शैक्षणिक वर्षाबाबत अधिकृत आदेश जारी

0
108

>> शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक

शिक्षण खात्याने येत्या सोमवार २१ जून २०२१ पासून सुरू होणार्‍या नवीन शैक्षणिक वर्षाबाबत काल अधिकृत आदेश जारी केला. या नवीन शैक्षणिक वर्षात सर्व वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील विद्यालयांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीबरोबरच इतर माध्यमांचा वापर करण्याची सूचना आदेशात करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीचा लाभ न मिळणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अभ्यास व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. विद्यालयाचे वर्ग सुरू होईपर्यंत ऑनलाइन पद्धतीने शिकविण्याची गरज आहे. नियमित वर्ग सुरू झाल्यानंतर शिक्षकाने पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. कुणीही विद्यार्थी अभ्यासक्रमातील शिक्षणापासून वंचित राहू नये. विद्यालयाचे वर्ग सुरू होईपर्यंत शिक्षकांनी लेक्चर, वर्कशिट आदींचे काम करावे, असे शिक्षण संचालक दिलीप भगत यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील विद्यालयातील शिक्षकांना दरदिवशी शाळेत बोलवायचे की शिक्षकांना घरातून काम करण्याची मोकळीक देण्याबाबत शिक्षण संचालनालय निर्णय घेणार आहेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना गुरूवारी सकाळी केले होते.