शिक्षक बदलला तरच शिक्षण बदलेल

0
166

– दिलीप बेतकेकर
‘र्धेी लरपपेीं लेीीशलीं ींहश ीशिश्रश्रळपस ाळीींरज्ञश ेष ींहश लहळश्रव लू सर्ळींळपस र पशु शिप‘
एखाद्याचे स्पेलींग चुकत असेल तर नवीन पेन दिल्याने स्पेलींग दुरूस्त होऊ शकत नाही असे म्हणतात ते खरे, पण आमच्या नेत्यांना ते पटत नसावे. किंवा ‘कळते पण वळत नाही’ असे तरी असावे. शिक्षणक्षेत्रातील समस्या सोडवताना मूळ स्पेलिंग दुरुस्त करण्याऐवजी पेन बदलण्यातच अधिक सारस्य दिसते. पेनांचा कचरा झालाय. मूळ प्रश्‍न काही सुटत नाही.
शिक्षणक्षेत्राबद्दल खूप बोलले जाते. अगदी राष्ट्रपतींपासून गल्लीतल्या सामान्य माणसांपर्यंत कोणीही शिक्षणक्षेत्राबद्दल समाधानी नाही. शिक्षणात आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे असे प्रत्येकजण म्हणत असतो. आजपर्यंत कितीतरी शिक्षण आयोग नेमले गेले, समित्या नेमल्या गेल्या. ह्या समित्या आणि आयोगांनी भरपूर सूचना आणि शिफारशी केल्या. खूप मौलिक, विधायक तरतुदी सुचवल्या. पण खूप मोठे परिवर्तन झाले असे दिसत नाही. अगदी काहीच झाले नाही असे म्हणता येणार नाही, पण अपेक्षित प्रमाणात आणि गतीने बदल घडला असे वाटत नाही. अनेक देशांच्या तुलनेत कमी असला तरी शिक्षणावर जो करोडो रुपयांचा खर्च होतोय, तो कसा आणि कोठे जातोय व त्यातून काय साध्य होते कोणास ठाऊक?कोणी शिक्षकांना व मुलांना कोट आणि टाय देऊन शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करतो, तर कोणी लॅपटॉप, टॅब देऊन शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कोणाला मुलांना माध्यान्ह आहार दिला तर मुले चांगली शिकतील असे वाटते, तर कोणाला मुलांना घरच्या उंबरठ्यापासून शाळेच्या उंबरठ्यापर्यंत बालरथ, इंदिरारथ, गोमंतरथ आणण्याची व्यवस्था केली तर मुलांची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होईल असे वाटते. ज्या मुलांना याची आवश्यकता आहे त्यांना जरूर सर्व सुविधा द्याव्यात. पिढ्यान्‌पिढ्या समाजाचे जे स्तर शिक्षणापासून वंचित राहिले. त्यांच्यासाठी विशेष सोयी, सवलती अवश्य द्याव्यात. पण सवंग लोकप्रियता आणि मतांचा हिशोब नसावा. पण दुर्दैवाने आज अशा योजना आखताना आणि राबवताना प्रामुख्याने मतपेटीच समोर असते असे खेदाने म्हणावेसे वाटते.
कोणतीही योजना आखताना आणि त्याहीपेक्षा अधिक ती राबवताना सर्व बाजूंनी विचार व अभ्यास आवश्यक आहे आणि प्रत्यक्ष योजना राबवल्यावर त्या योजनेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे हे तर आणखीही महत्त्वाचे. पण हे सर्व इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला सवड आणि आवड आहे कोणाला? एकूण ‘आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय’ अशीच स्थिती. आज जे काही चालले आहे ते बघितल्यावर ‘खाज ढोपराला, पण खाजवतोय कोपर’ असे म्हणावेसे वाटते.
आजवरच्या शिक्षण आयोगांनी, विविध शैक्षणिक समित्यांनी, शिक्षणतज्ज्ञांनी ज्या शिफारशी, पद्धती, कल्पना, योजना मांडल्या त्या प्रत्यक्ष वर्गात राबवणारा, कृतीत उतरवणारा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. त्याची मानसिकता, दृष्टी,पद्धती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कोणताही शैक्षणिक बदल होणे अशक्य. डॅनियल पिनाक हे विचारवंत म्हणतात ‘अश्रश्र ळीं ींरज्ञशी ळी ेपश ींशरलहशी-र्क्षीीीं ेपश ींे ीर्रींश र्ीी षीेा र्ेीीीशर्श्रींशी रपव ारज्ञश र्ीी षेीसशीं रश्रश्र ींहश ेींहशीी.‘ किती विश्‍वास आहे शिक्षकांवर त्यांचा!
