अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘1एक्सबेट’ प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सुरेश रैना आणि शिखर धवन यांची काही महिन्यांपूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर आता दोघांच्या 11.14 कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्तीमध्ये सुरेश रैनाची 6.64 कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक, तसेच शिखर धवनच्या नावावरील 4.5 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
सप्टेंबर महिन्यात या प्रकरणात ईडीने सुरेश धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांचे जबाब नोंदवले होते. ईडीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्म 1एक्सबेटच्या संचालकांविरुद्ध अनेक राज्यात पोलिसांनी एफआयआर नोंदवले होते. त्यावर आधारित पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या तपासात आढळून आले की, शिखर धवन आणि सुरेश रैना आणि इतरांनी 1एक्सबेट आणि त्यांच्या सरोगेट्स ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या. यासाठी विदेशी संस्थाबरोबर एंडोर्समेंट करार केले. एंडोर्समेंट करार विदेशी संस्थांद्वारे पाठलेल्या पैशांच्या बदल्यात केले गेले.