शुभ संक्रमण

0
10
  • डॉ. अनुजा जोशी

आपली संस्कृती पूर्वापार असे स्नेहाचे, भावबंधांचे, प्रेमाचे कण-कण सणवार सोहळ्यांतून जमवावेत असे संकेत देत आली आहे. ऊर्जेचा उत्सव व्हावा, सद्भावांचा सोहळा घडावा व जगण्याचे वर्धिष्णू टप्पे सुखप्रद व्हावेत अशीच या सर्वांमागची सदिच्छा आहे. आकाशातल्या सूर्याबरोबरच आता आपल्या मनातल्या आशेच्या सूर्याचंही उत्तरायण सुरू व्हावं आणि आपल्या इवल्या आयुष्याचं हे आणखी एक संक्रमण शुभंकर व्हावं अशा तिळा-गुळाची जोड असलेल्या गोड सदिच्छा… शुभ संक्रमण!

कोणत्याही जगणाऱ्या जीवासाठी संक्रमण किती महत्त्वाचे! किंबहुना संक्रमण होत असल्यामुळेच तो जगणारा जीव ठरतो, सजीव ठरतो. संक्रमण हा त्याच्या वाढीच्या टप्प्यांमधून होणारा त्याचा प्रवास असतो. त्याच्यामध्ये होणारा बदल असतो. त्यामुळे कोणत्याही बदलाच्या प्रवासाला संक्रमण म्हटलं तरी चालेल. शाळेत असताना सामान्यविज्ञानाच्या पुस्तकात पहिल्यांदा सजीव-निर्जीव या संकल्पना शिकल्या तेव्हा मोठी गंमत वाटली होती. सजीव श्वसन करतो, त्याला भूक असते, तो नवीन जीव जन्माला घालतो, तो वाढतो, झिजतो, सतत बदलत असतो. निर्जीवाला हे काहीच नसतं. त्याच्यात ‘जीव’च नसतो. या दोहोंपैकी आपण एक ‘स-जीव’ आहोत याचा एक अनोखा आनंद वाटला होता, काहीतरी वेगळेपण नक्की जाणवलं होतं असं आठवतंय. प्राथमिक शाळेतल्या सामान्यविज्ञानाला पुढे हायस्कुलात भूगोल भेटला. ग्रह-तारे-वारे भेटले. सूर्य-चंद्र समजले. पृथ्वी समजली. ती गोल आहे, फिरते आहे व तिच्यावर सजीव-निर्जीव सामावलेली सृष्टी आहे हेही समजले. अर्थातच पृथ्वीवरच्या मातेसमान मातीविषयी अपार प्रेम दाटून आलं आणि खूप हरखून गेलेलं आठवतंय जेव्हा हे समजलं की पृथ्वीवरची जीवसृष्टी ही सूर्यामुळे आहे! चंद्राचे आपले नुसतेच पण भारीत भारी कौतुक वाटत आले आणि सूर्याबद्दल मात्र विलक्षण प्रेम नि ओढ वाटत गेली ती कायमचीच, आणि तीही सतत वाढत जाणारी. वाढत गेलेली… अगदी त्याच्या सकाळकोवळ्या उन्हापासून भरदुपारी रणरणत जाणाऱ्या भर्जरी उन्हासारखी! त्याच्या उत्तर-दक्षिण भ्रमणांसारखी! सौम्य दक्षिणायन पार करून क्रमाक्रमाने प्रखर होत जाणाऱ्या त्याच्या तेजस्वी उत्तरायणासारखी!

