मौका गमावला

0
124

अखेर मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखालील दमदार ऑस्ट्रेलिया संघाने धोनी सेनेला उपांत्य लढतीत चारीमुंड्या चीत केल्यामुळे टीम इंडियाच्या भ्रमाचा भोपळा फुटला. वर्ल्डकपच्या आधी अलीकडेच यजमानांविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि नंतरच्या तिरंगी एकदिवशीय मालिकेतही सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियाने वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर मात्र ते अपयश विस्मृतीत जाण्याइतपत झकास कामगिरी बजावताना सलग सात लढती जिंकण्याची कामगिरी साधली होती. अर्थातच त्यामुळे आता उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाला नमवून जगज्जेतपद राखण्यासाठीही धोनीचे धुरंधर अंतिम लढतीत न्युझीलंडसमोर उभे ठाकणार अशा अपेक्षेत तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी होते. मात्र भारतीय संघाने मोक्याच्या क्षणी कच खाल्ली व मौका गमावला आणि कोट्यवधी भारतीय क्रिकेट रसिकांच्या वाट्याला घोर निराशा आली. खेळात जय-पराजय या गोष्टी असतातच, हे निर्विवाद. असे असले तरी भारतीय संघाकडून किमान जोरदार संघर्षाची अपेक्षा होती. ही लढत एवढी एकतर्फी अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. याचे कारणही तसेच होते. स्पर्धेपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला विजयापासून वंचित ठेवले होते. मात्र वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर बाजू भारताच्या दिशेने फिरली. समोरील सर्वच संघांना आपल्या सुधारित दर्जेदार खेळाच्या बळावर भारतीय संघाने धूळ चारीत आपला दबदबा निर्माण केला होता. भारतीय संघाच्या या सुधारित कामगिरीची सर्वच संघांनी दखल घेतली होती. दस्तुरखुद्द ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क यानेही ही बाब मान्य केली होती. त्याने या संदर्भात बोलकी प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. तो म्हणाला, ‘संघ तोच आहे. फरक एवढाच की या संघाच्या दृष्टीकोनात बदल झाला आहे. प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय संघ धोकादायक आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही की सातव्या सामन्यापर्यंत भारतीय संघाचे जे प्रतिस्पर्धी होते, त्यांच्या तुलनेत धोनीचा संघ अधिक काळापासून ऑस्ट्रेलियात होता. येथील हवामान, खेळपट्‌ट्या याविषयी त्यांना अधिक सराव होता, हवामानाशी जुळवून घेण्यास भारतीय संघाला अधिक वेळही मिळाला होता. हे सांगत असताना अर्थातच भारतीय संघाची क्षमता, दर्जा याबाबत कोणीही या संघाला कमी लेखू शकणार नाही. याचवेळी पहिल्या सात सामन्यांमध्ये भारतीय संघाला या उपखंडात दीर्घ काळ राहिल्याचा लाभ नक्कीच झाला, तसेच साखळी सामन्यासाठीच्या ड्रॉ मध्ये भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड हे मातब्बर संघ नव्हते. क्रिकेटमध्ये जर-तर या गोष्टींना विशेष अर्थ नसला तरी हे दोन संघ भारताच्या गटात असते तर उपांत्य फेरी गाठणे भारताला कदाचित शक्यही झाले नसते. ऑस्ट्रेलियाने दिलेले ३२९ धावांचे विजयासाठीचे आव्हान तसे आव्हानात्मकच होते. विशेषतः त्यांच्या ताफ्यातील मिचेल जॉन्सन, स्टार्क यांच्यासारखे तेज गोलंदाज ताफ्यात असल्याने. असे असले तरी रोहीत शर्मा व शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र वैयक्तिक ४५ धावांवर मोठा फटका हाणण्याच्या नादात धवन बाद झाल्यानंतर भारतीय संघ गडबडला. वरच्या स्थानावरील एखाद्या जरी फलंदाजाने शतकी खेळी केली असती किंवा वरच्या क्रमावरील फलंदाजांनी चांगल्या भागिदार्‍या केल्या असत्या तर आपला संघ ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झुंजवू शकला असता. सलामीच्या लढतीत पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकलेला विराट कोहली नंतरच्या सामन्यांमध्ये ती तडफ दाखवू शकला नाही व बेफिकीर फटका मारून त्याने मिचेल जॉन्सनला आपली विकेट बहाल केली. त्यावेळी केवळ एक धाव त्याच्या खात्यावर होती. बहरात असलेला रैनाही खराब फटक्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी व अजिंक्य रहाणे यांनी आशा जागवल्या. धोनीने झुंजार ६५ धावांची खेळी केली. मात्र अंतिम षटकांमध्ये आवश्यक असलेल्या साथीदाराअभावी धोनी अगतिक ठरला. आता या कामगिरीनंतर क्रिकेट पंडीत आणि सर्वसामान्य रसिकांमध्ये चर्चा होत राहतील. धोनीने फलंदाजीत वरच्या क्रमांकावर यायला हवे होते असेही काही तज्ज्ञ आता बोलत आहेत. मात्र आता या चर्चांना काही अर्थ नाही. एक गोष्ट नक्की. एक सर्वदृष्ट्या सरस संघ कालच्या लढतीत जिंकला हे मान्य करावे लागेल. आधीच्या दारुण अपयशानंतर येथपर्यंत मारलेली मजल ही धोनी सेनेची मोठी झेपच म्हणावी लागेल. यासाठी भारतीय संघाची प्रशंसा करावीच लागेल.