प्रभावी व परिणामकार शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा हव्यात. साधनसामुग्रीची उपेक्षा करण्याची गरज नाही. इमारती, आसन व्यवस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणक, खेळाचे साहित्य, प्रसाधनगृहे हे सर्व आवश्यक आहेच, पण याच्या पलीकडे सगळ्यांत महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. ‘बंदूक युद्ध करत नाही, बंदूक धरलेले मनगट युद्ध करते आणि खरे तर मनगटही नव्हे तर मनगटामागचे मन खर्‍या अर्थाने युद्ध करते,’ असे म्हटले जाते. मनानेच कच खाल्ली तर बंदूक काहीच करू शकत नाही. खंबीर आणि निर्भिड मन नसेल तर शस्त्राचा काही उपयोग नसतो, याची अनेक उदाहरणे आहेत. शिक्षणात देखील अत्याधुनिक, विपुल साधन सामग्री आहे, पण ती हाताळणारा शिक्षक मनाने आणि हृदयाने तयार नसेल तर ती साधनसामग्री असून नसून सारखीच. त्या साधनसामग्रीचा अपेक्षित व प्रभावी परिणाम दिसत नाही. अनेक शाळांमध्ये अशी सामग्री आणि साधने अक्षरशः धूळ खात गंजत पडलेली बघायला मिळते. म्हणूनच गुरुदेव रविंद्रनाथ टागोर शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित करताना नेमक्या शब्दांत सांगतात, ‘ठशरश्र शर्वीलरींळेप लरप लश ळारिीींशव ेपश्रू लू ींहश ींशरलहशी रपव पेीं लू रपू ाशींहेव‘, खर्‍या शिक्षकाला दिललेी ही सर्वोत्कृष्ट पावतीच नाही का?
मिडास व भस्मासुराच्या गोष्टी सर्वश्रूत आहेत. मिडास ज्या वस्तूला हात लावतो ती वस्तू सोन्याची होते, तर भस्मासूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचे भस्म होते. मिडास स्पर्श लाभलेला शिक्षक असेल तर तो सामान्य गोष्टीतून असमान्य, मौलिक गोष्टींची निर्मिती करतो. तो साधनसामग्रीविना अडून बसत नाही. जे उपलब्ध आहे त्याचा अतिशय कल्पकतेने आणि कलात्मकतेने उपयोग करून तो पुढे जातो, तो राखेतून सोने निर्माण करतो, शून्यातून विश्‍व निर्माण करतो. पण भस्मासुरासारखा हातांचा स्पर्श असेल तर सोन्याची राख व्हायला वेळ लागत नाही. अनेक शाळांमध्ये खेळाचे साहित्य असते, सुसज्ज प्रयोगशाळा असतात. पण शिक्षकाच्या हाताला मिडास ऐवजी भस्मासुराच्या हातांचा स्पर्श असल्यामुळे काहीही उपयोग होत नाही. साधनसामग्रीपेक्षाही मिडास स्पर्श असलेल्या शिक्षकाची आज खरी गरज आहे. देशभर प्रवास करताना असे मिडास स्पर्श लाभलेले शिक्षक दिसतात. पण त्यांची संख्या दुर्दैवाने कमी आहे. खरे तर असे शिक्षक हेरणे, त्यांना उत्तेजन, प्रोत्साहन देणे, शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देणे आणि अशांची संख्या कशी वाढेल याची चिंता व चिंतन करणे, हे काम अग्रक्रमाने व्हायला हवे. हीच शिक्षणक्षेत्राची आज खरी गरज आहे.
कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाची गुणवत्ता जशी असेल त्या प्रमाणात देशाची प्रगती होईल आणि शिक्षणाची गुणवत्ता त्या देशातील शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. चांगले समर्पित, ध्येयनिष्ठ शिक्षक असले तर शिक्षण चांगले आणि चांगले शिक्षण मिळाले तर तो देश पुढे जाईल….
चौदा विद्या चौसष्ट कला
अवगत असल्या जरी सकळा
परी चित्ती नसता एक प्रेमकळा
अवघ्या त्या विफळा॥
शिक्षण आणि शिक्षकालाही हे लागू पडते. एकादा शिक्षक खूप हुशार, बुद्धीमान, विविध विद्या व कलांत पारंगत. पण त्याच्या मनामध्ये स्वतःच्या कामाबद्दल श्रद्धा, भक्ती नसेल, ज्या मुलांना तो शिकवतो त्यांच्याबद्दल प्रेम व ममत्व नसेल तर त्याच्या विद्येचा व कलांचा काहीही उपयोग होत नाही. आपल्या कामाबद्दल, समोरच्या मुलांबद्दल जर मनात मातेची ममता असेल तर शिक्षकामध्ये असामान्य शक्तीचा संचार होतो आणि असाध्य असलेल्या गोष्टी सुद्धा सहज साध्य होतात. ‘अध्यापन करणे हा मातृधर्म पाळणार्‍यांचा व्यवसाय आहे’, असे म्हणताना आचार्य विनोबांना आईचे हृदय असलेला शिक्षक समोर दिसतो.
हे केवळ ‘राहिलो पगारापुरता’ म्हणणार्‍या लोकांचे काम नव्हे. कितीही अत्याधुनिक रोबो आणि संगणक शिक्षकाचे स्थान घेऊच शकत नाहीत, कारण रोबोला व संगणकाला विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हात नाहीत. ‘तुम्ही फक्त लढ म्हणा’ असे म्हणत पाठीवर थाप देणारा हा हात हेच शिक्षकाचे खरे बलस्थान आहे.
‘हार्डवेअर’च्या मागे लागलेल्या आमच्या पुढार्‍यांना ‘सॉफ्टवेअर’चे महत्त्व ज्या दिवशी समजेल तो दिवस शिक्षण क्षेत्रासाठी दिवाळीचा दिवस ठरेल. उत्तम शिक्षक हेच शाळेचे खरे वैभव आहे.