…हे सारे सांगताना मी कुणाकडे व कशाकडे बोट दाखवतेय ते लक्षात आले ना? सृष्टीचा साक्षात चालक-मालक-पालक असणारा सूर्य व जीवसृष्टी धारण करणारी पृथ्वी या दोहोंचे फिरणे, त्यांची भ्रमणे व मार्गक्रमणे म्हणजेच त्यांची ‘संक्रमणे’ आहेत. त्यांचे ‘सम्यक्‌‍ क्रमण इति संक्रमण’ हे समजले की या जीवसृष्टीतला ‘सजीव’ म्हणून त्यांच्यावर अवलंबून असलेले आपले जगणे, वाढणे, बदलणे व आपली संक्रमणे यांचाही उलगडा होत जाईल आणि आदिमकाळापासून ‘सूर्योपासनेत रत’ असलेल्या आपल्या ‘भा-रतीय’ संस्कृतीत ‘संक्रमणा’ला इतके महत्त्व का हेही लख्ख लक्षात येईल. उष्ण कटिबंधात राहणाऱ्या आपलं जगणंच सूर्यावर अवलंबून. ‘सूर्याराजा बोले नि दळ हाले’ अशीच आपली परिस्थिती. साहजिकच सूर्यपूजा ठायी ठायी महत्त्वाची. सूर्योपासना सर्वत्र प्राधान्याची. संक्रांत सण हा तर त्यांच्या संक्रमणांचा व त्यांच्याकडून आपल्यात संक्रमित झालेल्या ‘संक्रमण’ नावाच्या ऊर्जेचा महोत्सव आहे!
गर्द धुक्याचा हिवाळा हळूहळू आपली दव ओली पावलं माघारी फिरवायची तयारी करू लागतो. पावसापासूनचा हा तुलनेने आरोग्याला बलप्रद असणारा काळ आता संक्रमणाच्या दिशेने चालू लागतो. त्याला आता जाता जाता संक्रांतीच्या तिळगुळाचा पौष्टिकपणा अंगात भरून घ्यायचा असतो. पुढे सुरू होणाऱ्या रखरखत्या उन्हाळ्याशी दोन हात करण्याची ही तयारी असते. आयुर्वेदाने निसर्गस्वरूपानुसार ‘ऋतुचर्या’ सांगितली आहे. ऋतूंचे फार सुंदर वर्णन व दोन भागात विभागणी केली आहे. वर्षाचे दोन काळ सांगितले आहेत. एकामध्ये निसर्गाचे रूप सौम्य असते व दुसऱ्यामध्ये तीव्र. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे 12 मराठी महिने माहीत आहेत ना? त्यात अनुक्रमे दोन-दोन महिन्यांची एकेक जोडी करून तिला एकेका ऋतूचे नाव दिलेले आहे. याप्रमाणे बारा महिन्यांचे सहा ऋतू. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशी त्यांची नावं आहेत. पाडगावकरांचे ‘सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे’ आठवले असेल ना? बरोबर! अगदी असेच आहे. निसर्गाची किती सुंदर रचना आहे. अनुक्रमे चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू, आश्विन-कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष-पौष हेमंत ऋतू व माघ-फाल्गुन शिशिर ऋतू अशी ती रम्य विभागणी आहे. आता यात पुन्हा दोन भाग केलेले आहेत. सर्व काही आहे ते मानवी जीवन मुळातून सखोलपणे समजून घेऊन इथे आधी ‘जगण्यासाठी’ नि मग ‘सुंदर जगण्यासाठी’! शिशिर-वसंत-ग्रीष्म हे तीन ऋतू एकत्रित विचारात घेऊन त्यांना ‘आदानकाळ’ म्हटलंय आणि वर्षा-शरद-हेमंत या तिघांना एकत्रितपणे ‘विसर्गकाळ’ म्हटलंय.
