श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

0
82

मागील एक महिना आणि तेरा दिवस गोमेकॉत उपचार घेणारे उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना काल बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
दि. ११ जानेवारी रोजी कर्नाटक राज्यात आयुषमंत्री श्री. नाईक हे सपत्नीक तीर्थाटनासाठी गेले असता त्यांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात नाईक हे गंभीररित्या जखमी झाले होते. तर त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचे अपघातात निधन झाले होते. तसेच त्यांच्या मित्र परिवारातील एका व्यक्तीचेही या अपघातात निधन झाले होते.
गोमेकॉत जवळजवळ दीड महिना उपचार घेतलेल्या नाईक यांना बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. या प्रसंगी बोलताना नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, अन्य डॉक्टर्स, परिचारिका, एम्समधील डॉक्टर्स यांनी दिलेले उपचार व केलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले.
आपली तब्येत आता सुधारत असून पुढील १५ दिवस आपणाला घरी पूर्ण विश्रांती करण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे. त्यामुळे या काळात मित्र परिवार तसेच हितचिंतक, मतदार अशा कुणीही आपणाला भेटण्यासाठी येऊ नये. १५ दिवसांनंतरच भेटण्यास यावे, असे नाईक यांनी म्हटले आहे.