महापराक्रमी तरीही विनम्र ः हनुमान

0
600
  • सौ. मेघना देवारी (पर्वरी)

सप्तचिरंजीवात ज्याची गणना होते, त्या हनुमंताला रुद्राचा अवतार मानले जाते. या पृथ्वीवर जोपर्यंत रामकीर्ती असेल तोपर्यंत हनुमान जिवंत राहील असा वर सीतामाईंनी हनुमंताला दिलेला आहे. त्या हनुमंताचा चैत्र पौर्णिमेस प्रतिवर्षी आपण जन्मोत्सव साजरा करतो त्या निमित्ताने हा लेखप्रंपच.

मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् |
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरण प्रपद्ये ॥

मारुती, अंजनेय, महावीर, महाबली, हनुमान अशा विविध नावांनी थेट जनमानसात खोलवर रुजलेली एक देवता, रामायणातील एक प्रमुख व रामभक्त वानर. वानर असूनही सर्व मानवी गुणांचा अत्युच्च आदर्श आहे. सर्व स्तरांमध्ये आढळणारे सर्वमान्य असे हनुमंताचे रूप आले कुठून? या मूर्तिरुपातून त्याची कोणती वैशिष्ट्ये आढळतात? त्यातून या देवतेविषयी नेमके काय समजते?

श्रीरामांचा प्रमुख सेवक म्हणून ओळखला जाणारा हनुमान एक लोकप्रिय दैवत आहे. भूत, प्रेत, पिशाच्चबाधा यापासून सुटका करणारी शक्तिशाली, बलशाली, बुद्धिमान व धैर्यशाली देवता, गावोगावी, गावाबाहेर, झाडाखाली आणि ओट्यावर शेंदूरचर्चित मारुतीरायांची पूजा असंख्य भाविक करतात. मारुतीचे हे महत्त्व लोकप्रिय करण्याचे काम उत्तरेत संत तुळशीदासांनी तर दक्षिणेत समर्थ रामदास स्वामींनी केले. वाल्मिकी रामायण, महाभारत. पुराणे या साहित्यग्रंथांमधून हनुमानाविषयी माहिती उपलब्ध होत असली तरी त्याच्या मूर्तीचे वर्णन फारसे आढळत नाही.
हनुमंत मल्लयुद्धात, गदायुद्धात निष्णात होता. तसाच तो विज्ञान, राजकारण हेही जाणणारा होता. तो संगीततज्ज्ञही होता असा उल्लेख पद्मपुराणात मिळतो. त्याच्या जन्माविषयी पराक्रमाविषयी सर्वसामान्यपणे बर्‍याच कथा आपल्याला माहीत आहेत.

हनुमंताची जन्मकथा
अंजनी व केसरी यांचा पुत्र मारुती म्हणजेच हनुमंत, हनुमान, अंजनेय. पण ही पुत्रप्राप्ती त्यांना शिवापासून किंवा वायूपासून झाली आहे. अशी कल्पना असल्याने मारुतीरायांना पवनसुत वायुपुत्र म्हणूनही संबोधले जाते. वाल्मिकी रामायणातील किष्किंधाकांडात जांबवानाने यांचे चरित्र सांगितले ते असे की, पुंजिकस्थला नावाची एक सुंदर व श्रेष्ठ अप्सरा होती. ऋषींच्या शापामुळे ती वानरयोनीत जन्माला आली. स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे होते. महात्मा कुंजर नावाच्या वानराची ती मुलगी होती. पुढे ती केसरी नामक वानराची पत्नी झाली. अंजना एकदा सुंदर स्त्रीचे रूप धारण करून पर्वतावर हिंडत असताना वायूने तिला पाहिले आणि तो तिच्यावर आसक्त झाला. अंजनेला तो आलिंगन देत असताना गोंधळून गेलेली ती पतिव्रता वायूला म्हणाली की, ‘माझे पातिव्रत्य कोण नष्ट करत आहे?’
त्यावर वायू तिला म्हणाला की, ‘हे यशस्विनी, तुला आलिंगन देऊन ज्या अर्थी मी मानसिक उपभोगाच्याच इच्छेने तुझ्या ठिकाणी आपले तेज ठेवले आहे. त्या अर्थी तुला धैर्यवान, वीर्यवान व बुद्धिसंपन्न पुत्र होईल. तो पुत्र महातेेजस्वी, महाबलाढ्य व महापराक्रमी होऊन मार्ग उल्लंघून जाण्यात व उडी मारण्यात माझी बरोबरी करील.’ हा वर मिळाल्यावर संतुष्ट झालेली अंजना एका गुहेमध्ये प्रसूत झाली, तोच हा मारुती.

