एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

0
243
  • ज. अ. रेडकर.

मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती जेव्हा इहलोक सोडून जाते तेव्हा काळीज कुठेतरी हेलावते. म्हणूनच आनंद बांदोडकर या माझ्या वयोवृद्ध चाहत्याची प्रत्यक्ष भेट घडली नाही याची चुटपूट मनाला लागली ती काही केल्या कमी होईना.

शनिवार दि. २० फेब्रुवारी २०२१ च्या दै. ‘नवप्रभे’च्या अंकात माझे ‘दुभंगलेली मने’ हे एक संस्मरण प्रसिद्ध झाले. त्याच दुपारी एक अनामिक फोन आला, ‘‘मी डॉ. बांदोडकर बोलतोय.’’ मी बुचकळ्यात पडलो. कारण माझ्या परिचयातील ही व्यक्ती नव्हती मग मला फोन कसा काय? तरीपण नमस्कार चमत्कार झडले व त्यांनी बोलायला सुरुवात केली. ‘‘मी डॉक्टर औदुंबर बांदोडकर, हृदयतज्ज्ञ, मी मिरामारला राहतो पण रोज सकाळी खोर्ली येथील घरी आई-वडिलांना भेटायला जातो. तिथे ‘नवप्रभे’तील आपले लेख नेहमी वाचतो. मला आणि माझ्या वडिलांना तुमचे लिखाण आवडते…’’ वगैरे वगैरे. माणूस खूपच गोष्टीवेल्हाळ! फोनवरच्या पहिल्याच भेटीत अगदी जवळच्या मित्राशी बोलावे तसे बराच वेळ संभाषण चालू होते. म्हणजे तेच बोलत होते, मी फक्त ऐकत होतो. यातून माणूस उलगडत गेला. आपला वाटायला लागला.

कोणताही कलाकार असो अथवा कवी-लेखक असो, त्याच्या कलेची किंवा साहित्यकृतीची कुणी दखल घेतली, कौतुक केले तर त्याला ते आवडते. आपल्या कलेचे, लिखाणाचे चीज झाल्याचे समाधान त्याला वाटते. नवीन काहीतरी करायची ऊर्मी येते. मीदेखील या गोष्टीला अपवाद नव्हतो आणि नाही. माझे वर्तमानपत्रीय लिखाण वाचून अनेकांचे यापूर्वीदेखील फोन यायचे आणि येतात, पण ते सर्व माझ्या परिचितांचे! डॉ. बांदोडकर हे त्यादृष्टीने अनाहूत आणि अनोळखी होते. मी त्यांना विचारले, ‘‘माझा संपर्क क्रमांक आपणास कसा काय मिळाला?’’ तर त्यांचे उत्तर- ुळश्रश्र ुळश्रश्र षळपव र ुरू. त्यांनी थेट संपादक महाशयांशी संपर्क साधून माझा नंबर मिळवला आणि माझ्याशी संपर्क साधला होता. असा द्राविडी प्राणायाम सहसा कुणी करीत नाही, अगदी आपले मित्र व नातेवाईकसुद्धा! म्हणूनच मला या माझ्या चाहत्याच्या फोनचे विशेष कौतुक वाटले. स्वतः डॉ. बांदोडकरच नव्हे तर त्यांचे वयोवृद्ध वडील श्री. आनंद बांदोडकर हेदेखील माझे लेख आवडीने वाचतात हे त्यांनी सांगताच मला तर धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.

पुढच्याच शनिवारी म्हणजे २७ फेब्रुवारीला माझे ‘एक धागा सुखाचा’ हे संस्मरण प्रसिद्ध झाले. परंतु अपेक्षेप्रमाणे डॉ. बांदोडकर यांचा फोन काही आला नाही. कदाचित कामाच्या गडबडीत राहून गेले असेल किंवा माझे लिखाण आवडले नसेल म्हणून फोन आला नसेल अशी मी समजूत करून घेतली. कारण प्रत्येक लेख किंवा कलाकृती आपल्या चाहत्याला आवडेलच असे नसते! त्याच्या दुसर्‍या दिवशी दुपारी अचानक डॉ. बांदोडकर यांचा फोन आला. आधी वाटले, माझ्या लेखावरची प्रतिक्रिया देण्यासाठी फोन केला असेल, पण नाही, त्यांनी फोनवरून सांगितले की त्यांचे बाबा- आनंद बांदोडकर- हे मंगळवार दि. २३ फेब्रुवारीला वयाच्या ९८ व्या वर्षी अनंतात विलीन झाले आणि त्याचा आजचा हा सहावा दिवस! ती बातमी ऐकून मन उदास उदास झाले. उदास यासाठी की मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. जन्म-मरण हे तर प्रत्येकासाठी अंतिम सत्य आहे, परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती जेव्हा इहलोक सोडून जाते तेव्हा काळीज कुठेतरी हेलावते. म्हणूनच आनंद बांदोडकर या माझ्या वयोवृद्ध चाहत्याची प्रत्यक्ष भेट घडली नाही याची चुटपूट मनाला लागली ती काही केल्या कमी होईना. ही हळहळ त्यांच्यावर लेख लिहून कमी करता येईल काय म्हणून हा लेखप्रपंच!

