शिवसेना विरोधात बसणार

0
114

एकनाथ शिंदे विरोधी नेते बनणार
महाराष्ट्रातील अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील न होता, विरोधी पक्षात बसण्याची घोषणा काल शिवसेनेने केली. फडणवीस सरकार विश्‍वासमत ठराव मांडणार असलेले महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन कालपासून सुरू झाले.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सचिवालयास पत्र पाठवले असून सेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांचे नाव विरोधी पक्ष नेते म्हणून घोषित करावे, अशी विनंती केली आहे, असे प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. २८७ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना हा ६३ आमदारांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष असून त्याआधारेच हा दावा करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.सत्तावाटपाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून तिढा कायम होता. परवा शिवसेनेने केंद्रात मंत्री बनण्यासाठी गेलेले आपले खासदार अनिल देसाई यांना दिल्लीहून शपथ घेण्याआधीच अचानक बोलावून घेतले होते. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी सेनेने केली होती. रालोआतील सर्वात जुने मित्र पक्ष भाजप-शिवसेना यांची युती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी जागावाटपाच्या मुद्द्यावर तुटली होती.
गीते केंद्रीय मंत्रिपदी कायम
नवी दिल्ली : एकीकडे भाजप सरकार असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला असतानाच दुसरीकडे केंद्रात शिवसेना खासदार अनंत गीते हे नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात कायम आहेत. आपणास उद्धव ठाकरे यांच्याकडून अजून काही निर्देश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, परवाच्या विस्तारानंतर काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही गीते उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेने परवाच्या मंत्रिमंडळ विस्तारावर बहिष्कार टाकला होता. गीते शिवसेनेने केंद्रातील एकमेव मंत्री आहेत.