बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पूर्ण झाली. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 64.46 टक्के मतदान झाले. 2020 च्या निवडणुकीत 56.9 टक्के मतदान झाले होते. मागील वेळेपेक्षा या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढली आहे. बिहारमध्ये 243 जागांसाठी 2 टप्प्यात निवडणुका होत असून, दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
पहिल्या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, मुझफ्फरपूर, दरभंगा, सारण, सिवान, गोपालगंज, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पटना, भोजपूर आणि बक्सर या प्रमुख्या 121 जागांवर मतदान झाले.
गुरुवारी प्रथम टप्प्यातील निवडणुकीत 3.75 कोटींपैकी 64.46 टक्के मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात 1,000 हून अधिक उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय मतपेट्यांमध्ये बंद झाला असून, काही ठिकाणी हिंसक घटनांची नोंद झाली. उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी आरोप केला की, लखीसरायमध्ये राजदच्या समर्थकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला.
56 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहिले. सुरक्षेच्या कारणास्तव सिमरी बख्तियारपूर, महिसी, तारापूर (मुंगेर जिल्हा) आणि जमालपूर येथे मतदानाची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत मर्यादित करण्यात आली. बिहारमधील शहरी मतदारांनी तेवढा उत्साह दाखवला नाही. 121 पैकी तीन मतदारसंघांमध्ये सर्वात कमी मतदान झाले.
मुजफ्फरपूरमधील तीन
बूथवर मतदान बहिष्कार
गायघाट विधानसभा मतदारसंघातील तीन बूथवर मतदान बहिष्कार टाकण्यात आला. बूथ क्रमांक 161, 162 आणि 170 वरील मतदारांनी ओव्हर ब्रिज आणि रस्ता बांधकामासाठी मतदान बहिष्कार टाकला.
चार भाजप कार्यकर्ते ताब्यात
बिहार शरीफमध्ये मतदानादरम्यान पोलिसांनी चार भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांचे म्हणणे आहे की ते प्रभाग 16 मधील 226 ते 232 क्रमांकाच्या बूथजवळ पत्रके वाटत होते.
भाजप नेत्याकडून 10 महिन्यांत
दोन वेळा विधानसभेला मतदान
मतदार यादीत अनेक दुबार मतदार असून निवडणूक आयोगाकडून जाणुनबुजून याकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहे. त्यातच आता भाजपचे माजी खासदार राकेश कुमार सिन्हा यांनी दिल्ली निवडणुकीनंतर आता बिहार निवडणुकीत दुसऱ्यांदा मतदान केल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. राकेश सिन्हा बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विरोधक दुबार मतदारावरून देशभरात रान उठवत असताना भाजपा नेत्याने 10 महिन्यात 2 राज्यांत मतदान केल्याने खळबळ माजली आहे. राकेश सिन्हा यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. त्यानंतर आता त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीतही मतदान केले आहे.