आपण इथे साधारणपणे असं समजून घ्यायचंय की पाऊस व थंडीचा सौम्य असा ‘विसर्गकाळ’ आणि उन्हाळ्याचा तीव्र स्वरूपाचा ‘आदानकाळ’ असे दोन प्रकारचे निसर्गाचे स्वरूप आहे. ‘आदानकाळा’त निसर्ग आपल्यातली बळ-ऊर्जा-शक्ती काढून घेत असतो व ‘विसर्गकाळा’त तो आपल्याला बळ-ऊर्जा पुरवत असतो. ते एक रोटेशन आहे ऊर्जेचे. खरोखरीचे आदान-प्रदान आहे. निसर्गाने शक्ती आदान करणे व निसर्गाने शक्ती प्रदान करणे! आपली ‘नैसर्गिक शक्ती’ ही अशी निसर्गाकडून आपल्याकडे व आपल्याकडून निसर्गाकडे संक्रमित होत असते. आणि या रोटेशनला, या ऊर्जा संक्रमणाला लागणारी साधनसामग्री, रसद पुरवण्यासाठी या आदान-प्रदानाच्या सांध्यावर ‘संक्रांत’ येते! म्हणून संक्रांत काळाला ‘ऋतुसंधी’काळ म्हणता येतं. सौम्य व तीव्र दोन ऋतूंच्या सांध्यावरच्या या ‘ऋतुसंधी’काळात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. आता सूर्य हळूहळू आपल्या जवळ जवळ येत प्रखरपणाचे पराक्रम दाखवणार असतो. निसर्ग शक्ती खेचून घेणार असतो. बल क्षीण होत जाणार असते. या सगळ्या नैसर्गिक संघर्षपर्वाची पूर्वतयारी संक्रांतकाळात करायची असते.

संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी.’ भोगीला काय करायचं? निसर्गत: पचनशक्ती उत्तम असते. जाठराग्नी छान प्रदीप्त असतो. मस्त थंडी असते. ऊबदार कपडेलत्ते व शेकोटीची चैन असते. शेतातल्या अपार कष्टानंतर सुगीचं पीक हाती आलेलं असतं. घरात सोनेरी सुखाच्या राशी लागलेल्या असतात. कष्ट करून मिळवलेलं ऐहिक-लौकिक-सांसारिक सुख आनंदाने चारदोन दिवस भोगायचा हा काळ असतो. निसर्ग सांगतो नि काळ त्याला अनुमोदन देतो दिलखुलासपणे की ‘नॉव्‌‍, यू डिजर्व इट्…’ हे मनुष्या, कष्ट करून मिळवलेलं हे एवढंच ‘तिळाएवढं सुख’ तू आता ‘डिजर्व’ करतो आहेस. भोग तो गोडाचा कण मणभर आनंदाने. साजरी कर भोगी. हसरी कर कोणतीही संक्रांत नि हसत हसत संक्रमण कर सुखातून दु:खाकडे, दु:खाकडून सुखाकडे!

हो… आपण हे शिरसावंद्य मानायचं. संक्रांतीची गोडाधोडाची ‘तूपरोटी खाईन, जाडजूड होईन, मग तू मला खा’ असंच जणू आयुष्याच्या भोपळ्यात बसलेल्या आपल्या म्हातारीने वाट अडवणाऱ्या काळाच्या वाघोबाला सांगायचं आणि आरोग्य सहीसलामत राखत त्याच्यापासून पलायन करायचं! यासाठीच सुखाच्या ‘भोगी’च्या दिवशी रूचकर व पौष्टिक जेवण करायचं. मुगाची डाळ व तांदळाची खिचडी करायची. तीळ लावून ज्वारी-बाजरीची भाकरी करायची. वांगं, बटाटा, टोमॅटो, ओले वरणे, सोलाणे (ओले हरभरे), गाजर, शेवगा अशी शेंगदाणाकूट, तीळकूट नि खोबरं लावलेली मिक्स भाजी करायची. चटणी-पापड-कुरड्या. भाकरीवर लोणी. हळद-कुंकू-तेल-काजळ-तीळगूळ-शिधा यांचं वाण द्यायचं. ही सुखाची जंत्री किती मजेशीर आहे पहा. नवीन पिकलेली कडधान्ये, तृणधान्ये, स्निग्ध गोड पदार्थ किंवा नवीन भाषेत सांगायचं तर प्रोटिन्स्‌‍, कार्बोहायड्रेट्स्‌‍, फॅटस्‌‍ सर्वकाही + समाधान व आनंदाची गोड गाणी + कणभराची मणभर संतृप्ती = सुख! हे समीकरण बरोबर जमलंय ना पहा! मग ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या प्रश्नासाठी कुठली मालिका बघण्याची काय गरज आहे?
