शिवजयंती उत्सवावरून वाळपईत तणाव कायम

0
140

येथील शिवजयंती उत्सव काल तणावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फलक काढल्याने निर्माण झालेला तणाव कायम असून काल पहाटे शेकडो शिवसैनिकांनी हातवाडा, वाळपई येथे शिवाजीच्या पुतळ्याची स्थापना करून जागेला शिवाजी महाराज चौक असे नामकरण केले. यावेळी शिवाजी महाराजांचा जयघोष करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

काल सायंकाळी शिवप्रेमींनी होंडा येथून मिरवणूक काढली. वाळपईत पहाटे स्थापन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर शिवप्रेमींनी उद्यानातील शिवाजीच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर शहरात मिरवणूक विसर्जित केल्यानंतर पालिका व्यासपीठावर प्रमुख कार्यक्रम झाला. कार्यक्रम आटोपल्यानंतर शनिवारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. शेकडो शिवप्रेमींनी वाळपई पोलीस स्थानकावर धडक देत फलक काढलेल्या संशयितांवर कारवाईविषयी विचारणा केली. त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला. यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी तक्रार नोंदवण्यात आल्याचे सांगून संशयितांवर कारवाईचे आश्‍वासन दिले. मात्र, शिवप्रेमींनी त्वरित कारवाईची मागणी केली. अन्यथा आक्रमक होण्याचा इशारा दिल्याने वातावरण तंग होते. तत्पूर्वी, काल दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक कश्यप यांनी दोन्ही गटांची संयुक्त बैठक घेत उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार उत्सव संध्याकाळी संपन्न झाला. मात्र, नंतर पुन्हा कारवाईच्या प्रश्‍नावरून वातावरण तापले. वाळपई शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून असून शिवाजीच्या पुतळ्यांच्या ठिकाणी पहारा ठेवण्यात आला आहे.