि देव्हार्‍यातील गणेशमूर्ती या दोन्ही वस्तू त्यांना आपल्या सहकार्‍यांच्या प्रेमाची आठवण सतत करून देत असतात. निवृत्तीनंतर त्यांचे जीवन नीरस झाले. हाती काहीच काम उरले नाही. आयुष्यातील तब्बल तीस वर्षे त्यांनी सरकारी सेवेत घालवली. कामाच्या निमित्ताने अनेक लोक भेटले, अनेक ओळखी झाल्या. कार्यालय आणि कार्यालयाबाहेर ते सतत व्यस्त असायचे. ग्रामीण विकास यंत्रणा या खात्यात ते एक जुनियर अधिकारी म्हणून रुजू झाले होते. कामाचा उरक, सचोटी, कार्यतत्परता आणि सेवाज्येष्ठता यांच्या जोरावर ते उपसंचालक पदावर पोहचले होते. त्यांचा संबंध अगदी गावपातळीवरच्या सरपंचापासून तो थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत या ना त्या निमित्ताने यायचा. दिवस कसा संपला हे कळायचेदेखील नाही. संध्याकाळी कार्यालय सोडताना त्यांची वैयक्तिक सचिव मारिया त्यांना दुसर्‍या दिवसाच्या कामांची आठवण करून द्यायची. ऑफिसचा वाहनचालक डिकोस्टा गाडीचे दार उघडून त्यांची वाट पाहत असायचा. निवृत्ती नंतर हे सगळे बंद झाले.

पत्नी हयात असेपर्यंत त्यांना एकटेपणा कधी जाणवला नाही. सतत तिची बडबड चालू असायची. मात्र ती गेली आणि घर कसं मुकं मुकं झालं. सकाळची वेळ रोजची दैनिके वाचण्यात जायची. दुपारी जेवणानंतर वामकुक्षी आणि संध्याकाळचा बगीचातील फेरफटका हेच त्यांचे जीवन झाले होते. कारण घरी त्यांचे असे कुणी आता उरले नव्हते. ना पत्नी ना मुले-बाळे, ना नातवंडे! घरकाम करणारी एक बाई आणि बगीचाची देखभाल करणारा माळी! आपापली कामे करून ती दोघं निघून जायची. ती असेपर्यंतच घर जिवंत वाटायचं आणि ती निघून गेली की घर सुनं सुनं व्हायचं!

एकुलता एक मुलगा- अक्षय उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला तो तिथेच रमला. रामलाल एकटे उरले या शहरात! सगेसोयरे होते. त्यांची अधून मधून कारणपरत्वे भेट व्हायची. त्यांच्या बरोबरीचे मित्र कुणी उरले नव्हते. काही अन्य शहरात स्थायिक झाले तर काही पंचत्वात विलीन झाले. दोन वर्षांच्या अंतराने मुलगा आणि सून हवापालट करायला यायची, आठ-पंधरा दिवस रहायची आणि निघून जायची. आपल्या वडिलांना सोबत घेऊन लंडनला जावे असे त्यांना कधी वाटले नाही. उलट कुणी नातेवाईकाने हा विषय काढला तर, बाबांना तिथे करमणार नाही, तिथले हवामान मानवणार नाही अशी कारणे दिली जायची. रामलाल यांनी कधी तशी उत्सुकताही दाखवली नाही. कारण त्यांनी आपल्या मुलाचा आणि सुनेचा स्वभाव पुरता ओळखला होता. या म्हातार्‍या माणसाचे ओझे त्यांना नको होते हे त्यांना कळून चुकले होते. उगाच जुलुमाचा राम राम कशाला आणि आपला देश सोडून इतक्या दूर या वयात कां जायचे? आपली काया याच मातीत पोसली ती इथल्या मातीतच विसर्जित व्हावी हेच बरे! आपणापासून दुसर्‍यांना कशाला त्रास!

विवाह होण्यापूर्वीचा अक्षय आणि विवाहानंतरचा अक्षय यांत जबरदस्त फरक पडला होता. अगदी डॉक्टर होईपर्यंत वडिलांच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट न करणारा मुलगा विवाहानंतर हळुहळू बदलत गेला. आता तर अक्षयचे आपल्या वडिलांकडे साफ दुर्लक्ष व्हायला लागले. आपण अक्षयच्या आयुष्यात अडगळ ठरतो आहोत की काय असा भास रामलाल यांना होऊ लागला. रामलाल सूनबाईला – मधुराला काही रीतीभातीचे बोलले तर तिला राग यायचा. मग ती आपले काय चुकले हे लपवून अक्षयकडे तिखटमीठ लावून तक्रार करायची आणि अक्षय त्यावर विश्वास ठेवायचा. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हां किती सोज्वळतेने वागली होती ही मुलगी! ते तेवढ्यापुरते रंगवलेले नाटक होते तर! आपण भोळेपणाने त्या नाटकाला फसलो याची खंत रामलाल यांना वाटू लागली पण आता उपाय नव्हता.