तर अशी भोगी भरपेट खाऊन झाली की दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांत. तीळ, गूळ, शेंगदाणे, खोबरे, वेलची घालून केलेला तिळगूळ किंवा तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या ही संक्रांतीची दौलत अगदी चांदीबिंदीच्या वाटीतून चांदीच्या चमच्याने हातावर ठेवायची नि ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणायचं. शाळेत असताना आम्हाला ‘माझा तीळ सांडू नको, माझ्याशी भांडू नको’ असंही पुढे जोडताना मजा यायची. मग लाडू, वड्या करून पुरे पडत नाही म्हणून तिळगुळाची पोळी म्हणजे गूळपोळीही करायची. गरम गरम गूळपोळीवर तुपाची धार ही संक्रांतीची बहार. गूळपोळी हा ऊर्जेचा घाऊक पुरवठादार. त्याचा सारा माल आनंदाने घ्यायचा, छान पचवायचा. ऊर्जा मिळवायची. संक्रांतीचं सुगड हाही एक छान प्रतीकात्मक संदेश. धान्याचे व कडधान्याचे दाणे, उसाचे तुकडे, ओले हरभरे, हलव्याचे दाणे, विडा, पैसा असं घातलेलं मातीचं नक्षीदार सुगड मांडून त्याची पूजा करायची. दान द्यायचं. वाण लुटायचं. हळदीकुंकू करायचं. संक्रांतीच्या हळदीकुंकवाचं वेगळेपण असं असतं की यात ‘वाण’ म्हणून द्यायची वस्तू बायकांना वाटायची नसते तर बायकांनी लुटायची असते. पूर्वी हळद, कुंकू, डाळ, तांदूळ, शिधा, साखर, हिरवी काकणं, चिली पिली (छोटी सुगडं) असं लुटण्यासाठी मांडून ठेवत असत. घरगुती उपयोगाच्या वस्तू, धान्य एकमेकींना आनंदाने असं ‘वाण’ म्हणून द्यायचं हा जुन्या काळचा प्रघात होता. मग काळाच्या ओघात बदल झाले. प्लास्टिक, कचकड्याच्या शोभेच्या बुडकुल्यांसारख्या निरूपयोगी वस्तू देण्यात येऊ लागल्या. काही काळ तसाच गेला. पण आता पुन्हा हळदीकुंकूला नटणं-मुरडणं, जरीच्या साड्या, दागदागिने, घरसजावट इ.ची मुबलक हौस करतानाच उपयोगी व रोजच्या गरजेच्या वस्तू देण्याकडे बायकांचा कल झुकलेला दिसतो. जुन्या रितीभाती नवी फॅशन होऊन पुन्हा येतात. नवं रूप धारण करतात. रितीरिवाज असोत किंवा परंपरा, फॅशन असो वा फॅड सतत बदलत राहणं हा जगण्याचा स्थायिभाव आहे. संक्रमणाचा अर्थच तर तो आहे!
संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी तिची ‘कर’ असते. त्या दिवसाला ‘किंक्रांत’ म्हणायचं. पुराणात संकरासुर व किंकरासुर मारणाऱ्या संक्रांतीदेवीच्या विजयाचे हे उत्सव आहेत असेही सांगितले जाते. म्हणून संक्रांतीची ‘कर’ मानली जाते. सुंदर रूपड्याला दृष्ट लागू नये म्हणून गालाला काजळाचं बोट लावतात, त्यातलाच हा प्रकार असावा. किंक्रांतीचं काजळबोट सुखाच्या गालाला लागलं की मग सुखाने मातायची भीती नाही असंही त्या ‘करीदिना’चं महत्त्व असू शकेल.

संक्रातीनंतर येते ती रथसप्तमी. अश्वारूढ सूर्यराजाची पूजा. खास त्याच्यासाठी तुळशीसमोर विस्तव करून त्यावर मातीच्या भांड्यातली खीर किंवा दूध उतू घालवायचं. किती सुंदर रिवाज. भावपूर्ण. आपलं घर भरून दार ओततंय, उतू जातंय इतकी समृद्धी केवळ त्याच्यामुळे आहे आणि ते उतू जाणारं किंवा उतू घालवून त्याला अर्पण करायचं; भोगायचं नाही! असे संकेत. हे प्रतीकात्मक सारं लक्षात येत गेलं की आनंद उतू गेल्याशिवाय राहील का? भावनांचं, विचारांचं संक्रमणच आहे ना हेही?