कोण होते हे आनंद बांदोडकर? ते होते एक प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, स्पष्टवक्ते, आपल्या मताशी ठाम राहणारे, अडल्या-नडलेल्यांना मदत करणारे, कला, साहित्य, शिक्षण यांना प्रोत्साहन देणारे, गरजवंतांना आर्थिक मदतीचा हात देणारे, देश-विदेशांत भ्रमंती करणारे, चिरंतन उत्साहाचा झराच जणू! वयाची नव्वदी गाठलेली असताना हा माणूस आपल्या परिवारासह जगप्रवासाला निघाला म्हणजे पाहा! त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला समाजवादी आणि पुरोगामी विचारांची झालर होती. आपली परखड मते विशेषतः दै. ‘नवप्रभे’त पत्ररूपाने ते प्रसिद्ध करायचे. त्यावरून कुणी वाद उपस्थित केला तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर द्यायचे.
कै. आनंद बांदोडकर हे मूळचे दक्षिण गोव्यातील निसर्गरम्य लोटली या गावचे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार मारियो मिरांडा याच गावचे आणि तेदेखील या आनंद बांदोडकर यांचे जीवश्च कंठश्च मित्र! किंबहुना मारिओ यांच्या चित्रकलेच्या आवडीला प्रोत्साहन देणारे आणि त्यांना मुंबईच्या ‘इलुस्ट्रीटेड विकली’ या इंग्रजी साप्ताहिकात दाखल होण्यासाठी प्रवृत्त करणारे आनंद बांदोडकर हेच होत. पुढे मारिओ यांच्या आंतरधर्मीय प्रेमविवाहाला सक्रिय पाठिंबा देणारेही तेच! ज्या काळात आंतरजातीय विवाहाला मान्यता नव्हती त्या काळात मारिओ-हबीबा हा ख्रिस्ती-मुस्लीम आंतरधर्मीय विवाह घडवून आणणे म्हणजे मोठेच धाडसाचे होते. पण ते धाडस आनंद ऊर्फ बंडू बांदोडकर यांनी करून दाखविले.

आनंद बांदोडकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९२३ चा! व्यवसायाने सुवर्णकार असलेले विठ्ठल उपेंद्र बांदोडकर व गोपिकाबाई यांचे हे पुत्ररत्न! त्यावेळच्या गोव्यातील हिंदू परंपरेनुसार इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण मराठीत झाले. पोर्तुगीज अंमल असल्याने साहजिकच त्यांचे पुढचे सर्व शिक्षण पोर्तुगीज माध्यमातून मडगाव व पणजी येथील ‘लायसीएम’मध्ये झाले. लोटली हा गाव बहुसंख्य सारस्वत ख्रिस्ती समुदायाचा. हिंदूंची संख्या तिथे तशी कमीच म्हणायला हवी. आपण ज्या परिसरात राहतो, वाढतो त्या परिसराशी आपले नाते जुळते, तिथल्या लोकांशी मैत्री जमते, त्या परिसराचे संस्कार आपल्यावर घडत जातात. आनंद बांदोडकर याला अपवाद कसे असू शकतील? एक गोष्ट खरी आहे की, गोमंतकातील मूळ गोवेकरी हिंदू-ख्रिस्ती-मुसलमान समाज आजही गुण्यागोविंदाने नांदतो. एकमेकांच्या सणा-उत्सवांत, सुख-दुःखांत सामील होतो. रूढी, परंपरा, लोककला यांचे जतन अगदी मनापासून करतो. वागण्या-बोलण्यात कृत्रिमता नसते. सर्वांशी सौहार्दाचे संबंध ठेवले जातात. अशाच प्रकारचे संबंध बांदोडकर कुटुंबाने लोटलीतील ख्रिस्तीधर्मीय लोकांशी राखले होते.