रामलाल यांना अक्षयच्या लग्नातला एक प्रसंग आठवला आणि खुद्कन हंसू आले. लग्न लागले. भटजी म्हणाले, ‘नवर्‍या मुलाला वधूपक्षाने दिलेला सूट आणा, त्यावर मंत्रोदक शिंपडायचे आहे’. नवर्‍याचा मामा पट्कन म्हणाला, ‘वधूपक्षाने रीतीरिवाजानुसार सूट दिलेलाच नाही. आम्हीच तो शिवला आहे’. हे वाक्य ऐकून आजूबाजूला खसखस पिकली. वधुकडच्या लोकांना हा अपमान वाटला. पण वस्तुस्थिती तर तशीच होती. रामलाल यांच्या साधेपणाचा व सौजन्याचा गैरफायदा वधुकडच्या मंडळीनी घेतला होता. ना सूट ना रीतीभातीप्रमाणे मानपान ना वरदक्षिणा! जेवणावळीचा अर्धा खर्च तेवढा त्या लोकांनी दिला. म्हणजेच डॉक्टर असलेला नवरा मुलगा त्यांना जवळ जवळ फुकटातच पडला. रामलाल यांना त्याचे वैषम्य नव्हते. कारण ते लोभी नव्हते, दुसर्‍याकडून काही घ्यावे हा त्यांचा स्वभाव नव्हता. जेव्हां आपण दुसर्‍याकडून काही घेतो तेव्हां आपण त्यांचे मिंधे होतो. हा मिंधेपणा रामलाल यांना आवडत नसे. म्हणूनच आजवर ते ताठ मानेने जगत आले होते.

विवाह झाला की मुलाच्या वागण्या-बोलण्यात बदल होतो हे रामलाल ऐकून होते, आज त्या गोष्टीचा ते अनुभव घेत होते. रामलाल यांनी तळहातावरच्या फोडाप्रमाणे मुलाची जपणूक केली होती. त्याच्या शिक्षणात कोणतीही कसर ठेवली नव्हती. तो दहावी आणि बारावीच्या वर्गात असताना त्याची शाळेव्यतिरिक्त योग्य ठिकाणी महागडी शिकवणी लावली होती. त्यामुळेच तो बोर्डाच्या गुणवत्तायादीत येऊ शकला होता व मेडिकलचा त्याचा प्रवेश सुकर झाला होता. काही महत्त्वाची पुस्तके स्थानिक दुकानात उपलब्ध नसतील तर पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊन त्यांनी त्याच्यासाठी आणली होती. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेऊन मुलाच्या आवडीकडे व गरजांकडे त्यांनी अधिक लक्ष पुरविले होते. मुलाचा विवाहदेखील त्यांनी आपल्या जवळच्या जमापुंजीतून पार पाडला होता. अक्षयला त्या वर्षी लग्न करायचेच नव्हते. कारण लग्नाला लागतील एवढे पैसे त्याच्यापाशी त्यावेळी नव्हते. कारण नुकताच तो एमबीबीएस होऊन नोकरीला लागला होता आणि त्याला लग्नाआधी लंडन युनिवर्सिटीची मास्टर डिग्री घ्यायची इच्छा होती. परंतु एकदा मुलगा परदेशी गेला आणि तिथे कुणा परदेशी मुलीच्या प्रेमात पडला तर काय घ्या म्हणून रामलालची पत्नी राधाबाई यांनी त्याच्या लग्नाचा लकडा लावला आणि आपल्या पत्नीच्या हट्टापायी रामलालनी अक्षयचे मधुराशी लग्न लावून दिले. अक्षय हे सगळे विवाहानंतर पार विसरून गेला. मधुराच्या गोड गोड व लाडिक बोलण्याने तो पुरता तिच्या कह्यात गेला होता. आपल्या बापापेक्षा बायको आणि तिच्या माहेरचे लोक त्याला अधिक प्रिय वाटू लागले होते. त्यांच्या तालावर तो नाचू लागला. प्रसंगी अनाहूतपणे ती माणसे रामलाल यांचा अवमान करायची आणि अक्षय मुकाटपणे ते पाहायचा. याचे वैषम्य रामलाल यांना वाटायचे. आपलेच नाणे खोटे म्हटल्यावर काय करणार! परंतु मनातील हा सल ना ते कुणाला सांगू शकत होते ना कुणापुढे आपली व्यथा व्यक्त करू शकत होते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी त्यांची घुसमट झाली होती. अक्षयच्या लग्नानंतर थोड्याच दिवसात राधाबाईंचे निधन झाले. रामलाल यांना हा मोठाच धक्का होता. .

अक्षयने दोन वर्षे जोरदार प्रयत्न केले. शिष्यवृत्ती मिळवली आणि लंडनच्या विद्यापीठात प्रवेश घेतला. पत्नीसह तो निघूनदेखील गेला. ना आपल्या पित्याची परवानगी घेतली ना त्यांच्याशी विचारविनिमय केला. सत्तरी गाठलेला आपला बाप एकटा कसा राहील याचा विचारदेखील त्याच्या मनाला शिवला नाही. रामलाल डोळे मिटून खुर्चीत गप्प बसले होते आणि त्यांच्या मनःपटलावर मागचे सगळे आयुष्य असे रेखांकित होत होते.