शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

0
455
  • चेतन कवळेकर
    (राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक)

शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक तंदुरुस्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. निरोगीपणा हा एखाद्याच्या दैनंदिन जीवनपद्धतीचा भाग असणे आवश्यक आहे. खेळ हे विद्यार्थ्यांना समन्वय साधण्यास मदत करतात, तसेच शरीराची काळजी कशी घ्यावी हेसुद्धा शिकवतात.

जागतिक आरोग्य संस्थेने ‘शारीरिक शिक्षण’ या विषयाची व्याख्या शाळेतील मुलांची शारीरिक तंदुरुस्ती विकसित करणारे शिक्षण म्हणून केलेली आहे. शाळेतील प्रभावी शारीरिक शिक्षणाचा तास विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्यास, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यास तसेच वैयक्तिक आरोग्य निरोगी ठेवण्याबरोबरच, विद्यार्थ्यांमधील सकारात्मक सामाजिक कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी लाभदायक ठरतो.
शारीरिक शिक्षणाची व्याख्या जरी विद्यार्थ्यांची क्षमता आणि आत्मविश्वास विकसित करणारे, शारीरिक क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यास विश्वास निर्माण करणारे शिक्षण म्हणून केलेली असली तरी शारीरिक शिक्षण म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती जो या विषयाचा प्रमुख हेतू आहे, तो आधी समजून घेणे आवश्यक आहे.

शारीरिक शिक्षणात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी तंदुरुस्ती, सहनशक्ती वाढविणे, लवचिकता व शरीररचना आदी गोष्टींचा समावेश होतो.
शारीरिक शिक्षण हे सक्रिय आणि निरोगी जीवनशैली प्रस्थापित करण्यासाठी व त्याचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य, ज्ञानमूल्ये आणि दृष्टिकोन विकसित करते. शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देते. उच्च गुणवत्तापूर्व असा शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम घेण्यासाठी आणि शारीरिक क्रिया यशस्वी बनविण्यासाठी मदतगार ठरतो. शारीरिक शिक्षण शिकविण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलांना शरीर-व्यवस्थापनाचे आवश्यक कौशल्य शिकविणे, तंदुरूस्त असे शरीर ठेवण्यास प्रोत्साहित करणे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कार्यसंघ, क्रीडाकौशल्य आणि सहकार्याच्या भावनेचा विकास करणे.

शारीरिक शिक्षणाचे आधुनिक काळातील महत्त्व
आजच्या काळात शारीरिक शिक्षण फार महत्त्वाचे आहे. मनुष्य केवळ आणि केवळ शारीरिक श्रम आणि व्यायामाद्वारेच निरोगी राहू शकतो. शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक तंदुरुस्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. निरोगीपणा हा एखाद्याच्या दैनंदिन जीवनपद्धतीचा भाग असणे आवश्यक आहे. खेळ हे विद्यार्थ्यांना समन्वय साधण्यास मदत करतात, तसेच शरीराची काळजी कशी घ्यावी हेसुद्धा शिकवतात.

लहान वयातच ऍथलेटिक क्रियाकलापांमध्ये भाग घेतल्याने शारीरिक तंदुरुस्तीची सवय लागते. त्यामुळे आरोग्यविषयक तक्रारी दूर राहतात. शालेय कामात अतिभर दिल्याने विद्यार्थ्यांचे जीवन कंठाळवाणे बनू शकते आणि परिणामी नैराश्य अथवा अपयश पदरी पडू शकते. शारीरिक शिक्षण मुलांना जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. त्यांच्यामधील विचारक्षमता वृद्धिंगत करते. मैदानी खेळ, व्यायाम आदींद्वारे शारीरिक शिक्षणाचा शिक्षक मुलांची एकाग्रता वाढवू शकतो. मुलांची निरोगी वाढ आणि विकास होण्यासाठी शारीरिक शिक्षण महत्त्वाचे आहे. आज अनेक शाळांमध्ये मुले अपायकारक पदार्थ खातात. नियमित अशा गोष्टींचे सेवन केल्यास बाल्यावस्थेतच त्यांना लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे प्रगत अशा पाश्चात्य देशांमध्ये प्राथमिक शिक्षणापासूनच शारीरिक शिक्षण अथवा खेळ आदींना अधिक महत्त्व दिले जाते. दिवसाचा एक तास खास व्यायामासाठी ठेवला जातो, जेणेकरून विद्यार्थी अधिक सक्रिय होतात व अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात. यासाठीच भारतातील बर्‍याच राज्यांमध्ये प्राथमिक शाळास्तरावर विद्यार्थ्यांवर कुठलाही ताण दिला जात नाही.
आपले क्रीडा धोरण फक्त गुणांवर भर देऊन मर्यादित न ठेवता ते स्वयंपूर्ण अमलात आणणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती दृष्टीस पडते. शाळांमध्ये शारीरिक शिक्षण लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब रोखण्यास मदत करते, शारीरिक कसरती केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरिज नष्ट होतात; आणि असे जर झाले नाही तर शरीरातील चरबी वाढते. शरीरातील हाडे व स्नायू बळकट बनविणारा व्यायाम शालेय मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले विद्यार्थी ऊर्जावान व सामर्थ्यवान असतात. त्यामुळे असे विद्यार्थी वर्गात अभ्यासामध्ये रस घेतात.

