व्हिटिलिगो किंवा कोड

0
350
  • डॉ. अनुपमा कुडचडकर
    पणजी

कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे त्याच्यात जबरदस्त मानसिक तणाव निर्माण होतो व त्याला समाजाचा सामना करण्यास त्रास होतो.

जगभरात जागरुकता निर्माण करण्यासाठी २५ जून रोजी जागतिक व्हिटिलिगो दिन पाळला जातो.
कोड म्हणजे पांढरे डाग. हा त्वचा रंगद्रव्याचा रोग आहे, ज्याचा परिणामस्वरूप पांढर्‍या रंगाचे चट्टे सामान्यतः चेहर्‍यावर आणि हातांवर दिसतात. २५ जून हा दिवस जागतिक व्हिटिलिगो दिन म्हणून निवडण्याचे कारण – संगीतकार मायकेल जॅक्सन हे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून त्वचारोगाने ग्रासलेले होते आणि त्यांचा मृत्यू २५ जून २००९ रोजी झाला.

काय आहे व्हिटिलिगो किंवा ल्युकोडर्मा?

आपल्या त्वचेमध्ये मेलॅनोसाइट्‌स नावाच्या पेशी असतात. या पेशी मेलॅनीन नावाचे द्रव्य तयार करतात, जे त्वचेला गव्हाळ किंवा काळसर रंग देते. जेव्हा काही कारणांमुळे या पेशी नष्ट होतात, तेव्हा त्वचेचा रंगही नाहीसा होतो. व त्वचेवर पांढरे डाग दिसू लागतात. या डागांना कोड किंवा व्हिटिलिगो म्हणतात. जवळपास २% लोक या विकाराने ग्रासलेले आहेत असा अंदाज आहे.

कोडाची लक्षणे कोणती?…

कोड हे कोणत्याही वयात, शरीराच्या कोणत्याही भागावर अचानक किंवा हळूहळू एक किंवा अनेक चट्‌ट्यांच्या रूपात विकसित होऊ शकते. हे १० ते ३० वर्षांच्या वयात सर्वांत सामान्य आहे आणि पुरुष आणि स्त्री दोन्ही समान प्रमाणात प्रभावित होतात. हे सामान्यतः चेहर्‍यावर आणि बाह्यांगावर व दुधाळ पांढरे पॅच किंवा चट्‌ट्यांच्या रुपात दिसून येते.

कोड कशामुळे येते व ते वाढण्याची कारणे कोणती?

कोड होण्यामागे ठोस असं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सर्वसामान्यपणे तो एक ऑटोइम्यून म्हणजे स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीचा विकार होय. अशा परिस्थितीत अँटीबॉडीजचे उत्पादन वाढते व ते मेलॅनोसाइट्‌सच्या विरोधात जाऊन त्या पेशींना नष्ट करते ज्यामुळे मेलॅनीनचे उत्पादन होऊ शकत नाही. याचाच परिणाम म्हणजे संबंधित शरीराच्या भागाचा रंग नाहीसा होतो व तिथे पांढरा डाग दिसू लागतो. कधीकधी त्वचेमध्ये असलेली रसायने त्वचेच्या या पेशींना नष्ट करतात ज्यामुळे रंग कमी होतो. काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक पूर्वस्थितीमुळे हा त्वचारोग उद्भवू शकतो.
काही रुग्णांमध्ये जनुकीय पूर्वपरिस्थितीमुळे हा विकार वाढू शकतो. तसेच डायबिटीज आणि थायरॉइडच्या विकारांमुळेही कोड होऊ शकते. काही क्षार आणि जीवनसत्वांच्या अभावामुळे, तसेच ताण, जखमा आणि जळल्यामुळेसुद्धा कोड येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

कोडाशी संबंधित गुंतागुंत कशी होते?

कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे त्याच्यात जबरदस्त मानसिक तणाव निर्माण होतो व त्याला समाजाचा सामना करण्यास त्रास होतो. समाजात असे गैरसमज आहेत की हा त्वचारोग एक संसर्गजन्य रोग आहे आणि स्पर्श करून त्याचा प्रसार होऊ शकतो, जे अजिबात खरे नाही.

कोडावरील उपचार ः

रोगाचा प्रसार रोखणे, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि रंग गमावलेल्या त्वचेला पुन्हा रंग प्रदान करणे हे उपचारांचे उद्दिष्ट असते. जास्त प्रमाणात कोड झालेल्या व्यक्तींना उन्हात जाण्यापूर्वी भरपूर प्रमाणात सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो.

कोड झालेली व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते का?

या त्वचारोगाच्या रुग्णांना एक सामान्य जीवन जगता येते. ते लग्न करू शकतात. स्त्री असेल तर ती मुलाला जन्म देऊ शकते. तसेच एक सामान्य माणूस करू शकत असलेल्या कोणत्याही कार्यापासून या व्यक्तींना दूर राहण्याची आवश्यकता नाही.
समाजात कोड असलेल्या लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये. हा संसर्गजनन्य रोग नाही आणि संक्रमित होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाने हा त्वचारोग असलेल्या व्यक्तीकडे प्रेमाने पहावे व त्यांच्याशी इतरांप्रमाणेच वागावे. तसेच कोड झालेल्या कोणत्याही व्यक्तीने अजिबात मानसिक ताण न घेता, तेवढ्याच अभिमानाने आणि प्रतिष्ठेने समाजात वावरले पाहिजे.