आनंद बांदोडकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर अर्थार्जनासाठी अनेक व्याप केले. सुरुवातीला नेत्रावळी येथील लोटलीकर यांच्या खाणीवर व्यवस्थापक, नंतर इटालियन कंपनीच्या दुचाकी व जपानच्या तीन चाकी कार विक्रीचा व्यवसाय! (अशा प्रकारचा व्यवसाय गोव्यात आणण्याचे धाडस सर्वात प्रथम त्यांनीच केले असे त्यांचे चिरंजीव डॉ. औदुंबर म्हणाले.) पोर्तुगीज शिक्षण झालेले असल्याने पोर्तुगीज सरकारशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे व्यवसायासाठी लागणारे परवाने, मान्यता मिळवण्यात त्यांना कोणतीच अडचण आली नसावी. पोर्तुगीज शिक्षण ज्यांचे झालेले असते ते चार विषयांत पारंगत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एक म्हणजे गणित, दुसरा विज्ञान, तिसरा भूगोल आणि चौथा विषय म्हणजे भाषिक ज्ञान! आनंद बांदोडकर त्याच मुशीतून तयार झालेले. त्यांना छंद जडला होता तो विविध विषयावरची पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रे वाचण्याचा! त्यांच्या संग्रहात विपुल साहित्य खजिना उपलब्ध आहे ज्यात पं. महादेवशास्त्री जोशी यांचे ‘भारतीय संस्कृती कोश’चे अकरा खंड अंतर्भूत आहेत. प्रचंड वाचनाने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत गेल्या, बाह्य जगाविषयीचे ज्ञान वृद्धिंगत होत गेले. दुसरे महायुद्ध, भारतीय स्वातंत्र्यचळवळ आणि गोमंतकाचा मुक्तिसंग्राम पाहिलेला हा माणूस पन्नास-साठच्या दशकात प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रप्रेमी झाला. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याने आणि स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याने तो प्रेरित झाला. राम मनोहर लोहिया यांच्या गोव्यातील आगमनाने त्याच्यात समाजवादाची व स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली. तत्त्वचिंतन आणि आध्यात्म याची जोड त्यांच्या ज्ञानाला होती. त्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध झाले. त्यांना जीवनसाथी मिळाली तीदेखील गोदावरीबाई यांच्यासारखी सुशील व सुसंस्कृत अशा रायबंदरच्या पांडुरंग शिरोडकर कुटुंबातील! सत्य, सदाचार आणि राष्ट्रप्रेम ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती. कामावरची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि स्वयं शिस्त ही त्यांची व्यावासिक तत्त्वे होती. या तत्त्वाशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्याकडे आर्थिक वैभव नसले तरी चारित्र्यसंपन्नतेचे वैभव भरभरून होते. याचा प्रभाव भल्याभल्यांवर पडायचा!

गोवा विमोचनानंतर त्यांच्या वाहनविक्री व्यवसायावर मोठाच परिणाम झाला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी असेल किंवा व्यवसाय बदलण्याच्या उद्देशाने असेल कदाचित, त्यांनी आपला लोटली हा जन्मगाव सोडला आणि ते तिसवाडी तालुक्यातील खोर्ली या गावात राहायला आले. गोवा सरकारने नव्याने सुरू केलेल्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात त्यांनी आपला छोटासा मेणबत्ती, सुगंधी धूप, अगरबत्त्या बनवण्याचा लघु उद्योग सुरू केला. पुढे त्याच परिसरात टुमदार कौलारू घर बांधून ते खोर्ली इथे स्थायिक झाले आणि तिथेच त्यांनी आपल्या परिवाराच्या सहवासात अखेरचा श्वास घेतला. काटेकोर व निर्व्यसनी जीवनशैली, नियमित व्यायाम यांमुळे कोणताच आजार त्यांच्या जवळपास फिरकला नाही. त्यांचा मृत्यूदेखील केवळ वयानुरूप येणार्‍या वार्धक्याने झाला; कोणत्या आजाराने नाही. वयोमानाप्रमाणे कमरेचा अस्थिभंग झाल्याने त्यांच्या हालचालींवर बंधने आली होती. परंतु ना त्यांनी आपली सामाजिक कर्तव्ये सोडली ना राजकीय मते बदलली. आपल्या कर्तव्यात कोणतीच कसूर त्यांनी ठेवली नाही.

३ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी ९८ व्या वर्षात प्रदार्पण केले होते आणि ते सहज शतक पूर्ण करतील अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र शतकपूर्तीसाठी अवघी अडीच वर्षे बाकी असताना त्यांनी एक्झिट घेतली. हे म्हणजे एखाद्या खंद्या फलंदाजाचे शतक पूर्ण होता होता तो धावचित व्हावा तसे झाले. अशा या अनुभवसमृद्ध, हरहुन्नरी, बुद्धिमान, पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तीशी व माझ्या अगम्य चाहत्याशी प्रत्यक्ष ओळख झाली नाही हे माझे दुदैव म्हणावे लागेल. त्यांचा सहवास अल्पकाळ जरी लाभला असता तरी माझ्या अनुभवविश्वाला सोनेरी किनार लाभली असती. असो. शेवटी आपल्या भेटीगाठी हा पूर्वनियोजित संचिताचा भाग असतो असे म्हणतात! आनंद बांदोडकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो!