युद्धबंदी करार अंतिम टप्प्यात आल्याचा ट्रम्प यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार
अमेरिका आणि इराणमधील भीषण युद्ध अखेर संपणार असल्याचे संकेत देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचा ऐतिहासिक करार अंतिम टप्प्यात आल्याची घोषणा केली. जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार असल्याचीही माहिती यावेळी त्यांनी दिली. मात्र होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास इराणने तयारी दर्शवली असली, तरी युरेनियमबाबत स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटीत पुढे काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेले अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील भीषण युद्ध आता थांबण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांमधील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची घोषणा ट्रम्प यांनी शनिवारी रात्री केली. या संभाव्य करारामध्ये जागतिक व्यापारासाठी आणि कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी पुन्हा पूर्णपणे खुली करण्याचाही समावेश आहे.
अमुविषयक मुद्दा नाही
इराणकडून अमेरिकेसोबतच्या प्राथमिक करारामध्ये त्यांच्या अणुविषयक मुद्द्याचा समावेश नाही. तो सध्याच्या कराराचा भाग नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी इराणने उच्च संवर्धित युरेनियमचा साठा अमेरिकेला सोपवण्यास सहमती दर्शवल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच इराणने सदर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच आमचा अणुकार्यक्रम अमेरिकेसोबतच्या मूळ कराराचा भाग नाही. इराणचा उच्च संवर्धित युरेनियमचा साठा देशाबाहेर पाठवण्यात सध्या कोणताही करार झालेला नाही, असे इराणने म्हटले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेलाही दिलासा
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प इराणला शांतता करारावर स्वाक्षरी न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देत होते. शनिवारीच त्यांनी इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा असलेला एक आक्रमक फोटो पोस्ट केला होता. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आपण इराणवर पुन्हा एकदा भीषण लष्करी हल्ला करण्याच्या अगदी जवळ होतो. पण आखाती देशांच्या विनंतीवरून हे हल्ले सध्या थांबवण्यात आले आहेत.’ मात्र, या प्रचंड तणावानंतर अखेर दोन्ही बाजू युद्धाऐवजी राजकीय तोडगा काढण्यास तयार झाल्या आहेत.
शांतता कराराची घोषणा
लवकरच ः डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ऐतिहासिक कराराची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी मध्यपूर्वेतील आणि आशियातील प्रमुख देशांच्या प्रमुखांशी फोनवर महत्त्वाची चर्चा केली. यामध्ये कतार, सौदी अरेबिया, यूएई, पाकिस्तान, जॉर्डन, इजिप्त, टर्की आणि बहरीन यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांना या कराराच्या प्रगतीची माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ अकाउंटवर माहिती देताना, आम्ही अजूनही या कराराच्या अंतिम मुद्द्यांवर बारकाईने चर्चा करत आहोत, लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल. असे म्हटले आहे.
होर्मुझ खुली होण्याची शक्यता
या चर्चेनंतर टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी या प्रगतीबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. कारण या ऐतिहासिक करारामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गातून कोणत्याही अडथळ्याविना आणि कराविना सुरक्षितपणे ये-जा करता येणार आहे.