चीनने केली अमेरिकेकडे मागणी
कारवाईचा रशियाकडून निषेध, भारताकडून चिंता व्यक्त
इस्रायलचा अमेरिकेला पाठिंबा
अमेरिकेने शनिवारी भल्या पहाटे व्हेनेझुएलावर हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेन्स यांना ताब्यात घेतले. दोघेही सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून अमेरिकन सैन्याने त्यांना व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथून ताब्यात घेतले आणि अमेरिकेत नेले. यानंतर चीनने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची व्हेनेझुएलातून तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. तसेच रशिया व स्पेननेही अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केला तर भारताने या हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल रविवारी एका निवेदनाद्वारे, अशा प्रकारे राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या देशात नेणे चुकीचे आहे. हा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला पाहिजे असे म्हटले आहे.
न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याला युद्धाची कृती म्हटले आहे. अमेरिकेने 1990मध्ये पनामात केलेल्या हल्ल्यानंतर दक्षिण अमेरिकेतील ही सर्वात थेट कारवाई ठरली आहे. व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्यांचे वर्णन ‘साम्राज्यवादी हल्ला’ असे केले आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात अनेकांनी अमेरिकेच्या या कृतीचा निषेध केला आहे. त्यात रशिया, चीन, स्पेन यांचा सहभाग असून भारतानेही अमेरिकेच्या या कारवाईविरोधात तीव्र चिंता व्यक्त केली आहे. व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेतून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यांनी निकोलस मादुरो हे व्हेनेझुएलाचे कायदेशीर आणि एकमेव राष्ट्रपती आहेत आणि त्यांची सक्तीने केलेली नजरकैद पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि स्पॅनिश सरकार त्याचा निषेध करते. सांचेझ यांनी व्हेनेझुएलामध्ये जे घडले ते कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही. त्यांच्या मते, दुसऱ्या देशात प्रवेश करणे आणि त्यांच्या अध्यक्षांना पकडणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
इस्रायलचे समर्थन
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईला उघडपणे पाठिंबा दिला आहे. नेतन्याहू यांनी सांगितले की अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेली कठोर कारवाई योग्य आहे आणि संपूर्ण इस्रायली सरकार या निर्णयाच्या मागे आहे.
भारताकडून चिंता व्यक्त
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत भारताची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून संपूर्ण परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच व्हेनेझुएलाच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षिततेसाठी भारत आपला पाठिंबा पुन्हा एकदा जाहीर करत असल्याचे म्हटले आहे.
रशिया, स्पेनकडून निषेध
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हवाई हल्ल्याचा रशियाने निषेध व्यक्त केला. रशियाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा आणि परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. संवादाद्वारे मतभेद सोडवण्याची गरज आणि राजनैतिक प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेने व्हेनेझुएलाविरुद्ध केलेल्या सशस्त्र आक्रमकतेचे कृत्य हे अत्यंत चिंताजनक आणि निषेधार्ह असलॅटिन अमेरिका शांततेचा प्रदेश राहिला पाहिजे आणि व्हेनेझुएलाला स्वतःचे भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. रशियाने व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
मादुरोंना बेडरूममधून अटक
अमेरिकेने पहाटे 2 वाजता (भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी 11:30 वाजता) व्हेनेझुएलाच्या चार शहरांवर एकाच वेळी हल्ले केले. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या बेडरूममधून बाहेर काढले आणि ताब्यात घेतले. सध्या, अमेरिकन सैन्य मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया अडेला यांना न्यू यॉर्कला आणण्यात आले आहे, जिथे त्यांना एका अटक केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रे आणि ड्रग्जशी संबंधित आरोपांवर खटला चालवला जाईल. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर मादुरोंचा एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये मादुरोंनी राखाडी रंगाचा नायके स्वेटसूट घातला आहे. त्यांना हातकडी लावलेली आहे आणि त्यांच्या हातात पाण्याची बाटली आहे. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि त्यांनी हेडफोन घातले आहेत.
व्हेनेझुएलात आणीबाणी
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी एक निवेदन जारी करून बदला घेण्याचे आश्वासन दिले आणि देशभरात आणीबाणीची घोषणा केली. त्यांनी अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल आणि खनिज संसाधनांवर कब्जा करण्यासाठी सत्तापालट करू इच्छित आहे. मादुरो यांनी त्यांचे विधान जारी केल्यानंतर अवघ्या एका तासात ट्रम्प यांनी त्यांच्या अटकेची घोषणा केली.
अशी झाली कारवाई
मादुरोंना पकडण्यासाठी आणि हाकलून लावण्यासाठी असलेल्या पथकाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर समाविष्ट होते. हे हेलिकॉप्टर समुद्रावरून अगदी खाली, फक्त 100 फूट उंचीवर उड्डाण करून व्हेनेझुएलामध्ये पोहोचले. सुरुवातीला हेलिकॉप्टरच्या संरक्षणासाठी लष्करी कारवाई करण्यात आली. त्यानंतर हेलिकॉप्टर पहाटे 1 वाजताच्या सुमारास मादुरोंच्या कंपाऊंडवर पोहोचले. या दरम्यान, अमेरिकन सैन्यावर गोळीबार झाला, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करावी लागली. अखेर मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. पहाटे 3:29 वाजता अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएला सोडले. त्यानंतर मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन युद्धनौका यूएसएस इवो जिमा येथे नेण्यात आले. तेथून त्यांना न्यू यॉर्कला नेण्यात येत आहे, जिथे त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
150 विमाने सहभागी
अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी सांगितले की, मादुरोंना पकडण्यासाठी केलेल्या कारवाईत 150 हून अधिक विमाने सहभागी होती. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झाली. अमेरिका आणि सहयोगी तळांवरून 150 हून अधिक विमानांनी उड्डाण केले. जमिनीवर आणि समुद्रात सुमारे 20 वेगवेगळ्या ठिकाणांहून ही विमाने पाठवण्यात आली. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