मारुती जन्माविषयीच्या काही पुराणकथा
ब्रह्मगिरीजवळच्या अंजन पर्वतावर केसरी हा वानर रहात होता. त्याला अंजनी व अद्रिका नावाच्या दोन पत्नी होत्या. अंजना ही वानरमुखी तर अद्रिका ही मार्जारमुखी होती. त्या दोघीही पूर्वजन्मीच्या अप्सरा होत्या. इंद्राच्या शापामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. एके दिवशी केसरी वानर तिथे उपस्थित नसताना अगस्त्य ऋषी तेथे आले असता त्यांचा त्या दोघींनी त्यांचा उत्तमप्रकारे आदर सत्कार केला. त्यावेळी त्यांनी अगस्त्य ऋषींकडे त्यांनी बलवंत आणि सर्वलोकोपकारक अशा पुत्रप्राप्तीचा वर मागितला. त्यानंतर अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे निघून गेले. त्यानंतर वायूने अंजनीला आणि निऋंतीने अद्रिकेला पाहिले व ते त्यांच्याशी रममाण झाले. पुढे अंजनेला हनुमान व अद्रिकेला पिशाचराज झाला. अशी कथा पद्मपुराणात आढळते. अशाच प्रकारच्या कथा आनंद रामायणात आणि ब्रह्मपुराणातही आढळतात.
शिवपुराणातील याहून थोडीशी वेगळी कथा आहे. ती म्हणजे, एकदा शिवाने विष्णूंचे मोहिनी रूप पाहिले. त्यामुळे शिव कामासक्त झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले. ते वीर्य सप्तर्षींनी पानावर घेऊन कर्णद्वारे गौतमीकन्या अंजनीच्या ठिकाणी स्थापन केले. अंजनी गर्भवती झाली आणि तिने मारुतीला जन्म दिला. नंतर नुकत्याच उगवलेल्या सूर्याला पाहून ते फळच असल्याचे वाटल्यामुळे मारुतीने उडी मारून ते सूर्यबिंब घेण्यासाठी झेप घेतली. मात्र त्यामुळे क्रुद्ध झालेल्या इंद्राने त्याच्यावर आपले वज्र फेकून मारल्यामुळे मारुतीची डावी हनुवटी मोडली. त्यामुळे तेव्हापासून मारुती हा हनुमंत म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्या मुलावर वज्रप्रहार झाल्याचे पाहून वायू कोपला. त्याने आपले वहाणे बंद केले. त्यामुळे घाबरून सर्व देव वायूला प्रसन्न करून घेण्यासाठी धडपडू लागले. वायूला विनवू लागले. शेवटी प्रसन्न झालेल्या वायूला ब्रह्मदेवाने सांगितले की, हनुमंताला मी असा वर देतो की, युद्धात शस्त्राने त्याचा वध होणार नाही. तर इंद्र म्हणाला की, माझ्या वराने हनुमंत इच्छामरणी होईल.

(किष्किंधाकांड)
वाल्मिकी रामायणात हनुमंताचे चरित्र तीन ठिकाणी आले आहे. ते म्हणजे किष्किंधाकांड, युद्धकांड व उत्तरकांड. उत्तरकांडातील हनुमंताचे चरित्र हे अगस्त्यऋषींनी रामांना सांगितले आहे. स्थूलमानाने हे चरित्र किष्किंधाकांडातील चरित्राप्रमाणेच आहे.

युद्धकांडात रामसैन्याचा परिचय करून देताना शुकाने रावणाला हनुमंताचे लघुचरित्र सांगितले आहे. मारुती जन्माला आल्यावर याला लहान असतानाच खूप भूक लागली होती. पृथ्वीवरील पदार्थांनी आपली भूक भागणार नाही या विचाराने त्याने सूर्याकडे झेप घेतली. परंतु सूर्यासमीप न जाताच तो उदयाचल पर्वतावर पडला. त्यावेळी त्याची हनुवटी किंचित दुखावली. म्हणून त्यानंतर मारुती हा हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला. हनुमान हा असाधारण पंडित व अद्भुत वक्ता होता. बाल हनुमंताला आपल्या तेजाचा शंभरावा भाग देताना सूर्याने म्हटले आहे की, सर्व शास्त्रांचे अध्ययन करण्याची बुद्धिमत्ता मी याला देतो. त्यामुळे हा श्रेष्ठ वक्ता होईल. (उत्तरकांड ३६/१४)
वाल्मिकींनी त्याच्या या गुणाचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘व्याकरणाचे अध्ययन करण्याच्या उद्देशाने सूर्याला विचारण्याकरिता हा हनुमंत उदयाचलापासून अस्ताचलापर्यंत हिंडत राहिला. व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, वार्तिक, भाष्य आणि संग्रह या सर्वांचे अध्ययन करून इतर शास्त्रांमध्येही तो प्रवीण झाला. शास्त्र व वेदार्थनिर्णय याविषयी याची बरोबरी करणारा जगात कोणीही नाही.’ (उत्तराकांड ३६-४४-४६)

