Home Featured शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

0

भटकळ तालुक्यातील घटना, दोघे बेपत्ता, चौघांना वाचवले

उत्तर कर्नाटकातील भटकळ तालुक्यात शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या 14 जणांपैकी 8 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे. भटकळ तालुक्यातील तट्टे हक्कळू नदीत रविवारी ही घटना घडली.

थट्टेहक्कलू नदीत बुडाल्याने एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आणखी दोघे बेपत्ता आहेत. नदीत शिंपले गोळा करण्यासाठी 14 जण गेले होते. यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर चारजणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मृतांची नावे
या दुर्घटनेत लक्ष्मी मदेव नायक (38), लक्ष्मी शिवराम नायक (39), मालथी जट्टप्पा नायक (38), मस्तम्मा मंजुनाथ नायक (43), लक्ष्मी नायक, लक्ष्मी अन्नाप्पा नायक (44), ज्योती नायक (37) आणि उमेश मंजुनाथ नायक (42) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. स्थानिक पोलीस, किनारी सुरक्षा दल आणि मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

उत्तर कन्नड जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी शोधमोहीम राबवण्यात येत असून शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. चौघांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

हे सर्वजण भटकळमधील शिराली भागातील शारदाहोलच्या पदुशिराली गावातील रहिवासी होते. पाणी ओसरल्यानंतर नदीत आणि समुद्रात जाऊन शिंपले गोळा करण्याची स्थानिक मच्छीमारांची परंपरा आहे. त्यानुसार संपूर्ण कुटुंब थट्टेहक्कलू नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र नदीच्या पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही मोठी दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.