शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय सर्वांच्या सल्ल्याने घेणार ः मुख्यमंत्री

0
296

राज्यातील दहावी आणि बारावीसह शालेय वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन, पालक, शिक्षकवर्गाशी चर्चा केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली.

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार विद्यालयांचे वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा केली जात आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश येत्या १५ ऑक्टोबरनंतर पालक, विद्यालयांच्या व्यवस्थापनांची मते आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यालयाचे वर्ग घेण्यास मान्यता देऊ शकते. विद्यालयाचे वर्ग सुरू करण्यापूर्वी मुलांच्या पालकांची संमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यालयाचे वर्ग, शिकवणी वर्ग सुरू करण्याबाबत काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिक्षणसंस्थांनी ऑनलाइन शिक्षणास प्राधान्य द्यावे असे त्यात म्हटले आहे. विद्यालयातील मुले आणि इतरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विविध सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यालय स्वच्छ ठेवण्याची सूचना करण्यात आली असून परिसरातील हवा खेळती राहील याची काळजी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.