शारीरिक तंदुरुस्तीचे फायदे
निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित शारीरिक तंदुरुस्ती सांभाळणे गरजेचे आहे. नियमित शारीरिक तंदुरुस्तीचा फायदा विद्यार्थ्यांना स्नायूंची ताकद वाढविण्यास व हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास सहाय्यभूत ठरतो. नियमित शारीरिक कसरती केल्याने शरीर पोषक द्रव्यांचे शोषण चांगल्या रीतीने करते. पचन प्रक्रियाही सुधारते. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्य आणि स्वाभिमान सकारात्मक बनतो. तसेच संघभावना, संप्रेषण कौशल्य, विविध प्रकारच्या पाश्वभूमीवरून आलेल्या व भिन्न व्यक्तिमत्त्वे असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर सहकार्याची क्षमताही वाढीस लागते. खेळांमुळे हात व डोळे यांचा समन्वयही चांगला सुधारतो.

शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व शिकवते. शालेय जीवन हे असे वय आहे जिथे विद्यार्थी अतिवजन आणि खाण्याच्या विकृतींचा अर्थ चुकीचा लावतात. शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य आहार आणि पौष्टिकतेसंबंधी आवश्यक मार्गदर्शन करते.

शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम, गृहपाठ आदींचे ओझे, वर्गातील साथीदारांचा दबाव मोठ्या प्रमाणावर असतो. खेळ, मनोरंजनाचे उपक्रम अथवा शारीरिक तंदुरुस्तीचे प्रकार विद्यार्थ्यांना तणावमुक्तीच्या दिशा दाखवतात. आज संपूर्ण देशभर पसरलेल्या कोवीड-१९ या साथीच्या रोगावर एकमेव उपाय म्हणजे आपली शारीरिक तंदुरुस्ती बळकट असणे होय. ही काळाची गरज आहे. शरीराची तंदुरुस्ती ही केवळ आपली प्रतिकार क्षमता वाढविते असे नाही, तर कोणत्याही आजाराला सामोरे जाण्यासाठी शरीराला ऊर्जा प्रदान करते. आज आपण आपल्या सभोवताली सर्वत्र वजन नियत्रंण वर्ग, व्यायामशाळा यांची झपाट्याने वाढ होताना पाहतो. तारुण्याच्या आरंभकाळात अज्ञानामुळे व शरीराच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे आजारपणात आपण वैद्य, केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांची पोटे भरण्याचे कार्य करतो.

भारतातील बर्‍याच राज्यांत शारीरिक शिक्षणाला कमी दर्जाचे मानले जाते. शालेय अभ्यासक्रम, शारीरिक शिक्षण आणि खेळांना म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही. उलट शारीरिक शिक्षण हा वेळेचा अपव्यय असेच मानले जाते. आज खेळांमध्ये भाग घेतल्याने आपल्याला केवळ प्रसिद्धी आणि पैसाच मिळत नाही, तर त्याद्वारे व्यक्ती आपले जीवन जगू शकते. शासनाने शारीरिक शिक्षण या विषयाचे गांभीर्य ओळखून प्रस्तुत विषय इतर विषयांप्रमाणेच अनिवार्य व महत्त्वाचा केला पाहिजे. नवीन शिक्षण धोरण तयार करताना या विषयाकडे योग्य लक्ष पुरविले जाईल अशी आशा बाळगणे उचित ठरेल. शैक्षणिक धोरण निश्चित करताना शिक्षणतज्ज्ञ यावर गंभीर विचार करतील, जेणेकरून ऑलिम्पिक व जागतिक पातळीवरील क्रीडा क्षेत्रात नामांकित होण्याबरोबरच आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या बाबतीतही भारत अव्वल ठरेल. शारीरिक शिक्षणाला महत्त्व देताना अंमलबजावणी प्राधिकरणाला/शारीरिक शिक्षण शिक्षकाला अधिक महत्त्व दिले जावे.