कॉंग्रेसचे कर्नाटकातील संकटमोचक शिवकुमार यांच्यावर सीबीआय छापे

0
302

कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंगांमध्ये कॉंग्रेसचे वेळोवेळी संकटमोचक ठरलेले कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरासह विविध ठिकाणी काल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने छापे मारले. कर्नाटकमधील पोटनिवडणुकांच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने त्याला राजकीय रंग असल्याची चर्चा होत आहे.

काल भल्या पहाटे शिवकुमार यांच्या घरी सीबीआय पथक थडकले. त्यांचे निवासस्थान तसेच अन्य पंधरा ठिकाणांवर हे छापे मारले गेले. त्यांचे धाकटे बंधू व बंगलुरू ग्रामीणचे खासदार डी के सुरेश यांच्या घरावर तसेच त्यांच्या कनकपुरा तालुक्यातील मूळ घरीही छापे मारले गेले. दोन्ही नेत्यांच्या घरांतून पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे. शिवकुमार यांनी आपल्यावरील कारवाईविरुद्ध न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे. २०१७ मध्येही शिवकुमार यांच्यावर आयकर विभाग व अंमलबजावणी संचालनालयाने असेच छापे मारले होते.