ज्युनियर टीम इंडियाची विजयी सलामी

0
98

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्‍वचषकामध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने काल रविवारी दमदार सलामी देताना माजी विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १०० धावांनी दारुण पराभव केला. भारताने दिलेल्या ३२९ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २२८ धावांत गारद झाला.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. जॅक एडवर्डस आणि मॅक्स ब्रायंट यांनी पहिल्या गड्यासाठी १४.२ षटकांत ५७ धावांची भागीदारी रचली.

वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीने मॅक्सची बळी घेत भारताला पहिले यश दिले. डावखुरा संथगती गोलंदाज अभिषेक शर्माने कर्णधार जेसन संघा याला १४ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १६६ धावांमध्ये गारद झाला. सलामीवीर एडवडर्‌‌सने ७३ धावांची खेळी केली. त्यानंतर नागरकोटी आणि शिवम मावीच्या धारधार गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २२८ धावांत गारद झाला. भारताकडून नागरकोटी आणि शिवम मावीने प्रत्येकी ३ बळी, तर अभिषेक शर्मा आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी १ बळी घेतला. जायबंदी झाल्याने वेगवान गोलंदाज इशान पोरल आपला कोटा पूर्ण करू शकला नाही.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार पृथ्वी शॉ (९४), मनजोत कालराच्या (८६) आणि शुभम गिलच्या (६३) दमदार फलंदाजीच्या जोरावर ७ बाद ३२८ धावांचा डोंगर उभारला. शॉ वैयक्तिक २५ धावांवर बाद झाला होता. परंतु, चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे दिसून आल्याने त्याला जीवदान मिळाले. शॉ याने मनजोतसह पहिल्या गड्यासाठी १८० धावांची भागीदारी रचली. दुर्देवाने या दोघांची शतके पूर्ण होऊ शकली नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवडर्‌‌स वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला चमदार कामगिरी करत आली नाही. एडवडर्‌‌सने ६५ धावा देऊन ४ फलंदाजांना माघारी धाडले.भारताचा दुसरा सामना पापुआ न्यू गिनीसोबत १६ जानेवारीला होणार आहे.

धावफलक
भारत ः पृथ्वी शॉ झे. होल्ट गो. सदरलँड ९४, मनजोत कालरा झे. संघा गो. उप्पल ८६, शुभमन गिल झे. व गो. एडवडर्‌‌स ६३, हिमांशू राणा झे. वॉ गो. एडवडर्‌‌स १४, अनुकूल रॉय झे. संघा गो. वॉ ६, अभिषेक शर्मा झे. सदरलँड गो. एडवडर्‌‌स २३, कमलेश नागरकोटी नाबाद ११, शिवा सिंग त्रि. गो. एडवडर्‌‌स १०, आर्यन जुयल नाबाद ८, अवांतर १३, एकूण ५० षटकांत ७ बाद ३२८
गोलंदाजी ः झेवियर बार्टलेट ७-१-४७-०, जेसन रालस्टन ५-०-२६-०, विल सदरलँड १०-०-५५-१, जॅक एडवडर्‌‌स ९-०-६५-४, लॉईड पोप ३-०-२२-०, जोनाथन मर्लो २-०-१३-०, परम उप्पल ८-०-३५-१, ऑस्टिन वॉ ६-०-६४-१
ऑस्ट्रेलिया ः जॅक एडवडर्‌‌स त्रि. गो. रॉय ७३, मॅक्स ब्रायंट झे. मावी गो. नागरकोटी २९, जेसन संघा झे. शॉ गो. अभिषेक १४, जोनाथन मर्लो त्रि. गो. मावी ३८, परम उप्पल धावबाद ४, ऑस्टिन वॉ झे. जुयल गो. नागरकोटी ६, विल सदरलँड त्रि. गो. नागरकोटी १०, बॅक्सटर होल्ट पायचीत गो. मावी ३९, झेवियर बार्टलेट झे. जुयल गो. मावी ७, जेसन रालस्टन धावबाद ३, लॉईड पोप नाबाद ०, अवांतर ५, एकूण ४२.५ षटकांत सर्वबाद २२८
गोलंदाजी ः शिवम मावी ८.५-१-४५-३, इशान पोरल ४.१-०-२४-०, शिवा सिंग ६.५-०-३०-०, कमलेश नागरकोटी ७-१-२९-३, अभिषेक शर्मा ७-०-३३-१, हिमांशू राणा ४-०-३०-०, अनुकूल रॉय ५-०-३६-१