हो. अजून एक राहिलंय, संक्रांतीच्या तिळगुळाबरोबरच जुन्याकाळी साखरेचा पांढराशुभ्र काटेरी ‘हलवा’ करत, त्याचीही ‘चटक’दार कथा इथे सांगायला हवीय. आता सर्रास तिळगूळ म्हणून जे पांढरे व रंगीत साखरफुटाणे विक्रीला असतात तो या हलव्याचाच आधुनिक प्रकार. पण खरा हलवा असा नुसता साखरेच्या गोळ्या-गोळ्यांचा नसतो. तो नाजूक काटेरी व आतमध्ये तीळ, बिया, डाळ, दाणा असलेला असतो. जुन्या काळी तो करायची पद्धतही ‘आधी हाताला चटके’ अशी असायची. बाबा त्यांच्या आईची आठवण सांगत.
….संक्रांत जवळ आल्यावर एका रात्री आई हलवा करायला बसायची. बाहेर गर्द थंडी नि स्वयंपाकघरात पेटलेल्या चुलीवर लोखंडी तवा टाकलेला. बाहेर जेवढी जास्त थंडी व अंगावर जेवढा जास्त काटा, तेवढा हलव्याच्या अंगावर सुंदर शुभ्र काटा फुलून येणार असं सुगरणींचं गणित. त्याप्रमाणे आई रात्री उशिरा चुलीपुढे सामान जमवून बसलेली. एका छोट्या पातेल्यात साखरेचा पक्का पाक. त्यात छोटा चमचा. विस्तवाची एकसारखी मध्यम आच. एक शुभ्र कापडाचा तुकडा पंचाचा वगैरे. भोपळ्याच्या बिया, भाजलेल्या शेंगदाण्याची भेकलं, काळे तीळ, भाजकी डाळ असं काही काही एका ताटलीत. तोंडाला पाणी सुटलेल्या मुलांचं कोंडाळं चूल आणि आईच्या भोवती आणि आई आता हलवा बनवू लागणार… ती आधी तव्यावर चिमूटभर तीळ, दाणे, बिया टाकणार. चमच्याने साखरेचा चिक्कट पाक त्या एकेका दाण्यावर सोडणार. मग पातळ कपडा हातात घेऊन तापल्या तव्यावरच्या दाण्यांवर बोटं हळुवार फिरवत पाक हलवत राहणार… दाणा गोल गोल फिरत राहिला की हलकेच त्याच्यावर पांढरी साखर पडत जाणार, बघता बघता काटा पडत जाणार. बाबा सांगत ः हळूहळू लहानमोठ्या आकाराच्या हलव्याच्या चांदण्या जमू लागायच्या. पोरांच्या तोंडात विरघळू लागायच्या. मधेच हाताला चटका बसला की आईचं हाय हाय चालायचं. पाण्याच्या भांड्यात जरा हात बुडवायचा, पुन्हा करू लागायचं… तापल्या तव्यावर दाण्यावर पाक हलवताना आईची बोटं भाजायची तसतसा दाण्यावर सुरेख काटा फुलत जायचा… आईचा डबा शुभ्र काटेरी नाजूक हलव्याच्या गोड दाण्यांनी भरून जायचा… बाबांचा आवाज ही आठवण सांगताना घोगरा नि जड होई… माझ्या आठवणींमध्ये बाबांची ही आठवण अशी काही संक्रमित झालेली आहे की एखाद्या चांदण्या रात्री आकाशात बघताना मला आजीच्या त्या डब्यातल्या हलव्याच्या गोड चांदण्याच आभाळभर झालेल्या दिसतात…! आठवणींचा ‘चटका लावणारा गोडवा’ असा! सणाच्या निमित्ताने भूतकाळातून वर्तमानात संक्रमित होणं हेही वेगळी ऊर्जा देणारं असतं. आपलं हे स्मरण संक्रमण आपल्यापाशी एक गोड संचितच होऊन जमा होऊन राहतं ना?
