इफ्‌स अँड बट्‌स! बायोस्कोप

0
148
  • प्रा. रमेश सप्रे

‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यांनी वर्णन केलेली परिस्थिती ही वस्तुस्थिती नसते. पण अंगचोरपणा, कामचोरपणा, जबाबदारी झटकणं अशा गोष्टीच अधिक असतात.

आपल्या बायोस्कोपमध्ये आरंभी दोन जीवनचरित्रं पाहू या.
एक ः- ‘जर तुम्ही मला नवी रेशमी साडी घेतली नाही तर मी त्या लग्नाला येणार नाही’ असा पतिपत्नीतला प्रेमळ संवाद अनेक घरात चालू असतो. कधी साडी तर कधी माडी (नवं घर) तर कधी गाडी! … खूप ताणला गेला तर काडीमोडापर्यंत मजल जाऊ शकते. हा झाला जर – तर चा जरतारी संवाद. जर म्हणजे सोनं नाही तर अट (इफ).
दोन ः- मी तुझ्या कार्यक्रमाला आलो असतो रे, पण अचानक… यापुढे काहीही सांगितलं जातं… पण अचानक पाहुणे आले, जोराचा पाऊस आला, कुणीतरी पडून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. बहुतेक फ्रॅक्चर इ. इ. हा पण म्हणजे ‘बट्’.
अशा ‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यानी वर्णन केलेली परिस्थिती ही वस्तुस्थिती नसते. पण अंगचोरपणा, कामचोरपणा, जबाबदारी झटकणं अशा गोष्टीच अधिक असतात.

तुम्ही जाताय तर मीपण येतो बरोबर… यातला पण हा निराळा आहे. सकारात्मक आहे. सीता- द्रौपदी यांच्यासारख्या तेजस्विनी स्त्रियांच्या स्वयंवरासाठी जो ‘पण’ ठरवलेला असतो, तोही पुरुषार्थी, पराक्रम किंवा कौशल्य सिद्ध करणारा असतो. आपला दैनंदिन पण – परंतु -किंतू हा मात्र नकारात्मक, रडका, पलायनवादी असतो. खर्‍या निश्चयात, निर्धारात या जर- तर ला किंवा पण-परंतुला जागाच नसते.

उदा.- * जर ट्यूशन मिळाली तर गणित नि विज्ञान विषयात मी पूर्ण गुण (मार्क्स) मिळवीनच. हा आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे.

  • मार्गात कितीतरी अडचणी आल्या पण जिद्दीनं आम्ही मुक्कामाला पोचलोच. या उद्गारातली जिगर, धमक जीवनातील यशासाठी आवश्यक आहे.
    मराठीत एक मार्मिक म्हण आहे. जिचा अर्धा भाग एकानं म्हणायचा असतो तर उरलेला भाग दुसर्‍यानं पुरा करायचा असतो. ती म्हण अशी –
    ‘जर तुला आंबटढाण (अतिशय आंबट) असं लिंबू दिलं तर तू काय करशील?’
    शिक्षकांच्या मुलाखतीचे (इंटरव्ह्यू) वेळी हा प्रश्‍न सर्व शिक्षकांना विचारला गेला. त्यावर शिक्षकांच्या प्रतिक्रिया चित्रविचित्र होत्या.
  • मी ते लिंबू खाणार नाही. कल्पनेनंच माझ्या चेहर्‍यावरच्या रेषा बदलल्या.
  • त्यात पाणी मिसळून पिईन.
  • मी साखर घालून सरबत करून पिईन.
  • साखर नसेल तर माझ्या स्वभावातला गोडवा त्यात मिसळून सरबत करून घेईन.

शेवटचं उत्तर देणार्‍याला अर्थातच शिक्षक म्हणून निवडलं गेलं कारण त्यानं जर-तरच्या पलीकडे जाऊन स्वतःचा गुण नि आत्मविश्‍वास यांचं दर्शन घडवणारं उत्तर दिलं होतं. असो.
जर-तर ची जरतारी चौकट इतिहासातील अनेक प्रसंगात दिसून येते.

उदा.- * एका महान इतिहासकाराचं वाक्य आहे – ‘जर क्लिओपात्राचं नाक थोडं जरी आखूड (शॉर्ट) किंवा लांब असतं तर रोमन साम्राज्याचा इतिहास बदलला असता.

  • जर विश्‍वासातल्या एका सैनिकानं फितुरी केली नसती तर विजयासाठी इतर अनेक सैनिकांचे प्राण गेले नसते.
  • महाभारत युद्धात कौरव पक्षाचे अनेक सेनापती जर अटी घालून लढले नसते तर ते युद्ध कदाचित कौरवांनीही जिंकलं असतं.
    अशी अनेक उदाहरणं देता येतील. आता आपल्या दैनंदिन जीवनातील प्रसंग.
    मुलगा – ‘बाबा, जर मी अभ्यास केला असता तर मी सर्व विद्यार्थ्यात पहिलाही आलो असतो. पण मी अभ्यास सोडून सारं काही करत बसलो ना!
  • एक प्रसंग मजेशीर आहे – आपल्या नातीला घेऊन एक आजी बागेत फिरायला येते. तिथं लक्षात येतं की खाण्याचा डबा नि पाण्याची बाटली घाईत घरीच राहिली आहे. तिथं दुसर्‍या आजींकडे आपल्या नातीला सोपवत या आजीबाई म्हणाल्या, ‘पदवी, मी खाऊ घेऊन येते हं’. खाऊ – पाणी घेऊन आल्यावर त्यांना दुसर्‍या आजीनं कुतूहलानं विचारलं, ‘नातीचं नाव पदवी, नवीन आहे. छान आहे.’ यावर आपल्या आजीबाई म्हणाल्या, ‘माझी मुलगी म्हणजे पदवीची आई, शिक्षणासाठी म्हणून मुंबईला. जर तिनं फक्त अभ्यास केला असता तर चांगली पदवी मिळवून परत आली असती. पण प्रेमात पडली नि हिला घेऊन इकडे आली. अभ्यास तसाच राहिला. मग आम्ही काय केलं? या नातीचं नावच पदवी ठेवलं. ती पदवी नाही पण ही तर मिळवलीच ना?
    या गमतीदार प्रसंगात जरही आहे आणि पणही आहे. याला जीवन ऐसे नाव.
  • काही हृदयद्रावक प्रसंग नि प्रश्‍नही आपल्याला आठवतात. हाच पहा ना.
    जर आपल्याच पोलिसांनी बैसाखी (नववर्षारंभ) साजरी करण्यासाठी जमलेल्या आपल्याच शेकडो बांधवांवर गोळीबार करण्याऐवजी तशी आज्ञा करणार्‍या ज. डायरवर त्याच गोळ्यांचा वर्षाव केला असता तर जालियनवाला बाग हत्याकांड झालंच नसतं. पण ते झालंच ना? असो.
    असे हे जर-तर, पण-परंतु दिसतात, निरुपद्रवी पण असतात महाविनाशकारी. त्यांचा सावध, सकारात्मक प्रयोग केला तर मात्र ते वरदान ठरू शकतात – शेवटी सारं आपल्यावरच आहे.