शंभर टक्के लसीकरणानंतरच पर्यटन सुरू करणार

0
106

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> ३० जुलैपर्यंत प्रत्येकाला कोरोनाचा किमान पहिला डोस

राज्यातील शंभर टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस दिल्याशिवाय पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला जाणार नाही. येत्या ३० जुलै २०२१ पर्यंत राज्यातील सर्व नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पर्यटन क्षेत्रातील काही व्यावसायिकांनी आपली भेट घेऊन एक निवेदन सादर केले आहे. त्यांनी केलेल्या विविध मागण्यांवर विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी शंभर टक्के लसीकरण केल्यानंतर पर्यटन व्यवसाय सुरू करण्यावर विचार केला जाऊ शकतो.

राज्यात ग्रामपातळीवरील कोरोना लसीकरण शिबिरांना भरघोस प्रतिसाद लाभत आहे. सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आरोग्य खात्याने खरेदी केलेल्या आयव्हरमेक्टिन गोळ्या खरेदीच्या विषयाचा पाठपुरावा करणार आहे. ह्या गोळ्या वेगवेगळ्या ठेकेदारांनी पुरविलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले. या गोळ्यांच्या खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप केला जात आहे. राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली असून गुन्ह्यांच्या तपासकामात वाढ झाली आहे. गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर गृहखात्याच्या अधिकार्‍यांवर थेट आरोप करणे चुकीचे आहे. राजकारण्यांकडून अधिकार्‍यांवर आरोप केले जातात. राजकारण्यांनी राजकारण्यांवर आरोप केले पाहिजेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कोरोना, पर्यटन, गुन्हेगारी आदी विषयावरून काही विरोधी नेत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून गोवा राज्याची बदनामी केली जात आहे. स्वार्थी नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणारी गोव्याची बदनामी थांबवावी. नागरिकांनी अशा स्वार्थी नेत्यांना छडा शिकविली पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात १ लाख नागरिकांना
कोरोना लशीचे दोन्ही डोस
राज्यातील १ लाख २१४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर, ४ लाख ९१ हजार ३९८ नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
राज्यात आत्तापर्यंत लशीचे ६ लाख ९१ हजार ८२६ डोस देण्यात आले आहेत. लस महोत्सव, लसीकरण कायम केंद्रांतून गुरूवारी दिवसभरात १४ हजार ९५९ जणांना डोस देण्यात आले आहेत.