संक्रांतीला ‘काळा सण’ही म्हटलं जातं. पांढरे तीळ अलीकडे आले. गूळही आता पांढरट पिवळा झाला. पूर्वी काळे तीळच वापरले जायचे आणि गूळही तांबडट-काळपट असायचा म्हणून काळ्या तीळगूळ जोडीच्या पण गोडीच्या संक्रांतीला ‘काळा सण’ म्हटलं गेलं असेल अशा मजेशीर तर्काशिवाय संक्रांतीला ‘काळा सण’ म्हणण्याचं कोणतंच कारण मला तरी दिसत नाही. उलट संक्रांतीला काळ्या कपड्यांची हौस केली जाते. काळा कपडा उष्णता जास्त शोषतो. तो आवर्जून या काळात घालावा असाही त्यामागे संकेत असेल. नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा ‘संक्रांतसण’ साजरा केला जातो. सुनेला काळी चंद्रकळा, हलव्याचे दागिने, जावयाला तिळगूळ भरून चांदीची वाटी,
हलव्याचे हारतुरे अशी सुरेख हौस केली जाते. आता आता तर तमाम बायका संक्रांतीची काळी साडी मुद्दाम खरेदी करतात, नेसतात. अजून एक गंमत- बोरन्हाणाची. वर्षभराच्या दुडुदुडु धावणाऱ्या मुलाचं पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण करण्याची एक गोड प्रथा आहे. मुलाला काळं आंगडं शिवायचं. हलव्याचा हार, मुकुट, बासरी असा सरंजाम करून बाळकृष्ण सजवायचा. त्याला पाटावर बसवायचं, औक्षण करायचं आणि चणे-दाणे-चुरमुरे-फुटाणे-बत्तासे (आता गोळ्या चॉकलेटंही) आणि या सीझनला पिकणारी आंबट गोड पिवळी नि लालचुटुक बोरं हे सगळं मुलाच्या डोक्यावरून ओतायचं. त्याला बोरांसारख्या चिमणचाऱ्याने न्हाऊ घालायचं. मग जमलेल्या बाळगोपाळांनी ते सारं लुटून न्यायचं. दूधपितं मूल रांगू लागतं, रांगता रांगता बसतं, बसता बसता उभं राहतं, उभं राहता राहता पाऊल घालतं, चालू लागतं, दुडदुडत धावू लागतं हे सारं लडिवाळ संक्रमणच ना? नवीन रूजलेल्या रोपट्यासारख्या आयुष्याला मुळांपासून घट्ट करत आपल्या पायावर उभं करणारा संक्रमणाचा हा टप्पा संक्रांतीला मुलाला ‘बोरन्हाण’ घालून साजरा करायचा. नवीन लग्न झालेल्या तरुण जोडप्याचं गृहस्थाश्रमामध्ये झालेलं संक्रमणही संक्रांतीला साजरं करायचं. ‘एक तीळ सात जणांनी वाटून घ्यावा’ असं सांगणारी आपली संस्कृती पूर्वापार असे स्नेहाचे, भावबंधांचे, प्रेमाचे कण कण सणवार सोहळ्यांतून जमवावेत असे संकेत देत आली आहे. ऊर्जेचा उत्सव व्हावा, सद्भावांचा सोहळा घडावा व जगण्याचे वर्धिष्णू टप्पे सुखप्रद व्हावेत अशीच या सर्वांमागची सदिच्छा आहे. आकाशातल्या सूर्याबरोबरच आता आपल्या मनातल्या आशेच्या सूर्याचंही उत्तरायण सुरू व्हावं आणि आपल्या इवल्या आयुष्याचं हे आणखी एक संक्रमण शुभंकर व्हावं अशा तिळा-गुळाची जोड असलेल्या गोड सदिच्छा… शुभ संक्रमण!