पराक्रमी वीर
पराक्रम हा हनुमंताचा एक विशेष आहे. प्रभू श्रीरामांच्या मते हनुमान म्हणजे शौर्याची मूर्ती. सीतामाईंच्या मुक्ततेसाठी जेव्हा युद्ध अपरिहार्य झाले त्यावेळी प्रत्यक्ष युद्धप्रसंगी त्याने रावणाच्या महापराक्रमी मुलाचा अक्षाचा वध केला. एकाहून एक सरस असलेले जंबुमाली, धूम्राक्ष, अकंपन, निकुंभ, अहिरावण, महिरावण इ. वीरांना त्याने ठार केले. खुद्द रावणालाही त्याने मूर्च्छित केले. समुद्र उड्डाण, अशोकवन विद्ध्वंस, लंकादहन, सीता शोध, द्रोणागिरी पर्वत आणणे, या सार्‍या घटना हनुमानाच्या पराक्रमाची साक्ष देतात.

हनुमंत हा महाशक्तिशाली होता. बुद्धिवान होता मात्र त्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा कधीही गर्व झाला नाही. अत्यंत विनम्र भक्त हीच त्याची खरी ओळख होती. महाभारतामध्ये भीमाला स्वतःच्या बलाचा गर्व झाला होता. त्यावेळी त्याचे गर्वहरण करण्याची किमया महाबली हनुमंताने केली होती, असा हा अत्यंत पराक्रमी तरीही अत्यंत निगर्वी आणि विनम्र भक्त, राम हाच त्याने आपला श्‍वास व प्राण मानला होता. रामाशिवाय अन्य काहीही नाही, राम नाही असे काहीही नाही. असेच हनुमंतांचे जीवन होते.

स्वतःच्या इच्छेप्रमाणे सूक्ष्म किंवा विक्राळ रूप धारण करण्याची विद्या हनुमानाला अवगत असल्यामुळेच हनुमंत लंकेत प्रवेश करू शकला व दुष्ट असुरांना शह देऊ शकला. एवढेच नव्हे तर बलाढ्य रावणाचा आत्मविश्‍वास कमकुवत करू शकला. त्यामुळे प्रभू श्रीरामांचे पुढील कार्य सुलभ झाले. राजनीतीचे बारकावे जाणणार्‍या, उत्तम कार्यसाधक असलेल्या या रामदूताजवळ प्रभू श्रीरामांनी अनेक कामे सोपवली होती. रावणवधानंतर सीतेला निरोप देणे, लंकाविजयानंतर विभिषणाकडे लंकेचे राज्य सोपवून पुन्हा अयोध्येकडे प्रयाण करत असताना भरताला संदेश देणे अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगी रामांनी बुद्धिपुरस्सर हनुमंताची योजना केली.
सप्तचिरंजीवात ज्याची गणना होते, त्या हनुमंताला रुद्राचा अवतार मानले जाते. या पृथ्वीवर जोपर्यंत रामकीर्ती असेल तोपर्यंत हनुमान जिवंत राहील असा वर सीतामाईंनी हनुमंताला दिलेला आहे. आपला समाज बलशाली, निधड्या छातीचा, स्वामिभक्त आणि प्रसंगी प्राणावर उदार होऊन ‘मारिता मारिता मरणारा’ असा व्हायला हवा तर मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या बरोबरीने जितेंद्रिय, बलसंपन्न, बुद्धिमान आणि कार्यसाधक अशा हनुमानाची उपासना करायलाच हवी, असे ५०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी समाजाला निक्षून सांगितले होते. आजही हनुमान मंदिरांतून भाविकांची अलोट गर्दी हेच दर्शवते की,संगणकाच्या वा विज्ञानाच्या युगातही हनुमंत भक्तीला पर्याय नाही. रामोपासनेचा परमादर्श असलेल्या व रामभक्तांना रामाची भेट घडवून देणार्‍या या स्वामिनिष्ठ रामदूताच्या चरणी विनम्र अभिवादन.
उडाला उडाला कपी तो उडाला
समुद्र ओलांडुनी लंकेसी गेला
लंकेसी जाताना विचार केला
नमस्कार माझा तया मारुतीला ॥