उत्तम आरोग्यासाठी योगासने

0
191
  • डॉ. मनाली म. पवार

‘पादांगुष्ठासन’ हे पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी, पोटदुखीसाठी, आम्लता कमी करण्यासाठी, पायातील दोष घालविण्यासाठी आणि मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते.

या कोरोनाच्या काळात घरात राहूनच साधा-साधा व्यायाम करावा, असे सांगितले जाते. यामध्ये योगासनांचं महत्त्वं आहे. प्रत्येकाने आपल्याला जमतील तशी आपल्या शरीरशक्तीच्या अर्ध्यशक्ती इतका व्यायाम करावा.

१. ताडासन ः
हे आसन नियमित केल्यास मेरुदंडाची लवचिकता वाढते. पुठ्ठा आकुंचित होतो. मणक्यामधील किरकोळ दोष नाहीसे होतात. आसनात पोट आत खेचले जाते व छाती फुगवली जाते, त्यामुळे शरीर हलके वाटू लागते, तसेच शरीरभर उत्साह निर्माण होतो. या आसनाने मणक्यामधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. १२ ते १८ वर्षे वयातील मुलांनी ताडासन नियमित केल्यास उंची वाढण्यास मदत होते. या आसनाने शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. या आसनात संपूर्ण शरीरास योग्य ताण मिळत असल्याने आळस जाऊन ताजेतवाने वाटू लागते. या आसनाने टाचेतील दोष दूर होतात.
बराचवेळ पुढे वाकून बसल्याने पाठीच्या होणार्‍या त्रासातून मुक्त होण्यास या आसनाचा उपयोग होतो. मणक्यांमध्ये स्थान भ्रष्टता असल्यास या आसनाचा उपयोग होतो.
२. वृक्षासन ः
वृक्षासन नियमित केल्याने पायांचे स्नायू बळकट व सुदृढ होतात. शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. खांद्याचे स्नायू बळकट होतात.

३. सिद्धासन ः
या आसनामुळे मनाची एकाग्रता वाढून मनःशांती मिळते. या आसनाने शरीराला अधिक प्रमाणात विश्रांती मिळते. या आसनाने मनावर ताबा ठेवण्यास मदत होते. हे आसन गुडघ्यांच्या, पावलांच्या, विकासासाठी करायला सांगतात. उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब असल्यास हे आसन करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

४. वीरभद्रासन ः
या आसनाने पायांचे स्नायू, पोटर्‍या, मांड्या सुदृढ बनतात. मानेजवळचे स्नायू मोकळे होतात. या आसनाचा उपयोग खांद्यांसाठी, यकृत, छोट्या व मोठ्या आतड्यांसाठी होतो. हे आसन आम्लता कमी करण्यासाठी उपयोगी पडते.

५. त्रिकोणासन ः
या आसनाने पायांचे स्नायू बळकट होतात. कण्याच्या खालच्या भागात रक्तपुरवठा वाढल्याने पाठीचा कणा व पाठीचे स्नायू बळकट होतात. संपूर्ण हात व पायांना ताण मिळाल्याने त्यांना सुदृढता येते. छाती विकसित होते.

६. गरुडासन ः
या आसनाने हातांचे व पायांचे स्नायू ताणले जातात व सशक्त होतात. संधिवात असणार्‍यांना या आसनाने खूप फायदा होतो. या आसनाने शरीराची लवचिकता तसेच तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. खांदे, कोपर, मनगट, पार्श्‍वभाग, गुडघे व घोटे या सर्व अवयवांना योग्य ताण मिळाल्याने त्यांची लवचिकता वाढते. मांड्या व पोटर्‍यांमध्ये येणारे गोळे या आसनाने कमी होतात. घोट्यांसाठी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी हे आसन लाभदायक आहे.

७. पादांगुष्ठासन ः
या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण पडल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. पोटाचे स्नायू बळकट होतात. पाठीच्या कण्याचा व पोटाचा त्रास असणार्‍यांना या आसनाने खूप फायदा होतो. या आसनाने यकृताचे कार्यसुद्धा गतिशील होते. हे आसन छाती, यकृत, छोट्या-मोठ्या आतड्यांसाठी, पायांसाठी, शरीराच्या लवचिकतेसाठी, शरीराच्या सुडौलपणासाठी, उंची वाढविण्यास मदत करते. पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्रास कमी करण्यासाठी, पोटदुखीसाठी, आम्लता कमी करण्यासाठी, पायातील दोष घालविण्यासाठी आणि मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी हे आसन मदत करते. अंतर्गळ असल्यास, पाठीला कुबड असल्यास, पाठीच्या कण्यामध्ये स्थानभ्रष्टता झाल्यास हे आसन करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

८. उत्कटासन ः
या आसनामुळे शरीराचे सर्व स्नायू बळकट व मजबूत होतात, तसेच शरीराच्या सर्व सांध्यांना योग्य तितका ताण मिळाल्याने सांध्यांना व्यायाम मिळतो. संधिवाताच्या रुग्णांना या आसनाने खूप फायदा होतो. तसेच हृदय व पोट दाबले गेल्याने हृदय सशक्त होते, पचनक्रियेतसुद्धा सुधारणा होतात. शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते.

९. नटराजासन ः
या आसनाने पायांचे स्नायू बळकट होतात. खांद्यांना योग्य तो ताण मिळाल्याने खांद्याचे स्नायू बळकट होतात. तसेच या आसनाने गुडघे, खांदे, घोटे, पाठीचा कणा या सर्वांना योग्य तो ताण मिळाल्याने स्नायू बळकट होतात. या आसनामुळे शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमतासुद्धा वाढते.
हे आसन छातीसाठी, पाठीसाठी करतात. मुत्रपिंडाचा आजार असल्यास तज्ञांच्या सल्ल्यानेच हे आसन करावे.

१०. अर्धचक्रासन ः
या आसनात हात व पाय दोन्ही ताणले गेल्याने त्यांच्यात बळकटपणा येतो. पाठीचा कणा दोन्ही बाजूस वाकल्याने त्यांच्यात सुदृढता येते. शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते.

१०. मृदुंगासन ः
मासिक पाळीत होणारा त्रास या आसनाने कमी होतो. तसेच प्रसूती सुलभ होण्यासाठीसुद्धा या आसनाचा फायदा होतो. या आसनामुळे पायांच्या स्नायूंना बळकटी येते. तसेच रक्ताभिसरण योग्य होण्यास मदत होते. शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. गर्भवतीने तसेच मासिकपाळी चालू असता हे आसन करू नये.

११. संतुलासन ः
गुडघेदुखी असणार्‍यांना या आसनाचा खूप फायदा होतो. या आसनाने घोट्यांना, पायांना, कंबरेच्या, मांड्यांच्या स्नायूंना ताण मिळाल्याने स्नायू बळकट होतात. एका पायावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. या आसनाने संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो.

१२. पादहस्तासन ः
या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर योग्य तो ताण बसतो, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत होते. पचनसंस्थेच्या विकारात व वातविकारात या आसनामुळे खूपच फायदा होतो. या आसनाने पोटाचे स्नायू बळकट होतात. तसेच यकृत अधिक कार्यक्षम होते. हे आसन पाठीसाठी, आतड्यांसाठी, सुडौलपणा आणण्यासाठी करतात. आम्लता कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.