श्रीलंकेचा ७ गड्यांनी विजय

0
92

आयसीसी अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेत काल रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने आयर्लंडचा ७ गडी व ६३ चेंडू राखून सहज पराभव केला. नाबाद १०१ धावा केलेला सलामीवीर धनंजय लक्षन श्रीलंकेच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला.
४८ षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०७ धावा केल्या.

जेम्मी ग्रासी (७५) व मार्क डोनेगन (३६) यांनी पहिल्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केल्यानंतर त्यांची मधली फळी कोलमडली. श्रीलंकेच्या अचूक क्षेत्ररक्षणामुळे तसेच समन्वयाच्या अभावामुळे त्यांचे तीन फलंदाज धावबाद झाले. लंकेकडून कर्णधार कमिंदू मेंडीस याने ३५ धावांत ३ गडी बाद केले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा सुरुवात भयावह झाली. केवळ ९ धावा फलकावर लागलेल्या असताना बोयागोडा (०) व निपुण परेरा (१) या आघाडी फळीतील फलंदाजांनी तंबूचा रस्ता धरला होता.

संघाचे अर्धशतक नुकतेच पूर्ण झालेले असताना त्यांचा तिसरा फलंदाजदेखील बाद झाला. यानंतर मात्र कर्णधार मेंडीस (नाबाद ७४) याने लक्षनसह संघाचा कोसळता डोलारा सावरताना अधिक पडझड होऊ दिली नाही लक्षनने १२० चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह नाबाद १०१ धावा केल्या.