कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांचे गोव्यात आगमन

0
113

कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांचे काल गुरूवारी दुपारी गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांच्यासमवेत कॉंग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेसचे नेते संकल्प आमोणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या चार दिवसांच्या गोवा भेटीत श्री. राव हे राज्यातील कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीबरोबरच आगामी विधानसभेसाठी पक्षाची भूमिका काय असेल याविषयी चर्चा करणार आहेत.

नुकतेच भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष व गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी नुकताच दोन दिवसीय दौरा करून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागा असे आदेश देऊन गेले आहे.

सध्या कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडीचा प्रश्न मिटलेला नाही. राज्यातील प्रदेश कॉंग्रेसच्या कायमस्वरूपी अध्यक्षपदी वर्णी लावण्याचे मुख्य आव्हान श्री. राव यांच्या पुढे आहे. सध्या गिरीश चोडणकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आहे.

दरम्यान, दाबोळी विमानतळावर श्री. राव यांना त्यांच्या गोवा दौर्‍याचे कारण विचारले असता भाजपचे सरकार राज्य चालवण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे. कोविड महामारी काळात तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास गोवा सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती, पर्यावरणाची नासाडी करण्यास हे सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे गोवा राज्य मेटाकुटीस आले आहे. गोवा राज्य वाचवायला हवे, त्यासाठी कॉंग्रेसची धडपड चालू आहे असे त्यांनी सांगितले.