शेतकर्‍यांसाठी सर्वंकष धोरण हवे

0
135
  •  देवदास गावडे
    (कुडाळ)

देशातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. याचे ना शासनाला ना लोकप्रतिनिधींना सोयर सुतक आहे. यासाठी शेतकर्‍यांसाठी सर्वकष धोरणाची गरज आहे.

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो; परंतु त्याच देशातील शेतकरी सुखी आहे की, नाही याचे निरीक्षण करण्याची गरज आहे. देशातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. याचे ना शासनाला ना लोकप्रतिनिधींना सोयर सुतक आहे. यासाठी शेतकर्‍यांसाठी सर्वकष धोरणाची गरज आहे.

एक काळ असा होता की, शेतीला पहिल्या क्रमांकाचे स्थान होते. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असे समजले जात असे. आज नेमकी या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्वांत खडतर प्रसंग आला आहे तो शेतकरी वर्गावर. जो आपला अन्नदाता आहे त्याचे धिंडवडे निघत आहेत. आज शेतकरी उपासमारीने मरत आहे. गेल्या काही वर्षात शेती मालाच्या किमती वाढत नाहीत. बाजारात महागाई निर्माण झाली तरी शेतकर्‍यांपर्यंत योग्य तो भाव पोहोचतच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कर्जबाजारी होऊ लागला आहे. लहान शेतकरी त्याच्या स्वत:च्या शेतात राबून पोट भरत नाही, म्हणून दुसर्‍यांच्या शेतात मजूर म्हणून काम करत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रसंगी पदरात असणारा शेतीचा लहान तुकडाही तो विकत आहे. त्यामुळे जमीन हे शेतीचे मूलभूत साधन शेतकरी गमावून बसल्याचे चित्र दिसत आहे. जगायला पर्याय नाही म्हणून शहरात जाऊन तेथील बकाल वस्तीत भर घालू लागला आहे. शासनातील दप्तर दिरंगाई, कृषी क्षेत्रात काम करणार्‍या लोकांची उदासिनता व बँकिंग क्षेत्राचा वेळकाढूपणा यामुळे शेतकर्‍यांना योग्य वेळी साहाय्य मिळत नाही.

शासकीय योजना सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहोचत नाहीत. अनुदाने, सिंचन, अवजारे, उपकरणे त्यावर मिळणार्‍या सवलती यांची माहिती बर्‍याच शेतकर्‍यांना नसते. शेतकर्‍यांना योग्य दरात जरुरीएवढी वीज, खते, अनदान व प्रामाणिकपणे हात दिला, त्यांच्यावर झोळी पसरण्याची वेळी येऊ दिली नाही तर शेतकर्‍यांवर आर्थिक संकट येणार नाही. यामुळे शेकर्‍यांचा विकास होऊ शकतो. शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याबाबत राष्ट्रीयकृत व खासगी बँकांमध्ये अनास्था आहे. शेतीस पूर्वी काही मिळत नसले तरी शेती केली जायची, पण आज ही परिस्थिती राहिली नाही. शेतीत उत्पन्न पाहिजे असल्यास शेती हुशारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली पाहिजे. फायद्याची शेती करण्यासाठी काटकसर व नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर व बाजारपेठेचे योग्य ज्ञान याची गरज आहे. शेती यशस्वी करायची असेल तर जमीन, हवा, पाणी यांच्या उपलब्धतेनुसार व पिकांचे फेरबदल करणे गरजेचे आहे. उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करून जैविक विविधता यांचे संवर्धन करणे, उत्पादनात वाढ करणे, निकस अशा समस्या असलेल्या जमिनीचा दर्जा सुधारून त्याची उत्पादकता वाढवली पाहिजे. पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे. शेतीसाठी कमी दराने व सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शेतीवर नैसर्गिक संकटे येतात त्यासाठी पूर्वनियोजित स्वस्त व सुलभ विमा योजना करून शेतकर्‍यांना साहाय्य करणे गरजेचे आहे.

शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या विविध संघटनांनी शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायासाठी नियोजनपूर्वक काम केले पाहिजे. गावागावांत शेतकरी साहाय्य गट निर्माण केले पाहिजे. सुशिक्षित तरुण शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांच्यामार्फत प्रत्येक गावातील शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.

केवळ निवडणुकांच्या तोंडावर शेतकर्‍यांकडे राजकीय लोकांनी सुद्धा शेतकर्‍यांना योग्य तो हातभार लावला पाहिजे. त्यांना कोणत्या समस्या आहेत ते पाहिले पाहिजे. तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे. शेतकर्‍यांसाठी शासनाकडून असलेल्या योजनांसाठी लागणारे साहाय्य राजकीय लोकांनी केल्यास शेतकरी सुखी होऊ शकतो.