आवेर्तान ऐवजी मिकींना मंत्रिमंडळात स्थान?

0
103

प्रमोद सावंतनाही मंत्रीपद शक्य; शुक्रवारी विस्तार
लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात समावेश होऊ न शकलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील मच्छीमारी खात्याचे मंत्री आवेर्तान फुर्तादो यांचा शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी मंत्रिमंडळात समावेश करण्याची शक्यता कमीच दिसत असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. आवेर्तान फुर्तादो यांच्या जागी गोवा विकास पक्षाचे आमदार मिकी पाशेको यांची मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.शुक्रवारी दोन मंत्र्यांचे शपथग्रहण होणार असून सभापती राजेंद्र आर्लेकर अथवा प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
आवेर्तान फुर्तादो यांचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझीन फालेरो यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. फालेरो यांच्या आशीर्वादामुळेच फुर्तादो यांनी राजकारणात प्रवेश करण्यास यश मिळवले होते. लुईझिन यांचे कट्टर विरोधक असलेल्या चर्चिल आलेमांव यांचा पराभव करून ते नावेली मतदारसंघातून निवडले गेले होते. त्यावेळी भाजपनेही तेथे आपला उमेदवार न ठेवता अपक्ष उमेदवार असलेल्या फुर्तादो यांना पाठिंबा दिला होता.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे ईशान्येकडील राज्यांचे प्रभारी असलेले लुईझिन फालेरो हे गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून गोव्याच्या राजकारणात परतल्याच्या पार्श्‍वभूमीवर लुईझिन याना जवळचे असलेले आवेर्तान फुर्तादो हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोळ्यात खुपू लागल्याचे वृत्त आहे.
या पार्श्‍वभूमीवर लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा आरएसएसने समावेश होऊ दिला नसल्याचे वृत्त आहे. मात्र, यासंबंधी फुर्तादो यांना काल छेडले असता ते म्हणाले की, गोव्यात राजकीय घडामोडी घडत असताना आपण मस्कतमध्ये होतो. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फोन करून आपणाला तातडीने बोलावून घेतले. शपथविधी सोहळ्याच्याच दिवशी आपण गोव्यात पोचलो. त्यामुळे नव्या सरकारला आपला पाठिंबा असल्याचे पत्र देण्यास आपणास उशीर झाला. राज्यपालाना वेळीच हे पाठिंब्याचे पत्र आपण देऊ न शकल्याने या तांत्रिक कारणामुळेच आपला मंत्रिमंडळात समावेश होऊ न शकल्याचे फुर्तादो यांचे म्हणणे होते.
दरम्यान, फ्रान्सिस डिसोझा यांना मुख्यमंत्रीपद देण्यात न आल्याच्या तसेच आवेर्तान फुर्तादो यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर ख्रिस्ती धर्मियांचे वर्चस्व असलेल्या सासष्टी तालुक्यातील विविध मतदारसंघांत नाराजीचे वातावरण पसरल्याचे वृत्त आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आता पार्सेकर सरकार कोणती पावले उचलते ते आता पहावे लागणार आहे.