‘होली विक’मध्ये अधिवेशन नको ः कामत

0
207

ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताहात (होली विक) गोवा विद्यानसभेचे अधिवेशन घेण्यास भाजपचा निर्णय हा अयोग्य व ख्रिस्ती लोकांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केला. गोवा राज्य हे धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असून भाजपने सर्वधर्मसमभाव या तत्वाचे आचरण करायला हवे, असे कामत यांनी म्हटले आहे.

अधिवेशनाच्या काळात म्हणजेच २८ मार्च रोजीपासून ख्रिस्ती धर्मींयांचा पवित्र सप्ताह सुरू होत असून रविवार दि. ४ एप्रिल रोजी ईस्टर संडे आहे. तर गुरुवार दि. १ एप्रिल रोजी मोंडी थर्स्ड असून त्या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार आहे. सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे विधानसभा अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवला असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

अधिवेशन किमान
२१ दिवसांचे हवे

गोवा विधानसभेचे अधिवेशन हे किमान २१ दिवसांचे असावे अशी आपण सरकारकडे मागणी केली होती, असे सांगून विरोधकांना जनतेचे प्रश्‍न योग्य व प्रभावीपणे मांडण्यासाठी वेळ मिळणे गरजेचे असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. भाजप सरकार लोकांचा आवाज दाबू पाहत असल्याचा आरोपही कामत यांनी केला आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आपण हे मुद्दे मांडणार असून सरकारला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडणार आहे. विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणीही आपण करणार असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

२४ मार्चपासून अधिवेशन
गोवा विधानसभेचे आगामी अधिवेशन बुधवार दि. २४ मार्च रोजी सुरू होत असून ते सोमवार १२ एप्रिल पर्यंत चालणार आहे. परंतु या अधिवेशनात केवळ बारा दिवस कामकाज चालणार असून २४ ते १२ या दरम्यान आठ सुट्या असल्याचे कामत यांनी निदर्शनात आणून दिले आहे. भाजप सरकारने जनतेप्रती आपल्या असंवदेनशीलतेचे परत एकदा दर्शन घडवले असून प्रत्येक प्रत्येक सरकारचे लोकभावना तसेच धार्मिक भावना प्रती संवेदनशीलता दाखवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.